Advertisement
उद्योगोपयोगी

भागीदारीचा उत्कृष्ट नमुना : बारा बलुतेदारी आणि फड पद्धती

फक्त रु. ५०० मध्ये 'स्मार्ट उद्योजक' प्रिंट मासिक घरपोच मिळवा.

Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

Print this Page

मी जेव्हा जातकास सांगतो की, त्याने भागीदारी करून उद्योगात उतरावे तेव्हा अनेक वेळा मला खालीलप्रमाणे प्रतिसाद मिळतो.

“मला सांगितले गेले आहे की, भागीदारी माझ्या पत्रिकेस चांगली नाही.”

“मी भागीदारी केली होती, परंतु भागीदार पळून गेला.”

“भागीदाराने मला डुबवले इत्यादी इत्यादी.”


Paytm वापरकर्त्यांसाठी बंपर ऑफर

'स्मार्ट उद्योजक' मासिकाची वार्षिक डिजिटल वर्गणी

Paytm वर मिळवा आता फक्त २० रुपयांत.


मी तेव्हा त्यांना विचारतो, तुमचे लग्न झाले आहे काय? तुमची बायको नोकरी करते की उद्योग? की गृहलक्ष्मी  आहे? मुलेबाळे आहेत काय? कौटुंबिक स्थिती कशी आहे?  या प्रश्‍नांची उत्तरे जर समाधानकारक असतील तर त्यांना सांगतो, बायको तुमची भागीदार नाही काय? मुले तुमची भागीदार नाहीत काय? जर त्यांच्याशी तुमचे संबंध चांगले आहेत आणि त्यांच्यामुळे तुमचा आणि तुमच्यामुळे त्यांचा फायदाच होत आहे तर भागीदारी तुम्हाला नुकसानदायक कशी? याचाच अर्थ असा की, काही नीतिनियम पाळून भागीदारी केल्यास ती तुम्हाला फळेल. त्या नीतिनियमांची चौकट आधी निर्माण न केल्यास आणि भागीदारांमध्ये समजूतदारपणा नसल्यास भागीदारीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

या लेखात आपण आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षे चालवलेल्या भागीदारीची दोन उदाहरणे पाहू या. यातून चांगले असेल ते घ्यायचे आणि इतर सोडून द्यावयाचे.

बारा बलुतेदार प्रणाली

प्रत्येक गावात बारा बलुतेदार असायचे. त्यांना कामाची वाटणी अशा प्रकारची होती.

 1. सोनार – दागदागिने तयार करणे.
 2. गुरव – गावदेवीच्या मंदिराची देखभाल
 3. न्हावी – केस कापणे, जावळ काढणे, जखमा साफ करणे, नारू रोगाचे उपचार करणे
 4. परीट – कपडे धुणे
 5. कुंभार – मातीची भांडी तयार करणे,
 6. सुतार – लाकडाच्या वस्तू तयार करणे; नांगर, बैलगाड्या तयार करणे.
 7. लोहार – लोखंडाच्या वस्तू तयार करणे, बैलगाडीची धाव बनवणे, शस्त्रे बनवणे.
 8. चांभार – चामड्याच्या वस्तू बनवणे, मोट बनवणे, चपला-बूट बनवणे.
 9. कोळी – जलवाहक, गावास पाणीपुरवठा करणे, पुरात गावाचे रक्षण करणे.
 10. चौगुला- गावाच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे
 11. मांग – ग्राम पहारेकरी, दूत, सफाई कामगार
 12. महार- ग्राम पहारेकरी, दूत, सफाई कामगार आणि जमीन लवाद.

गावातील शेतकरी या लोकांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात धान्य देत असत. पैशाचे व्यवहार बहुधा नसत आणि सगळे व्यवहार वस्तुविनिमयाद्वारे होत असत.

यातील काही बलुतेदार इतरही अनेक कामे करत. जसे न्हाव्यास गावातील लग्नाच्या वेळेस विशेष मान असे. लग्नातील गावजेवणात त्याचा आचारी म्हणून पुढाकार असे. तसेच न्हावी मालिश करणे, हाडे जुळवणे, सांधे जमवणे, नारू काढणे इत्यादी कामेदेखील करत. चौगुले आणि कोळी गावाजवळच्या नदीवरदेखील लक्ष ठेवून असत. पूर आल्यास पहिला इशारा त्यांच्याकडून होई. तसेच काही विशेष फरक नजरेस आल्यास ते तो गावकर्‍यांच्या नजरेस आणून देत.

