चिक्की हे कोठेही प्रवासात, उपवासात खाण्यासाठी अतिशय मागणी असलेला पदार्थ आहे. चिक्की ही शेंगदाणे, बदाम, काजू, खोबरे, राजगिरा, डाळं इ. जिन्नसांपासून बनते. या पदार्थाची विक्री किराणा मालाची दुकाने, रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टँडवरील दुकाने व उपाहारगृहातून मोठ्या प्रमाणावर होते.
अगदी अल्प भांडवलात सहजगत्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार्या कच्च्या मालापासून हा उद्योग करता येऊ शकतो. खाली शेंगदाण्यापासून तयार होणारी चिक्की बनविण्याची पद्धती दिली आहे.
प्रथम गुळात पाणी घालून वितळेपर्यंत उकळत ठेवा. त्याचा चांगला पाक होईपर्यंत उकळणे चालू ठेवा. नंतर भाजलेले शेंगदाणे ठरलेल्या प्रमाणात त्या गुळाच्या पाकात व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण पुन्हा गरम करा. हे गरम मिश्रण स्वच्छ अशा लाकडाच्या फळ्यांवर ओता व त्यावर रुळ फिरवून ते सर्वत्र सारख्या जाडीचा थर होईपर्यंत पसरत राहा.
आता हा थर थंड होऊ द्या. हा थर थंड सुरीने कापून त्याचे योग्य आकारात तुकडे करा. नंतर त्यांना प्लॅस्टिकच्या वेष्टनात चांगल्या प्रकारे पॅक करून विक्रीकरिता पाठवा. चिक्कीची विक्री ही तिचा स्वाद आणि सुंदर अशा वेष्टनामुळे ग्राहकांना त्याचा उत्तम प्रतिसाद मिळतो.
उत्पादन करताना घ्यावयाची काळजी
चिक्की हा खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे या उत्पादनाशी संबंधित असणार्या वस्तूंचा साठा करणे, त्या वस्तूंची हाताळणी करताना स्वच्छता बाळगणे आवश्यक आहे. उत्पादनाच्या जागी स्वच्छ पाण्याची व्यवस्था असावी व उत्पादन कर्मचार्यांनी केस किंवा अन्य कचरा उत्पादनात उडून मिसळू नये यासाठी दक्षता घेतली पाहिजे.
स्त्री कर्मचार्यांनी गणवेशाचा वापर करावा व केस व्यवस्थित बांधून टोप्यांचा वापर करावा. तसेच जेथे उत्पादन केले जाणार आहे तेथील परिसर स्वच्छ असावा. जागेला रंगरंगोटी केलेली असावी. कोळ्यांची जाळी, धूळ नसावी. योग्य दक्षता घेतल्यास व गुणवत्ता उत्तम असल्यास आपल्या मालाला चांगला प्रतिसाद मिळेल.
– टीम स्मार्ट उद्योजक
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.