‘मूव्हर्स अँड पॅकर्स’ आता हा शब्द काही आपल्यासाठी नवखा नाही. विशेषतः शहरी लोकांना तर तो परिचयाचा आहेच. कोणतंही सामान मग ते घरगुती असो किंवा कार्यालयीन; एका जागेवरून दुसर्या जागेवर किंवा एका देशातून दुसर्या देशात सुरक्षितपणे पोहचवण्याचे काम मूव्हर्स अँड पॅकर्स करतात. भारत देशात सर्वात वेगाने वाढणारा हा व्यवसाय आहे.
अनेक लोक हा व्यवसाय करतात, पण चांगली आणि व्यावसायिक सेवा पुरवणार्या कंपन्या फार कमी असतात. हेच हेरून आपण या क्षेत्रात पाऊल ठेऊ शकता. तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम, बळकट आहात, तुमच्याकडे स्वतःच्या मालकीची व्हॅन किंवा एखादे चार चाकी वाहन आहे, तुमच्यासारखीच शरीराने बळकट अशी चार माणसे तुम्ही सोबत घेऊ शकता? अंगमेहनत करायची तयारी आहे?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर तुम्ही लगेच हा व्यवसाय सुरू करू शकता, कारण या व्यवसायासाठी आवश्यक जुजबी गोष्टींची पूर्तता तर तुम्ही लगेच करू शकताय. या व्यवसायाचे भविष्य खूप चांगले आहे. या व्यवसायात थोडे शारीरिक कष्ट आणि ज्ञान हे आपल्या उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत बनू शकतात.
हा व्यवसाय विश्वास आणि भावनांविषयीदेखील आहे, कारण जेव्हा एखादी व्यक्ती आपले घर बदलते तेव्हा ती केवळ जागा किंवा त्यातील वस्तू स्थानांतरित करत नसते, तर त्यासोबत त्यांच्या बऱ्याच आठवणीदेखील जोडलेल्या असतात. आपल्यासाठी केवळ त्या वस्तू असतात, पण एखाद्याच्या आठवणी आणि भावनांमध्ये ती वस्तू मौल्यवान असू शकते.
त्यामुळे आपल्या कंपनीच्या कर्मचारी किंवा हे काम करणार्याकडून त्या ग्राहकाच्या भावनांचा आदर झाला पाहिजे. त्या वस्तूंचे योग्य आणि सुरक्षित हस्तांतरण होणे फार महत्त्वाचे आहे. व्यावसायिकरित्या या क्षेत्रात उतरण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या मुद्यांवर लक्ष देऊ.
व्यवसायाचे स्वरूप
व्यवसायाची आखणी करताना प्रथम आपली व्यावसायिक, आर्थिक गुंतवणूक किती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. हा व्यवसाय आपण सूक्ष्म, लघू अथवा मध्यम प्रकारात चालू करतो यावरून त्याची गुंतवणूक ठरते. आपण हा व्यवसाय राज्य किंवा आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार हे सुरुवातीला निश्चित केले पाहिजे.
व्यवसाय योजना (बिझनेस प्लॅन)
मूव्हर्सच्या व्यवसायात उतरण्यापूर्वी त्याबद्दल पूर्ण माहिती मिळवून अभ्यास करायला हवा. काही औपचारिक कागदपत्र तयार करून जर आपण भागीदारीत व्यवसाय सुरू करत असाल तर त्यांची माहिती, खर्च इत्यादींचा तपशील नोंदवायला हवा.
जेव्हा आपण योजना तयार करतो तेव्हा आपली कंपनी कशी चालेल, ग्राहकांना आपण सेवा कशी देऊ शकतो, आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल तपशीलवार माहिती कागदावर मांडली पाहिजे.
याचसोबत या क्षेत्रातील स्पर्धा कशी हाताळाल, व्यवसायासाठी किती आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे, अंदाजित नफा किती मिळेल इ. गोष्टींचाही अभ्यास गरजेचा आहे. आपण यापूर्वी अश्याप्रकारे व्यवसाय योजना लिहिलेली नसेल तर यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. त्यांच्याकडून आपला बिझनेस प्लॅन म्हणजेच व्यवसाय योजना लिहून घेऊ शकता.
