चांगल्या सवयी कशा लावाव्या?

आपण नेहमी म्हणत असतो, मला लवकर उठायचंय, वजन कमी करायचंय, सकस आहार घ्यायचाय, निदान महिन्यातून एकतरी पुस्तक वाचायचंय, नवीन काही शिकायचंय, वगैरे वगैरे… मग आपणच म्हणतो ‘पण वेळ कुणाकडे आहे हे करायला!’ आणि नेहमीच्या सवयींच्या दुष्टचक्रात अडकतो. झोपणं, जेवणं, काम करणं आणि टाईमपास करणं! आपल्या हातात असलेले चोवीस तास वापरून या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडावं हे आता आपण पाहूया.

१. चांगल्या सवयींना ओळखा

सर्वात आधी आपल्याला कोणती चांगली सवय लावायची आहे हे ओळखा. आणि मग त्या सवयीचा पूर्ण विचार करा. म्हणजेच जर तुम्हाला योगासनं करून फिट रहायचं असेल तर दिवसातून किती वेळ योगासनांना देण्याची गरज आहे, कोणती योगासनं करणार, कुठे करणार, इत्यादी.

२. फायनल ठरवा आणि मनाची तयारी करा

विचारांत एखादी गोष्ट खूप छान आणि सोपी वाटते. पण ती गोष्ट आता प्रत्यक्षात आणायचं ठरवा. हवं तर तुम्हाला रोज दिसेल अशा कोणत्यातरी ठिकाणी लिहून ठेवा. आणि रोज ती वाचा. एक लक्षात ठेवा, नवी सवय लावणं म्हणजे नेहमीच्या सवयींमध्ये बदल करणं. या बदलला मनापासून स्वीकारा, आणि काहीही झालं तरी ही नवीन सवय सोडायची नाहीच असा निर्धार पहिल्या दिवशीच करा.

३. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी शोधा

एखादी नवीन सवय लावण्यापूर्वीच अशा गोष्टींचा विचार करा ज्यामुळे तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं. यामुळे जेव्हा खरोखर ती गोष्ट तुमच्या आड येईल, तेव्हा ती ओळखून तुम्ही तिला बाजूला साराल. उदा. तुम्हाला पुस्तक वाचण्याची सवय लावायची आहे.

पण तुम्हाला माहीत आहे की पुस्तक वाचण्यासाठी काढलेल्या वेळात तुम्हाला टीव्ही लावावा असं वाटू शकतं, मित्रांशी गप्पा मराव्याश्या वाटू शकतात, सोशल मीडियावर वेळ घालवावा असंही वाटू शकतं. या आणि अशा इतर गोष्टींचा तुम्ही आधीच विचार केला असेल तर पुस्तक वाचण्याऐवजी जेव्हा तुम्हाला टीव्ही लावावा असं वाटेल तेव्हा तुम्ही स्वतःला नियंत्रित करू शकाल.

४. योजना आखा

नवीन सवय लावायची म्हटलं की त्यासाठी चोवीस तासांऐवजी सव्वीस तासांचा दिवस होऊन तुम्हाला वेळ मिळणार नाहीये. तर तुमच्या हातात असलेले चोवीस तासच तुम्ही वापरू शकता. त्यामुळे नवीन चांगली सवय लावण्यासाठी तुम्हाला निदान एक तरी वाईट सवय सोडावी लागेल.

जसं तुम्ही आठ तास झोपत असाल तर सातच तास झोपून एक तास नवीन सवयीला देऊ शकता. तुमच्या दिनाचर्येचा नीट अभ्यास केलात तर किमान एक तास तरी तुम्हाला नक्कीच काढता येईल.

५. स्वप्नं बघा

होय, स्वप्नं बघा. तुम्हाला जी नवीन सवय लावायची आहे ती एक वर्ष सातत्याने केल्यावर तुम्ही कसे असाल याचं स्वप्नं बघा. जसं एक वर्ष रोज एक तास व्यायाम केला तर मी एका वर्षाने कशी दिसेन/ कसा दिसेन याचं चित्र तुमच्या डोक्यात रंगवा. रोज हे स्वप्नं बघा आणि स्वतःला सांगा, येस आय कॅन डू इट! याने तुमच्यातला आत्मविश्वास तर वढेलच शिवाय ठरवलेली सवय लावण्याची तुमची इच्छा आणखीन प्रबळ होईल.

६. कुणाची मदत लागणार आहे, याची यादी करा

तुम्हाला नवीन सवय लावण्यासाठी, त्यात सातत्य राखण्यासाठी कुणा-कुणाची मदत लागणार आहे याची एक यादी बनवा. उदा. तुम्ही व्यायाम करणार असाल तर एखाद्या ट्रेनरची गरज आहे का, तुम्हाला मोटिव्हेट करण्यासाठी एखाद्या जवळच्या मित्र-मैत्रिणीला, नवरा/ बायकोला किंवा इतर कुणाला तुम्ही हे सांगणार आहात का, याचा विचार करा. त्यांच्याशी बोला आणि मग सुरुवात करा!

७. तुमचं बक्षीस ठरवा

बऱ्याचदा असं होऊ शकतं की तुम्हाला कंटाळा येईल, तुम्ही थकाल, इतर कारणांमुळे वेळ कमी मिळेल, वगैरे वगैरे. पण अशा वेळी स्वतःला नियंत्रित करून त्या सवयीत खंड पडू नये म्हणून स्वतःला बक्षीस द्या. जसं आठवड्यातून एक दिवस या सवयीला सुट्टी द्या, स्वतःचं कौतुक करा, म्हणजेच असं काही करा ज्याने तुम्ही रिफ्रेश व्हाल.

लक्षात ठेवा, सुरुवातीला कदाचित तुम्हाला हे कठीण जाईल, कंटाळा येईल, पण ध्यास सोडू नका. एखादी गोष्ट न करणं खूप सोपं आहे, पण ती करणं तितकंच कठीण. आणि फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ती गोष्ट सातत्याने फार खंड न पडता कराल आणि हो, एक नवीन सवय लावून थांबू नका! एक नवीन सवय लावलीत का काही दिवसांनी दुसरी लावा, मग तिसरी आणि हे सुरू ठेवा. यामुळे तुम्ही उत्तमोत्तम होत जाल व नक्कीच जलद गतीने प्रगती कराल!

– शैवाली बर्वे

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?