कृषी क्षेत्रात यशस्वी ब्रॅण्ड निर्माण करणारे ज्ञानेश्वर बोडके

पुणे जिल्ह्यातील हिंजवडी आयटी पार्कजवळच पंधरा हजार लोकवस्तीचे माण नावाचे एक आधुनिक खेडे आहे. शहरामध्ये मिळणार्‍या सर्वच सुखसोयी या गावात उपलब्ध आहेत. जमिनी विकून गडगंज झालेले अनेक गुंठामंत्री या गावात ठिकठिकाणी पाहायला मिळतात. गावातील जवळपास सर्वच घरांपुढे चारचाकी गाडी दिमाखात उभी आहे.

धनिकांचा मुक्काम असलेल्या या गावाला बोडकेवाडी नावाची एक वाडी आहे. याच बोडकेवाडीत ‘अभिनव फार्मर क्‍लब’ नावाच्या संस्थेला ज्ञानेश्‍वर बोडके यांनी पंधरा वर्षांपूर्वी जन्म दिला. बड्या पगाराची नोकरी सोडून शेत व्यवसायाची कास धरलेल्या बोडकेंनी अथक परिश्रम घेऊन स्वत:ला आदर्श शेतकरी सिद्ध केले आहे.

घरात हलाखीची परिस्थिती असूनसुद्धा ज्ञानेश्‍वर बोडके हे स्वकष्टाने आर्किटेक्ट झाले. एकदा एका वर्तमानपत्रात बोडकेंनी सांगलीच्या प्रकाश पाटील नावाच्या शेतकर्‍याची यशोगाथा वाचली होती. ‘इयत्ता ८ वी शिक्षण झालेला, पायजमा, शर्ट परिधान करणारा शेतकरी दहा गुंठ्यांच्या पॉलीहाऊसमध्ये, १२ लाख रुपयांचे उत्पन्न घेतो’ या आशयाची ती यशोगाथा होती.

वर्तमानपत्रातील ही बातमी बोडकेंना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी लागलीच सांगली गाठली व प्रकाश पाटलांच्या पॉलीहाऊसमधल्या शेतीची माहिती घेतली. शेतीमध्येच आता करीअर करायचा चंग त्यांनी बांधला. घरी आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना त्यांनी शेती करण्याचा विचार सांगितला. वडिलांनी त्यांच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला. वडिलांनी लागलीच बोडकेंचा विवाह करण्याचे ठरवले.

मुलगा आर्किटेक्ट असल्याचे सांगत बोडकेंच्या वडिलांनी पूजा नावाच्या कन्येशी विवाह निश्‍चित केला. विवाह करण्याअगोदर बोडकेंनी त्यांची पत्नी पूजा यांना नोकरी सोडणार असल्याचे स्पष्ट केले होते. विवाह झाल्यानंतर बोडकेंनी नोकरी सोडली.बोडकेंनी नोकरी सोडली व लागलीच तळेगाव येथील हॉर्टिकल्चर सेंटरमध्ये नियंत्रित शेती करण्याचा कोर्स करायला सुरुवात केली.

कोर्स पूर्ण झाल्यानंतर बोडकेंनी त्याच सेंटरमध्ये विनामोबदला काम केले. या दरम्यान त्यांनी शासकीय फुलं चढ्या किमतीमध्ये विकण्याची किमया केली होती. त्यामुळे पणन बोर्डामध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. घेतलेल्या प्रशिक्षणाची अंमलबजावणी बोडकेंना त्यांच्या शेतावर करायची होती. पॉलीहाऊस निर्माण करण्यासाठी बोडकेंना १० लाखांच्या कर्जाची गरज होती. बोडकेंनी अनेक बँकांना हेलपाटे मारले. कर्ज मिळत नसल्याने बोडके हैराण झाले होते.

शेवटी त्यांनी कॅनरा बँकेच्या बगलेसाहेबांची भेट घेतली. त्यांना सर्व उपक्रम समजावून सांगितला. बगलेसाहेबांनी त्यांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळवून दिले. यासाठी त्यांनी त्यांची जमीन बँकेकडे गहाण ठेवली होती. जमीन गहाण ठेवल्याने बोडकेंचे वडील प्रचंड अस्वस्थ झाले होते. बँकेचे अधिकारी बगलेसाहेब यांनी बोडकेंच्या वडिलांना आधार दिला व कर्ज फिटणार असल्याचा आत्मविश्‍वास त्यांना दिला.

