स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
कोरोनामुळे बऱ्याच व्यवसायांवर थेट परिणाम झालेला आहे. खर्च सुरू आहेत, परंतु विक्री आणि वसुली होत नाहीये. अशा वेळेस महिन्याचे निश्चित खर्च (फिक्स कॉस्ट) कमी करणे हा उद्योगात टिकून राहण्याचा महत्त्वाचा उपाय असू शकतो.
मी स्वतः खर्च कमी करण्याच्या मताचा नाही, पण सोबतच विनाकारण होणारे खर्च मात्र थेट बंद केले पाहिजेत. असे खर्च कमी करण्याचे दोन महत्त्वाचे फायदे होतात. पहिला फायदा म्हणजे खर्च कमी झाल्याने नफा वाढतो आणि दुसरा फायदा वाचलेला पैसा उद्योगासाठी गरजेच्या असलेल्या महत्त्वाच्या बाबींवर खर्च करता येतो. (ज्या खर्चांसाठी बरेचदा आपण तरतूद केलेली नसते.) परंतु कोणते खर्च कमी करायचे किंवा कोणते करायचे नाही हे ठरवायचे निकष कोणते? हा महत्वाचा प्रश्न आहे.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
आता हे करायचं कसं?
मी इथे खर्चनिहाय बोलणार नाही, पण सर्वसाधारण सगळ्या खर्चांना लागू शकेल असा एकच निकष द्यायचा प्रयत्न करणार आहे. मुळात असा एकच निकष आहे का? असा प्रश्न पडू शकतो. कदाचित हा लेख पूर्ण वाचल्यावर याचे उत्तर तुम्हाला मिळेल.
उद्योजक बऱ्याच वेळेस आपल्या उद्योगात होणाऱ्या खर्चाच्या आकडेवारीवर लक्ष ठेवून असतो. त्या खर्चाची मासिक, तिमाही, अर्धवार्षिक किंवा वार्षिक आकड्यांसोबत तुलना करून तो खर्च योग्य आहे, जास्ती आहे, कमी आहे, इत्यादी, असे निष्कर्ष काढत असतो.
लॉकडाउनमुळे ही पद्धत अमूलाग्र बदलावी लागेल. यामध्ये खर्चाचा प्रकार बघण्यापेक्षा त्यामागे होत असलेल्या गोष्टी, घटनाक्रम किंवा त्यातून प्राप्त होणारे परिणाम याकडे बघावे लागेल आणि मग ते विश्लेषण करावे लागेल. काही उदाहरणे पाहू, त्यावरून हा विषय जास्त स्पष्ट होऊ शकेल.
आपल्या कर्मचाऱ्यांना आपण प्रवासखर्च देतो, बऱ्याचदा हा खर्च निश्चित केलेला असतो. आता जर घरून काम करणे शक्य असेल आणि कार्यालयात नियमित यायची गरज नसेल तर हा खर्च कमी करून त्यांना त्याऐवजी इंटरनेट सुविधा (आणि संगणक) घरी उपलब्ध करून देता येईल.
यामुळे प्रवास खर्च तर वाचेलच, परंतु कर्मचारी कार्यालयात न आल्यामुळे कार्यालयात होणाऱ्या इतर खर्चाची बचत होऊ शकेल. उदाहरणार्थ रोजचा चहापानाचा खर्च, संध्याकाळचा नाष्टा, उशीर झाल्यास जेवण आणि उशिरा प्रवासासाठी होणारा जास्तीचा खर्च, हे सर्व खर्च आपोआप कमी होऊ शकतील. यातले काही खर्च हे निश्चित स्वरूपाचे अर्थात फिक्स कॉस्ट या स्वरूपाचे असतात.
मूळ घटनाक्रमाचे विश्लेषण आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या परिणामाचे विश्लेषण केल्यास हे साध्य करता येऊ शकते. अजून एक उदाहरण घेऊ जे यासोबतच जोडलेले आहे. कार्यालयासाठी दिले जाणारे भाडे हासुद्धा एक मोठा खर्च आहे. जर आपल्या कार्यालयातील बरेचसे कर्मचारी घरून काम करू शकत असतील, तर सध्या असलेले मोठे कार्यालय सोडून आपण छोट्या कार्यालयात आपला व्यवसाय नेऊ शकतो.
या एका निर्णयामुळे आपले भाडे, वीज, कार्यालयात कमी कर्मचारी येत असल्याने त्यांच्यासाठी गरजेचे असलेले इतर खर्च हे तर कमी होतीलच. याशिवाय सध्या करण्यासाठी आवश्यक असलेले सामाजिक अंतर अर्थात सोशल डिस्टंसिंग याचे पालनसुद्धा आपोआप करता येईल.
सर्व उद्योजकांनी आपल्या लेखा विभागासोबत किंवा लेखा सल्लागारासोबत या संदर्भात विस्तृत चर्चा केल्यास अनेक ठिकाणी होत असलेले खर्च कमी करण्यात मदत होऊ शकेल. वर सांगितल्याप्रमाणे त्या वाचलेल्या खर्चाचा उपयोग इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी किंवा उद्योगासाठी गरजेच्या असलेल्या नवीन व्यवसायिक संधी शोधण्यासाठी होऊ शकतो.
खर्च कमी झाल्याने या आर्थिक वर्षात जिथे बर्याचशा उद्योगांचा जमाखर्च (प्रॉफिट अँड लॉस अकाउंट) नुकसान (लॉस) दर्शवत असेल तिथे अशा उपायांमुळे उद्योगांना नुकसान कमी करण्यात किंवा नफा होण्यातसुद्धा मदत होऊ शकते.
नफा दर्शवणारा उद्योग असल्यास बँकेच्या दृष्टीने किंवा पुढे कर्ज मिळण्याच्या दृष्टीने ताळेबंद भक्कम (हेल्दी बॅलन्स शीट) होण्यास मदत होऊ शकते. तसेच खर्च कमी झाल्याने रोख रक्कम टिकून राहू शकते आणि सध्याच्या काळात ज्याच्याकडे जास्तीची रोख रक्कम (कॅश सरप्लस) आहे तो उद्योग आणि उद्योजक जास्त प्रगती करू शकतो.
– सीए तेजस पाध्ये
(लेखक चार्टर्ड अकाउंटंट असून MSME क्षेत्रांसाठी असलेल्या योजनांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे.)
संपर्क : 98202 00964
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.