व्यवसाय का नोकरी, हा प्रश्न कधी पडलाय का?

व्यवसाय का नोकरी? हा प्रश्न वयाच्या विशी-पंचविशीमध्ये किती लोकांना पडला आहे?

व्यवसाय करावा की नोकरी, या प्रश्नाचा नीट विचार करणे गरजेचे आहे. व्यवसाय व नोकरी या दोन्हींचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे रोजगार. प्रत्येकाला उदरनिर्वाहासाठी रोजगाराची आवश्यकता असते, पण तो मिळवायचा कसा याचा विचार करणे गरजेचे आहे. तो सामान्यपणे कधीही केला जात नाही.

आपल्या संस्कृतीत रोजगार हा परंपरेनुसार केला जाण्याची पद्धत आहे. पूर्वी कुंभाराचा मुलगा कुंभार, गवंड्याचा मुलगा गवंडी आणि पुरोहिताचा मुलगा पुरोहित अशी पद्धत होती. आता डॉक्टरला आपल्या पुढच्या पिढीने डॉक्टर व्हावे असे वाटते, वकिलाच्या घरात वकीलच जन्म घेतो तसेच उद्योजक वा व्यापार्‍याला आपल्या मुलाने आपला धंदा पुढे चालवावा आणि सरकारी अधिकार्‍याला आपल्या मुलाला मोठे अधिकारीच व्हावेसे वाटते.

अशाप्रकारे आपण नोकरी की व्यवसाय या प्रश्नाकडे पूर्वग्रह ठेवून बघत असल्यामुळे अशाप्रकारे रोजगार निवडल्यामुळे त्यात मनापासून उतरून काम करण्याची व यशस्वी होण्याची उमेद न राहता आपल्या पेशाकडे आपण फक्त पोट भरण्याचे व इतर गरजा भागवण्याचे साधन म्हणूनच बघतो.

नोकरी ही कोणत्या ना कोणत्या उद्योगातूनच जन्माला येते. मग त्या उद्योगाची मालकी व्यक्तिगत असते वा एखाद्या समूहाची असते किंवा सरकारची. अशा उद्योगांमध्ये अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

नोकरदार हा आपला वेळ व कौशल्य उद्योगाला देतो व त्याच्या मोबदल्यात पगार घेतो. मात्र उद्योजकाला मिळणारा मोबदला हा नोकरदाराला मिळणार्‍या पगारापेक्षा बराच जास्त असू शकतो.

याचे कारण… उद्योजक हासुद्धा नोकरदाराप्रमाणेच आपला वेळ व कौशल्य देतो, पण त्यासोबत तो एक गोष्ट जास्त देत असतो ते म्हणजे उद्योगातला धोका स्वीकारतो. व्यवसायातली गुंतवणूक, विविध व्यावसायिक निर्णय, त्या निर्णयांचे बरे-वाईट परिणाम इत्यादी सर्व गोष्टींची जबाबदारी ही व्यावसायिकाची म्हणजेच मालक वर्गाची असते. उदा. एखादे प्रॉडक्ट बाजारात आणले व ते चालले नाही तरी त्यातून होणार्‍या नुकसानाचा फारसा परिणाम नोकर वर्गाच्या पगारावर होतोच असे नाही.

रोजगाराचे साधन म्हणून निवड करताना वरील मुद्द्याचा विचार करणे गरजेचे आहे. आपण जर पुढाकार घेणार्‍या आणि धोका पत्करणार्‍या वृत्तीचे असू तरच उद्योग क्षेत्रात पदार्पण करावे, अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते.

नोकरीमध्ये आपल्या मेहनतीचा परतावा म्हणून जो पगार मिळतो, त्याची काही वैशिष्ट्ये असतात. उद्योजकाच्या परताव्यापेक्षा तुलनेने पगार हा कमी असला तरीही त्यात निश्चिती असते. ठरलेल्या दिवशी ठरलेली रक्कम आपल्याला पगार म्हणून मिळते. तिच्या विनियोगाची योजना करता येऊ शकते.

उद्योजकाला मिळकतीमध्ये निश्चिती असणे कठीण आहे. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काही वर्षांत तर त्याला नोकरदार वर्गापेक्षाही बराच कमी मोबदला मिळतो. स्वतःच्या अनेक गरजांना मुरड घालावी लागते. उद्योजक होण्याचा विचार करणार्‍यांनी ही गोष्ट ठळकपणे लक्षात ठेवली पाहिजे.

उद्योजकीय मानसिकता

सामान्यपणे मराठी घरांमध्ये नोकरीला प्राधान्य असते. त्यामुळे मराठी समुदायात उद्योजकांपेक्षा नोकरदारांचे प्रमाण तुलनेने बरेच जास्त आढळते. त्यामुळे तुम्ही उद्योजक होण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला उद्योजकीय मानसिकता समजून घ्यावी लागेल व स्वत:चीही मानसिकता तशी घडवावी लागेल.