शेतावर पॉलीहाऊस बांधायला सुरुवात झाली. पॉलीहाऊसचे निर्माण झाले. ज्ञानेश्‍वर व त्यांची पत्नी पूजा यांनी सकाळी सातपासून पॉलीहाऊसमध्ये राबायला सुरुवात केली. पिकं बहरायला सुरुवात झाली. याच दरम्यान जर्मनी अ‍ॅग्रोच्या रवी अडवाणीबरोबर बोडकेंची ओळख झाली होती.

त्यांच्याद्वारे फुलांचा पहिला ५४ हजार रुपयांचा तोडा दिल्लीमध्ये बोडकेंनी विकला. चौदा महिन्यांतच बोडकेंनी १० लाख रुपयांचे कर्ज फेडले. बँकेच्या अधिकार्‍यांनी घरी येऊन बोडकेंचा सत्कार केला. बँकेच्या स्थापनेच्या इतिहासापासून झटपट कर्ज फेडणारे बोडके हे एकमेव शेतकरी आहेत.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


नाबार्डच्या साहाय्याने ‘अभिनव फार्मर क्‍लब’ची स्थापना

ज्ञानेश्वर बोडके

झटपट कर्ज फेडल्याने बोडकेंच्या बातम्या माध्यमांमध्ये सातत्याने येत होत्या. अनेक शेतकरी त्यांना नव्याने भेटत होते. गावातीलच अनेक शेतकर्‍यांनी बोडकेंच्या मार्गदर्शनाखाली पॉलीहाऊसमधील नियंत्रित शेती करायला सुरुवात केली होती. प्रगत शेतीमुळे बोडकेंचा संपर्क वाढला होता. याच दरम्यान त्यांची भेट नाबार्डच्या शेतकरी मंडळाचे मॅनेजर सुनील जाधव यांच्याशी झाली.

भेटीदरम्यान जाधव यांनी बोडके यांना शेतकरी मंडळ स्थापन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. लागलीच बोडकेंनी शेतकरी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. माणगाव परिसरातील शेतकर्‍यांना एकत्र बोलावून बोडकेंनी १५ ऑगस्ट २००४ साली ‘अभिनव फार्मर्स क्‍लब’ नावाच्या संस्थेची स्थापना केली.

क्‍लबच्या यशस्वी कामगिरीमुळे क्‍लबला पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांतील ३३० शेतकरी जोडले गेले. सध्या क्‍लबचे २३ हजार सदस्य असून ३३० कोअर सदस्य आहेत. कोअर सदस्यांमधील पंधरा सदस्य इतर राज्यांतील आहेत. सध्या अभिनव शेतकरी क्‍लबच्या अंतर्गत विविध राज्यांमध्ये ११३ विविध ग्रुप कार्यरत आहेत.

अभिनव क्‍लबचा विस्तार

आंध्र प्रदेशमधील विजयवाडा व गुंटुर या दोन जिल्ह्यांमध्ये अभिनव फार्मर क्‍लब कार्यरत आहेत. भोपाळ परिसरातदेखील क्‍लबची उल्लेखनीय कामगिरी आहे. गुजरात राज्यातील कडी व अहमदाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये संस्थेच्या सभासदांनी अभिनवचा झेंडा फडकवला आहे. कर्नाटकातील बेळगाव परिसरात व मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये अभिनव क्‍लबचे सदस्य कार्यरत आहेत.

अभिनव फार्मर क्‍लबच्या ३३० कोअर सदस्यांची तीन महिन्यांनी मीटिंग होत असते. या मीटिंगमध्ये शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्याचे काम केले जाते. मीटिंगमध्ये शेतमाल विक्री करण्यासाठीच्या अडचणींचा पाढा शेतकरी सातत्याने वाचत होते. या मीटिंगमध्येच शेतमालाची थेट विक्री करण्याचा मुद्दा पुढे आला व त्यानंतरच शेतमाल विक्रीचे नवे पैलू उदयास आले.

शेतमालाची थेट विक्री करण्याच्या ‘अभिनव’ पद्धती

सर्व्हे पद्धत : व्यापार्‍यांच्या कचाट्यातून शेतमालाची विक्री करण्यासाठी अभिनव क्‍लबच्या सदस्यांनी विविध पद्धतींचा अवलंब केला आहे. त्यातील सर्व्हे पद्धत अत्यंत प्रभावशाली असल्याचा बोडकेंचा दावा आहे. शहरी परिसरात विविध गृहनिर्माण सोसायट्यांचे सातत्याने निर्माण होत असते. या सोसायट्यांमध्ये राहणार्‍या नोकरदाराला ताजा भाजीपाला घरपोच पाहिजे असल्याचे सर्व्हे पद्धतीद्वारे लक्षात आले.

त्याचबरोबर कोणता भाजीपाला पाहिजे हेही लक्षात आले. उच्चभ्रू लोकांकडून परदेशी भाजीपाल्याची मागणी मोठ्या प्रमाणात आल्याने ब्रोकोली यांसारख्या परदेशी भाजीपाल्याची लागवड क्‍लबच्या सदस्यांच्या वतीने करण्यात आली. ‘मागणी तसा पुरवठा’ हे तत्त्व सर्व्हे पद्धतीवरून लक्षात आल्याने या भाजीपाल्याची थेट विक्री करण्यास क्‍लबच्या सदस्यांना शाश्‍वत संधी निर्माण झाली आहे.

मॉल्ससोबत करार : वाढत्या शहरीकरणामुळे ग्राहक विविध बाबी एकत्र एकाच ठिकाणी खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये जात असतात. मॉलमध्ये भाजीपाला विक्रीसाठी वेगळे दालन असते. बोडकेंच्या पुढाकारातून मॉलच्या खरेदी अधिकार्‍यासोबत अभिनवच्या सदस्यांनी करार केले आहे. त्यांच्या मागणीनुसार आकर्षक पॅकिंग करून अभिनवच्या शेतमालाची विक्री केली जाते.

विविध हॉटेलशी संलग्‍न : राज्यात हॉटेल व्यवसाय हा भाजीपाला क्षेत्राशी निगडित असलेला व्यवसाय आहे. हॉटेलचे विविध स्तर आहेत. विविध स्तरांमधील हॉटेलला वेगवेगळ्या पद्धतींचा भाजीपाला आवश्यक असतो. या हॉटेल व्यावसायिकांशी अभिनव फार्मर क्‍लब संलग्‍न आहे. हॉटेलच्या मागणीनुसार भाजीपाला पुरवला जातो. अनेक शेतकरी या हॉटेलच्या साखळीला जोडले गेले असून स्वतंत्र पद्धतीने शेतमालाची विक्री करण्यात यशस्वी झाले आहेत.

कारखानदारीसाठी डेमो पद्धत : राज्यात विविध ठिकाणी कारखानदारी वाढत आहे. या कारखानदारीमध्ये काम करणार्‍या कामगाराला ताजा भाजीपाला देण्याच्या उद्देशाने अभिनव फार्मर क्‍लबच्या सदस्यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. कारखान्यांच्या व्यवस्थापनाशी वार्तालाप करून कारखान्याच्या आवारातच क्‍लबच्या वतीने डेमो पद्धतीने भाजीपाला मांडला जातो. एका कारखान्यात सलग तीन दिवस भाजीपाला विक्रीसाठी ठेवला जातो.

भाजीपाल्याची खरेदी करणार्‍या ग्राहकाच्या मोबाइल क्रमांकाची नोंद क्‍लबच्या वतीने केली जाते. ग्राहक जोडल्यानंतर दर आठवड्याला त्याच्या मागणीनुसार त्याच्या कारखान्यात त्याला आवश्यक असलेला भाजीपाला पुरवला जातो. भाजीपाला पुरवण्यासाठी क्‍लबच्या वतीने आकर्षक बॅगचे निर्माण करण्यात आले आहे.

व्हॉइस एसएमएस पद्धत : सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. जनता या तंत्रज्ञानाशी जोडली गेली आहे. यासाठी क्‍लबच्या वतीने व्हॉइस एसएमएस पद्धत निर्माण करण्यात आली आहे. अनेक वर्षे जोडला गेलेल्या ग्राहकाच्या मोबाइल क्रमांकाची नोंद संस्थेकडे आहे. या मोबाइल क्रमांकावर संस्थेच्या वतीने व्हॉइस एसएमएस पाठवला जातो.

‘अभिनव फार्मर क्‍लबमध्ये आपले स्वागत आहे. कृपया आपली मागणी नोंदवा’ या आशयाचा व्हॉइस एसएमएस ग्राहकांच्या मोबाइलवर पाठवला जातो. ग्राहकांनी भाजीपाल्याची नोंदणी केल्यानंतर हॅश बटण दाबण्याची सूचना हा व्हॉइस मेसेज देतो व त्याची नोंदणी क्‍लबच्या पोर्टलवर नोंदवली जाते. ग्राहकांनी नोंदवलेल्या मागणीनुसार त्याला भाजीपाला पुरवठा केला जातो. माहिती तंत्रज्ञान युगात अभिनव फार्मर क्‍लब मागे नाही हे सिद्ध झाले आहे.

घरगुती ग्राहकांची साखळी : गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यतिरिक्त वास्तव्य करणारा सामान्य ग्राहकाला अभिनव क्‍लबसोबत जोडण्यासाठी घरगुती ग्राहकांची साखळी क्‍लबच्या वतीने निर्माण करण्यात आली आहे. या साखळीद्वारे सामान्य ग्राहकांनादेखील भाजीपाला पुरविण्यात अभिनव फार्मर क्‍लब यशस्वी झाला आहे.

थेट विक्रीसाठी ‘आत्मा’ची जोड : अनेक पद्धतींचा वापर केल्यानंतर क्‍लबच्या सदस्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची जोड मिळाली आहे. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ विभागाच्या वतीने शेतमालाची थेट विक्री करण्यासाठी पाठबळ मिळाले आहे. आत्माचे संचालक के.व्ही. देशमुख यांनी या कार्याला मोलाचे सहकार्य केले असल्याचे बोडके यांनी नमूद केले आहे.

आत्मा व पणन मंडळाच्या साहाय्याने पुणे शहरात भाजीपाल्याची थेट विक्री करण्यासाठी शहरातील विविध भागांत सहा दुकाने देण्यात आली आहेत. शेतमालाची वाहतूक करण्यासाठी दहा गाड्या देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त सहा पॅक हाऊस क्‍लबला देण्यात आले आहे. पुणे शहरातील विविध ५६ सोसायट्यांमध्ये क्‍लबच्या वतीने शेतमालाची थेट विक्री केली जाते.

थेट मार्केटिंग संकल्पनेची जर्मनीला भुरळ

अभिनव फार्मर क्‍लबच्या थेट मार्केटिंगच्या यशस्वी अंमलबजावणीची संकल्पना थेट जर्मनीपर्यंत पोहोचली आहे. जर्मनी येथील लुकास नावाचा युवक या पद्धतीवर पीएच.डी. करण्यासाठी आला आहे. संस्थेच्या वतीने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

क्‍लब याही कार्यात अग्रेसर असल्याने भारतीय सेंद्रिय शेतीचा अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रेलिया येथील मारी हेल्म भारतामध्ये आल्या आहेत. अभिनव फार्मर क्‍लबचा अभ्यास करण्यासाठी वर्षातून चाळीस दिवस हे पाहुणे भारतात येत असतात.

परदेशातील शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी क्‍लबच्या तीनशे सदस्यांनी परदेशवारी केली आहे. इस्रायल, चीन, स्पेन, हॉलंड, युरोप, इथिओपिया, केनिया, थायलंड यांसारख्या विविध देशांमध्ये क्‍लबच्या तीनशे शेतकर्‍यांनी भेट दिली आहे. शेतीसंदर्भातल्या अत्याधुनिक पद्धतींचा अभ्यास या क्‍लबमधील शेतकरी सातत्याने करत असल्याने क्‍लबच्या विविध शेतकर्‍यांच्या बांधावर अत्याधुनिक तंत्रज्ञान सातत्याने पाहायला मिळते.

दुधाचेदेखील थेट मार्केटिंग

शेतीचा हक्काचा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय ओळखला जातो. क्‍लबच्या वतीने ‘अभिनव दूध’ नावाचे दूध मार्केटमध्ये काही वर्षांपूर्वी सादर करण्यात आले आहे. अनेक दुग्ध व्यावसायिक अभिनव फार्मर क्‍लबला जोडले गेले आहेत. वरील सर्वच बाबींचे अनुकरण दुधाची विक्री करण्यासाठी केले जाते.

– ज्ञानेश्वर बोडके
संपर्क : ९४२२००५५६९


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?