इनव्हिजिबल गोरिला

हार्वर्ड विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या ख्रिस्तोफर काब्रीस आणि डॅनियल सिमन्स यांनी इनव्हिजिबल गोरिला, अर्थात अदृश्य गोरिला नावाचा एक प्रयोग केला. या प्रयोगात लोकांना एका खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले. पांढरा शर्ट घातलेले ३ आणि काळा शर्ट घातलेले ३ असे ६ जण हा खेळ खेळत होते. त्यांच्याकडे २ चेंडू देण्यात आले होते.

एकमेकांमध्ये जागा बदलत ते चेंडू फेकत आणि झेलत होते. पाहणाऱ्याला त्यातील पांढरा शर्ट घातलेल्या खेळाडूंनी किती वेळा चेंडू फेकला हे केवळ लोकांना मोजायचे होते. ज्या लोकांनी चेंडू बरोबर मोजले त्यांना पुढे एक प्रश्न विचारण्यात आला, तो म्हणजे तुम्हाला गोरिला दिसला का?

होय, ते लोक खेळत असताना त्या सगळ्यांच्या मधून एक गोरिलासारखे कपडे घातलेला माणूस एकीकडून दुसरीकडे गेला. इतकेच नव्हे तर त्याने थांबून मोजणार्या कडे बघून (मधले चित्र) छाती बडवल्यासारखे केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांनी अगदी लक्ष केंद्रित करून चेंडू कितीदा फेकला गेला ते बरोबर मोजले त्यातील अर्ध्याहून अधिक जणांना गोरिला मुळीच दिसला नाही.

या प्रयोगातून व्यावसायिकांना बरेच काही शिकण्यासारखे आहे. बऱ्याचदा असे होते की स्टार्टअप चालवताना किंवा स्टार्टअपमध्ये काम करताना भरपूर काम करावे लागते. आपण अगदी लक्ष केंद्रित करून रात्रंदिवस आपल्या हातातले काम करत असतो; पण अशाच एखाद्या वेळी मधून गोरिला निघून जातो, म्हणजे एखादी अगदी महत्त्वाची आणि मोठी गोष्ट राहून जाते आणि ती आपल्याला कळतदेखील नाही.

एकाग्रचित्ताने काम करत असल्याने आपण करत असलेल्या कामाबद्दल मनात एक समाधान असते, त्यामुळे असा कुठला गोरिला आपल्या समोरून जात असेल हे आपल्या मनातदेखील येत नाही.

अशी चूक प्रामुख्याने अकाऊंटिंग आणि कम्प्लायन्सेसच्या बाबतीत होते. व्यवसाय सुरू केल्यानंतर प्रत्येक व्यावसायिकाला त्या व्यवसायासंबंधित काही कागदपत्रे योग्य वेळी सरकारकडे जमा करावी लागतात. ही कागदपत्रे आपल्या व्यवसायाच्या नोंदणीच्या प्रकारानुसार उदा. प्रोप्रायटरशिप, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यासाठी वेगवेगळी असतात. फॉर्म ३, फॉर्म ८, फॉर्म ११ हे अशा कागदपत्रांचे उदाहरण होय. याचे अतिशय सुस्पष्ट नियम असतात.

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख दिलेली असते आणि त्या तारखेनंतर दर दिवशी ५० ते १०० रुपये इतका दंड आकारला जातो. व्यावसायिकाला ई-मेलद्वारे नोटीस पाठवून त्याची आठवण करून दिली जाते. तरीही बराच काळ काही प्रतिसाद न आल्यास कंपनीचे बँक अकाऊंट सील करणे, व्यावसायिकाचा DIN नंबर रद्द करणे इथपर्यंत कार्यवाही केली जाऊ शकते.

अशाच प्रकारच्या इतर अनेक चुका व्यवसायात होऊ शकतात. त्याची भरपाई करणे नंतर आर्थिकदृष्ट्या त्रासदायक असते, त्यामध्ये बराच वेळ खर्ची पडतो. व्यवसाय नाजूक स्थितीमध्ये असताना अशा प्रकारचे काही उद्भवल्यास व्यावसायिकाचे मानसिक खच्चीकरणसुद्धा होऊ शकते. यासाठी व्यावसायिकाने कितीही कामात व्यस्त असले तरी सर्व गोष्टींचे भान राखणे अत्यंत आवश्यक आहे.

सामान्यतः अशा चुका या नकळतपणे न होता व्यावसायिकाच्या अगदी डोळ्यासमोर होतात. बर्याकचदा अशा नोटिसांचे ईमेल या प्रयोगातील गोरिलाप्रमाणे अगदी समोर येतात, ते उघडलेही जातात; पण त्या वेळी समोर असलेल्या अति महत्त्वाच्या कामामुळे अशा ‘गोरिला ईमेल्स’कडे दुर्लक्ष होते.

अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी प्रत्येक व्यावसायिकाने दररोज कमीत कमी ५ मिनिटे अगदी काहीही न करता शांत बसले पाहिजे. आपल्या दिवसाच्या कामांच्या यादीत पाच मिनिटे शांत बसणे हेसुद्धा काम म्हणून घेतल्यास त्याचा मोठा फायदा होतो. या वेळी मोबाइल इत्यादी पूर्णपणे बाजूला ठेवून कोणाशी न बोलता व्यावसायिकाने एकांतात बसणे महत्त्वाचे आहे. ‘चेंडू किती वेळा फेकला जातोय’ हे मोजणे काही मिनिटांसाठी थांबवले, की गोरिला आपोआप दिसतोच.

अशा वेळी दिवसभरातल्या दुर्लक्ष झालेल्या पण महत्त्वाच्या गोष्टी आपोआपच आठवतात. त्यांची तत्काळ नोंद करून घेऊन दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात ते टाकता येते. अशा प्रकारे गोरिला बघण्यासाठी दिलेली पाच मिनिटे व्यवसायासाठी उपकारक ठरून बरीच आर्थिक आणि मानसिक ओढाताण वाचवू शकतात. तसेच या छोट्याशा वेळेत व्यवसाय पुढे नेण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण ‘आऊट-ऑफ-बॉक्स’ कल्पना मनात येतात ते वेगळेच. मग? गोरिला पाहण्यासाठी ५ मिनिटे देणार ना?

– प्रतीक कुलकर्णी

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?