आता आपण येऊ या फड पद्धतीकडे. ही पद्धत मला सर्वप्रथम डॉ. सुधीर भोंगळे यांनी समजावून सांगितली. विल्यम हार्डिमन (1848) यांनी याविषयी सविस्तर लेखन केले आहे.

नदीला वळण बंधारा बांधून पाणी शेतजमिनीकडे वळविले जाई. प्रत्येक जण आपआपल्या हद्दीतून जाणार्‍या बंधार्‍याची निगा राखत असे. सगळे गावकरी एकत्र बसून या वर्षी कोणती पिके काढायची याबद्दल सांगोपांग विचार करत. त्यानंतर सगळ्या शेतजमिनीची वाटणी होई. त्यापैकी एक चतुर्थांश जमीन तशीच ठेवली जाई. त्यात लागवड केली जात नसे. ही  जमीन गायरान म्हणून वापरली जायची. बाकी जमिनींमध्ये सर्वांच्या सहकार्याने लागवड केली जायची. या लागवडीत बारमाही, आठमाही आणि चारमाही अशी वाटणी असे. लागवड व जोपासना सगळे एकमेकांस मदत करून करत असत. कापणीनंतर पीक सर्वांमध्ये वाटले जायचे. या वाटणीत बारा बलुतेदारांचादेखील सहभाग असायचा. जे पीक उरेल ते जवळच्या गावांना दिले जायचे किंवा त्यांच्याकडील पिकाबरोबर विनिमय केला जायचा. पुढच्या वर्षीदेखील हीच पद्धत वापरली जायची, अर्थात दुसरी चतुर्थांश जमीन पडीक ठेऊन.

या पद्धतीचे अनेक फायदे होते. एक तर सर्वाना पाहिजे तशी पिके लावली जायची, त्यामुळे जास्त उत्पादन,किंवा अपव्यय टळायचा. जमिनीचा कस टिकून राहायचा आणि गावदेखील सर्व बाबतीत स्वावलंबी व्हायचा. सहकाराची अजून सुंदर व्याख्या ती काय?

अहिल्याबाई होळकरांच्या राज्यात अशा प्रकारच्या पद्धतीचा विशेष पुरस्कार केला जात असे आणि जर कधी विवाद झालाच तर बहुतेक वेळा तो गावपातळीवरच निपटला जात असे. नंतरच्या काळात या सगळ्याच पद्धती मोडीत निघाल्या आणि मोडीपण अडगळीत गेली.

पण हे सगळे पुराणउद्योग ज्योतिषात कशाला, असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल. इतिहास हा उद्योग ज्योतिषाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. ज्या गोष्टींमध्ये आपण ऐतिहासिकदृष्ट्या पारंगत होतो त्या गोष्टी आपण परत करण्यास गेलो तर सहजी त्या गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. अर्थात या गोष्टी आपण नवीन पद्धतीने जी पद्धत बदलत्या काळास अनुकूल असेल त्याप्रमाणे केली तरच. त्यासाठी इतिहासाचा मागोवा घेणे फार गरजेचे असते.

वर्तमानकाळात आपण पाहतो ते भागीदारी करू नये, भागीदारी बुडवते इत्यादी सल्ले; परंतु इतिहासात पाहिले तर आपल्याला उत्कृष्ट भागीदारीची ही उदाहरणे सहजी पाहावयास मिळतात. म्हणजे आपणामध्ये जात्याच हे कौशल्य आहे.

– आनंद घुर्ये
९८२०४८९४१६

FREE NEWSLETTER ON WHATSAPP

व्यवसाय आणि उद्योजकतेविषयी माहिती व घडामोडी आपल्या WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ या क्रमांकावर आपले नाव सध्या राहत असलेला जिल्हा व तालुका WhatsApp करा.

Help-Desk
%d bloggers like this: