Advertisement
उद्योगोपयोगी

क्लासेसमधली जीवघेणी स्पर्धा संमवून त्यातल्या सुप्त उद्योगसंधी शोधल्या पाहिजेत

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


शाळेतल्या स्पर्धा परीक्षांचे क्लासेस फार कमी आहेत. महाराष्ट्रात प्रत्येक शहरात अशा कोचिंग क्लासेसची गरज आहे. सर्व क्लास संचालकांनी स्पर्धेवर मात करण्यासाठी एकत्र येऊन आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्रात दररोज खासगी क्लासेसचे प्रमाण बरेच वाढत चालले आहे. याचे कारण पालकांच्या मुलाकडून वाढलेल्या अपेक्षा, शाळेतल्या शिक्षणाबाबत असमाधान, मुलांकडे वैयक्तिक लक्ष हवे इ.

दहा वर्षांपूर्वी आठवी, नववीनंतर क्लास लावले जायचे. आज तर पहिलीपासून क्लासेस लावले जातात. असे हे क्लासेसचे जाळे प्रत्येक शहरात गल्लोगल्ली पसरलेले आहे. जवळपास दर दोन-तीन बिल्डिंगमधून एका ठिकाणी तरी होम ट्यूशन्स चालतात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

क्लासेस इंडस्ट्रीज खूप छान सपोर्टिव्ह सिस्टम बनून शाळा व कॉलेजएवढेच महत्त्वाचे कार्य आज देशात करत आहे. दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शिकवण्यात क्लासेसचा सिंहाचा वाटा आहे. नवनीत पब्लिकेशन कंपनीच्या डायरेक्टरांनीदेखील क्लासेसमुळे नवनीतच्या पुस्तकांचा खप भरपूर प्रमाणात होत असल्याचे म्हटले आहे. क्लास, होम ट्युशनमुळे लाखो रोजगार, उद्योग निर्माण झालेले आहेत.

जर एखाद्याला हॉटेल, मेडिकलचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्याला अनेक लहान-मोठे सरकारी लायसन्स घ्यावे लागतात. स्थानिक असोसिएशनची परवानगी लागते. खूप मोठी प्रक्रिया व गुंतवणूक आहे; पण एखाद्याने ठरवले की क्लास सुरू करायचा तर दोन दिवसांत कोणत्याही कोणत्याही परवान्यासशिवाय व लहान भांडवलात क्लास सुरू करता येतो. यामुळे क्लासेस सुरू करणे हा सोपा पर्याय खूप जणांना वाटतो. म्हणूनच आज क्लास इंडस्ट्रीमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.

या अटीतटीच्या स्पर्धेत बरेच उद्योगास अनुकूल नसलेले प्रकार घडतात. जसे विद्यार्थ्यांकडून फी कमी घेणे, अतिअपेक्षा निर्माण करणार्‍या जाहिराती बनवल्या जातात. डिजिटल क्लासरूम संकल्पनेमुळे खर्च वाढला आहे. जवळपास दहा ते वीस टक्के फी दरवर्षी बुडवली जाते.

या सर्व कारणांचा विचार केला तर खर्च वाढत चालला आहे व नफा कमी होत चालला आहे. नफा कमी झाल्याने उद्योजकाची भविष्यात नवीन चांगले काही तरी करण्याची उमेद निघून जाते. क्लासेस उद्योगात वाढलेली स्पर्धा व कमी नफा या समस्या प्रामुख्याने भेडसावत आहे. तसेच अजून काही समस्या आहेत.

क्लास संचालकांमध्ये हवी तशी एकी नाही. एका क्लासमध्ये काम करणारे शिक्षकच पुढील काही वर्षांत स्वतःचा क्लास चालू करून त्याच क्लासचे स्पर्धक बनतात. ‘महाराष्ट्र क्लास असोसिएशन’ ही संस्था गेल्या अठरा वर्षांपासून कार्यरत आहे.

आज महाराष्ट्रात तीन लाखांहून जास्त लहान-मोठे क्लासेस आहेत; पण या असोसिएशनचे फक्त २,५०० सभासद आहेत. क्लास संचालक एकत्र येतच नाहीत व स्पर्धेवर मात करण्यासाठी उपाययोजना करायलाही पुढाकार घेत नाहीत. हीच खंत आहे.

एकतेचे एक साधे उदाहरण बघू या. केस काढणार्‍या सलूनच्या मालकांची प्रत्येक शहरातील असोसिएशन मजबुतीने काम करते. आज एका माणसाचे केस कापण्यासाठी किमान ६० ते ८० रुपये सीझनमध्ये घेतले जातात. आपण कोणत्याच सलूनमध्ये पैसे कमी करण्यासाठी भाव करू शकत नाही.

भले ते सलून किती मोठे असो वा साधे असो. किंमत ठरलेली आहे. सलून मालकांच्या असोसिएशनने एकत्र येऊन हे नियम बनवले आहेत. हे नियम सर्वांना महागाईच्या, स्पर्धेच्या काळात उद्योग टिकण्यासाठी व वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

क्लास संचालकांपेक्षा अगदी सर्वसाधारण कमी शिकलेल्या सलून मालकांनाही एकतेचे महत्त्व पटते; पण उच्चशिक्षित असलेल्या क्लास संचालकांना एकतेचे महत्त्व हवे तेवढे पटलेले दिसत नाही. एका सर्वेक्षणानुसार एकटा क्लास चालवणार्‍या क्लास संचालकांचा सरासरी कार्यकाळ पंधरा वर्षे वा कमी असतो.

एवढ्या सगळ्या समस्यांचा खोल विचार केल्यावर यावर तोडगा नक्कीच निघेल. जर सर्व क्लास संचालकांनी स्पेशलायझेशननुसार वर्गीकरण केले तर चांगला मार्ग ठरू शकतो. जसे पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी ते बारावी, ग्रॅज्युएशन वर्गीकरण केल्याने स्पर्धा कमी होईल व शिक्षणाचा दर्जा वाढेल.

वार्षिक खर्च कमी होईल. अजून एक उपाय म्हणजे आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याची गरज, तसेच लपलेल्या संधी ओळखण्याची. साधारणपणे पहिली ते दहावीचे ट्यूशन क्लासेस जास्त दिसतात; पण शाळेतल्या स्पर्धा परीक्षांचे क्लासेस फार कमीच आहेत. आपण काही शिक्षण क्षेत्रातल्या लपलेल्या संधीबद्दल माहिती घेऊ या.

१) ऑलिम्पियाड परीक्षा

सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन मागील वीस वर्षांपासून पंचवीस ते तीस देशांत ही परीक्षा घेते. सामान्य ज्ञान, इंग्रजी, विज्ञान, गणित, संगणक या विषयांसाठी पहिली ते दहावीच्या वर्गांसाठी ही परीक्षा घेतली जाते. SOF ही स्पर्धा परीक्षा घेणारी सर्वात जुनी, मोठी, विश्वसनीय संस्था आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम सी.बी.एस.सी. लेव्हलचा असतो. पुस्तकांची रचना रंगीबेरंगी, चित्राकृती असलेली विद्यार्थ्यांना आकर्षित करणारी असते. मुले आवडीने ही परीक्षा देतात.

इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांमध्येच या परीक्षेसाठी नोंदणी केली जाते; पण शाळेत या परीक्षेचा अभ्यासक्रम शिकवला जात नाही. दरवर्षी साधारणपणे ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत आठवड्यातून दोनदा क्लास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. प्रत्येक इयत्तेनुसार टॉप तीन विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदक व प्रमाणपत्र मिळते.

जिल्ह्यातील टॉप पाच टक्के विद्यार्थी ऑलिम्पियाड परीक्षेच्या पुढील लेव्हलसाठी निवडले जातात. भारतातील गणित ऑलिम्पियाडमधील टॉप-१० विद्यार्थ्यांना बारा दिवसांसाठी बाहेरील देशात पाठवले जाते. गेल्या वर्षी ब्राझिल येथे बारा दिवसांच्या कॅम्पमध्ये २५-३० देशांतील विद्यार्थी आले होते.