जागेची निवड
कोणत्याही व्यवसायासाठी सर्वात आवश्यक असते ते म्हणजे जागेची निवड. या व्यवसायासाठी तर ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आपला ग्राहक कुठे जास्त प्रमाणात उपलब्ध आहे हे हेरून आपण जागेची निवड करू शकतो.
उदाहरणार्थ जिथे मोठ्या संख्येने अपार्टमेंट आहेत, गृहसंकुल आहेत किंवा एखाद्या दुकानदाराला त्यांचे फर्निचर खरेदी किंवा हस्तांतरित करायचे आहे म्हणजेच गृहोपयोगी दुकानांची बाजारपेठ अश्या ठिकाणी आपले ऑफिस असल्यास ग्राहक मोठ्या प्रमाणात मिळतील. आपल्याला खूप मोठ्या जागेची सुरुवातील गरज नसेल पण काही सामान ठेवण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांना भेटण्यासाठी जागा लागेल.
आर्थिक नियोजन
या व्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे आर्थिक नियोजन. हा सेवा आधारित व्यवसाय असल्याने वाहने, उपकरणे आणि कच्च्या मालामध्येही गुंतवणूकीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त, आपल्याला पॅकेजिंग साहित्यासाठी येणारा खर्च, कर्मचार्यांचा पगार किंवा मेहनताना, ऑपरेटिंग खर्च आणि विपणन खर्च या सर्व आर्थिक योजना तयार कराव्या लागतील. यासाठी खालील मुद्द्यांकडे लक्ष द्या –
आवश्यक साधनसामग्रीसाठी भांडवल
या व्यवसायात प्रथम वाहन आवश्यक असेल, ज्याद्वारे आपण वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवू शकत. आपल्याकडे वाहन नसेल तर मोठ्या व्यावसायिक कंपनीकडून वाहन भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू करू शकतो. वाहनानंतर, आपल्याला खात्री करुन घ्यावी लागेल की आपण आपल्या ग्राहकांच्या सामानाची सुरक्षितता आणि वेळेत योग्य ठिकाणी हलविण्यासाठी किती किंमत आकारू शकतो.
आपल्या कामात दोरी, ब्लँकेट, पॅड्स, पट्टी, इ. ची आवश्यकता असेल. आपण आपल्या ग्राहकांना पॅकिंग सेवा देखील प्रदान केल्यास, यासाठी आपल्याला कार्टून पॅक आणि इतर काही वस्तू ठेवण्याची आवश्यकता असेल. यासाठीसुद्धा भांडवल असले पाहिजे.
कर्मचारी निवड
कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी विश्वासू कर्मचाऱ्यांची गरज असते. अर्थात आपण व्यवसाय कोणत्या स्वरूपात सुरू करतोय यानुसार कर्मचारी संख्या ठरू शकते. त्यानुसार पगार, विमा यासाठीचे आर्थिक नियोजनकरता येते.
कंपनी विमा
कोणत्याही कंपनीने तोट्यापासून वाचण्यासाठी विमा घेणे खूप गरजेचे आहे. आपल्याकडे या गोष्टीला जास्त गांभीर्याने घेतले जात नाही. विमा घेण्याचा फायदा हा आहे की आपण कोणतीही संभाव्य हानी भरून काढण्यास सक्षम असाल.
आपल्या वाहनाचा व्यावसायिक कव्हरेज विमा, आपल्या व्यवसायासाठी देयता विमा आणि कामगार भरपाई विमा याबद्दल विमा कंपन्यांच्या कर्मचार्यांशी बोला, विमा दर शोधून काढा आणि विमा मिळवा.
सेवा दरपत्रक तयार करा
आपली सेवा सुरू करण्यापूर्वी दर सुनिश्चित करतात. आपल्या कंपनीद्वारे ग्राहकांची सेवा देण्यापूर्वी आपण दर ठरवून नफ्याचे प्रमाण निश्चित केले पाहिजे. हे दर स्थानापर्यंतचे अंतर, वजन, वेळ किंवा इतर वस्तूंसाठी इंधन, वाहन देखभाल, पॅकिंग साहित्य, कर्मचार्यांचे वेतन, विमा आणि जाहिरात खर्च यासारख्या भिन्न गोष्टींवर आधारित असू शकतो. एक करारपत्र तयार करून आपण कामाची सुरुवात करू शकतो.
आपण ज्या भागात सेवा देणार त्या भागातील स्पर्धादेखील लक्षात घ्यावी लागेल. आपण ग्राहकांना सेवा देण्यासाठी किती शुल्क आकारू शकतो, या सेवेसाठी इतर कंपनी किती शुल्क आकारतात याचा अभ्यास करावा. अशा प्रकारे आपण आपल्या ग्राहकांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमी दरात सेवा देऊ शकतो का हे कळू शकते.
कंपनी विपणन म्हणजेच मार्केटिंग
कोणत्याही व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक असते चांगले मार्केटिंग. आपण या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. सध्याचा काळ हा इंटरनेटचा आहे. आपले ग्राहक या माध्यमातून आपल्याला शोधत असतात त्यामुळे आपण प्रथम आपली वेबसाईट बनवायला हवी. कंपनीचा ब्रँड, लोगोही तयार करा. विविध आयडिया लावून प्रमोशन करा.
व्यवसायासाठी परवाना
मूव्हर्सचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला परिवहन विभागाकडून खास प्रकारच्या परवान्याची आवश्यकता असेल. परवाना देण्यासाठी प्रत्येक राज्याचे स्वतःचे नियम आहेत. याविषयी अधिक माहितीसाठी, आपण ज्या कोणत्या राज्यातून व्यवसाय सुरू करणार आहात त्या राज्याच्या डीटीओ कार्यालयाशी संपर्क साधा आणि माहिती मिळवा.
व्यवसाय नोंदणी
कायदेशीररित्या, व्यवसाय चालवण्यासाठी आपल्याला आपल्या राज्यात नोंदणी करावी लागेल. व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र प्रक्रिया असते. आपण त्याच्या प्रक्रियेची माहिती आपल्या राज्याच्या राज्य सचिवाच्या वेबसाइटवरुन मिळवू शकता.
व्यवसायानुसार कायदेशीर प्रक्रिया आणि त्या संदर्भातील फी असते. कंपनी नाव, आपल्या व्यापाराचे चिन्ह, वेबसाईट डोमेन नेम ठरवून एमएसएमईमध्ये नोंदणीसाठी अर्ज करू शकता. याशिवाय अश्या अनेक नोंदणी ची आवश्यकता असते ती तपासून घ्यावी. सेवा आधारित व्यवसाय असल्यामुळे जीएसटी अंतर्गतसुद्धा नोंदणी करणे बंधनकारक आहे.
आता यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यासाठी पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, उदयोग आधार, आपण भागीदारीमध्ये व्यवसाय करीत असल्यास इतरही आवश्यक पुरावे सादर करावे लावतात. महत्वाचे आणि वर म्हटल्याप्रमाणे आपण कोणत्या प्रकारचा म्हणजेच सूक्ष्म, लघू, मध्यम प्रकारात व्यवसाय सुरू करू इच्छित त्यानुसार थोडा फरक असू शकतो. आपण स्वतंत्रपणे उद्योग करतोय किंवा भागीदारीत यावरही कागदपत्रे ठरतात.
आपल्या व्यवसायाला जास्तीत जास्त सदोष करायचे असल्या आपण छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर जातीने लक्ष द्यायला हवे. संपूर्ण अभ्यास आणि नियोजनाने या क्षेत्रात उतरल्यास यशाच्या शिखरावर पोहचायला तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही.
– प्रतिभा राजपूत
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.