ज्या क्लास संचालकांना किमान पाच वर्षे अनुभव आहे व दोनशे ते पाचशे विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकतात ते SOF ला संपर्क साधून परीक्षा केंद्रासाठी अर्ज करू शकता. नवीन हुशार विद्यार्थी वर्ग जोडण्यासाठी ही कल्पना नक्कीच उपयुक्त ठरू शकते.

२) स्कॉलरशिप परीक्षा

महाराष्ट्रात जवळजवळ गेल्या ३५-४० वर्षांपासून स्कॉलरशिप परीक्षा होत आहे. पूर्वी ही परीक्षा चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जायची. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून स्कॉलरशिप परीक्षा पाचवी आणि आठवी या वर्गासाठी होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेते. खरे हुशार, क्षमता असलेले विद्यार्थी शोधणे व त्यांना शिष्यवृत्ती देऊन प्रेरणा देण्याचे काम स्कॉलरशिप परीक्षा परिषद करत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून ९ ते १० लाख विद्यार्थी ही परीक्षा दरवर्षी देतात. काही मराठी शाळांमध्येच स्कॉलरशिपसाठी कोचिंग केले जाते, पण बऱ्याच इंग्लिश माध्यमाच्या शाळेत या परीक्षेचे कोचिंग होत नाही. हीच सुवर्णसंधी आहे. क्लास संचालक गणित, भाषा या विषयांचे दोन-तीन शिक्षकांची टीम बनवून स्कॉलरशिप कोचिंग सुरू करू शकतात.

शाळेसाठी आठवड्यातून दोन वेळेस दोन-दोन तास लेक्चर घेऊन जुलै ते फेब्रुवारी या ७ ते ८ महिन्यांच्या काळात असे वर्ग घेतले जातात. स्कॉलरशिप परीक्षा थोडी आव्हानात्मक आहे. दरवर्षी पंधरा ते वीस टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण होतात. शिक्षकांची विशेष तयारी असणे महत्त्वाचे आहे.

३) जवाहर नवोदय परीक्षा

जवाहर नवोदय स्कूल ही संकल्पना १९८६ साली भारत सरकारने सुरू केली. यात भारतातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय योजनेचे विद्यालय आहे. इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळते. शालेय अभ्यासाबरोबर इतर खेळ, विविध राज्यस्तरीय स्पर्धा यांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष दिले जाते.

इयत्ता पाचवीला असताना जानेवारी महिन्यात जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा होते. प्रत्येक जिल्ह्यातून ८० हुशार विद्यार्थी निवडले जातात. यात शहरी आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या जागा राखीव आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागांत यासाठी लागणारे कोचिंग क्लासेस सुरू करता येतील.

महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत विद्यार्थी चौथीत असल्यापासूनच या प्रवेश परीक्षेची तयारी करतात. म्हणजेच चौथी आणि पाचवी असे १८ ते २० महिने कोचिंग क्लासेस चालत आहेत, पण याचे प्रमाण फार कमी आहे.
तसेच इयत्ता नववीसाठीदेखील प्रवेश परीक्षा होते. यासाठी जागा कमी असतात, पण बरेच विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात.

दरवर्षी होणार्‍या यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थी संख्येत जवाहर नवोदय विद्यालयात शिकलेले विद्यार्थी सर्वात जास्त असतात. महाराष्ट्रात प्रत्येक शहरात अशा कोचिंग क्लासेसची गरज आहे. सर्व क्लास संचालकांनी स्पर्धेवर मात करण्यासाठी एकत्र येऊन आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याची गरज आहे.

संतोष बच्छाव
9321177114
(लेखक स्वतः एका क्लासेसचे संचालक आहेत.)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!