सामान्यपणे आपण ज्या गोष्टींकडे नकारात्मक दृष्टीने पाहत आलो आहोत, उद्योजकीय जीवनात त्या गोष्टींकडे नव्या दृष्टिकोनातून पाहता आले पाहिजे. उदा. कर्ज, पैसा इत्यादी आपल्याला कधीच नकोसा वाटतो, पण व्यावसायिकाला अधिकाधिक पैसा व वेळोवेळी मोठ्यात मोठी कर्जे ही गरजेची असतात. कर्जबाजारी माणसाकडे आपण तुच्छतेने पाहतो, पण उद्योगात कर्जाशिवाय प्रगती साधणे महत्कठीण आहे.

आपले नातेवाईक व मित्रमंडळींमध्ये बहुतांश नोकरी करणारे असतील तर आपल्याला आपले वर्तुळ बदलण्याची गरज आहे, कारण त्यांना तुमचे जीवन, विचारसरणी व समस्या हे कळणे खूप कठीण आहे. आठ तासांच्या नोकरीनंतर त्यांना कामाचे नाव घ्यायलाही आवडणार नाही, पण तुम्ही मात्र २४ु७ मनाने फक्त स्वतःच्या व्यवसायात गुंतलेले असाल.

उद्योजकीय जीवनाला सुरुवात केल्यावर तुम्हाला इतर उद्योजकांमध्ये मिसळणे गरजेचे आहे. उद्योजकांच्या संस्था, विविध चेंबर्स, बिझनेस नेटवर्किंग क्‍लब्ज, इत्यादी ठिकाणी तुम्हाला असे नवे उद्योजक मित्र भेटू शकतील. अशा एखाद्या तरी संस्थेशी जोडले जा.

नोकरी सोडून व्यवसाय करावा का?

अनेक जणांना आपली चालू असलेली नोकरी सोडून व्यवसाय करायचा असतो. अशांनी आपल्या मनाची काही मूलभूत गोष्टींसाठी तयारी करणे गरजेचे आहे. त्यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी वर सांगितलीच आहे की, नोकरी करत असताना तुम्हाला ठरावीक दिवशी हातात ठरावीक रक्कम येण्याची सवय लागलेली असते.

व्यवसायात सुरुवातीची काही वर्षे तरी अशी अपेक्षा ठेवू नका. नोकरीत असताना महिनागणिक बचत खात्यात आणि इतरत्र गुंतवणुकीत बॅलन्स वाढता पाहण्याची सवय झाली असेल. स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यावर दिवसागणिक तुम्हाला खात्यातली रक्कम कमी होताना तसेच सोन्यासकट इतर गुंतवणुकी तुटताना दिसतील.

मोठ्या पल्ल्याचे गृहकर्ज घेऊन विकत घेतलेले घर वेळप्रसंगी व्यवसायासाठी तारण ठेवावे लागू शकेल. आजपर्यंत जी मित्रमंडळी-नातेवाईक तुमच्या येण्याची वाट पाहायचे ते आता तुम्हाला कटवण्यासाठी एक-एक क्‍लृप्त्या काढतानाही पाहायला मिळू शकतील.

वर नोकरी आणि व्यवसाय यातील फरक सांगताना हाच मूळ मुद्दा मांडला होता की, उद्योजकाला अनेक प्रकारचे धोके पत्करावे लागतात. त्यामुळे नोकरी सोडून व्यवसाय करणार असाल तर आधी मनाची अशा प्रकारचे वेगवेगळे धोके पत्करण्याची तयारी करा.

नोकरीसोबत जोडव्यवसाय करावा का, असेही बरेच जण विचारतात.

अशांनी आपल्याला उपलब्ध वेळ व त्यातून आपल्याला काय उद्दिष्ट साध्य करायचे आहे, हे ठरवून सुरुवात करावी. तुम्हाला जर फेसबुक, गुगलसारखे यशस्वी स्टार्टअप किंवा टाटा, बिर्लांसारखे उद्योजकीय साम्राज्य उभे करण्याची इच्छा असेल तर जोडधंदा म्हणून अशी साम्राज्ये उभी राहू शकत नाहीत. जोडधंदा म्हणून तुम्ही दुसर्‍यांनी सुरू केलेल्या व्यवसायांतच भागीदार म्हणून काम करू शकता.

जसे की, विमा कंपनीसोबत जोडले जाऊन त्यांचे प्रतिनिधी म्हणून कमिशन तत्त्वावर काम करणे किंवा एखाद्या कंपनीचे फ्रीलान्स विक्री प्रतिनिधी होणे वगैरे. जर तुमची उद्योजकीय स्वप्ने मोठी असतील, तर नोकरीला लाथ मारून शून्यातून विश्‍व उभे करण्याची धमक ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न : व्यवसाय कोणता करू?

विविध प्रकारच्या उद्योगसंधींचा शोध घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय आपण जेथे व्यवसाय करणार आहोत, तिथल्या स्थानिक गरजांचा परिपूर्ण अभ्यास गरजेचा आहे. जिथे एखाद्या गोष्टीची गरज आहे त्या ठिकाणी तो व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे.

कोणता व्यवसाय करू याचे कोणतेही एक उत्तर असू शकत नाही. उष्ण भागात आइस्क्रीम विक्रीचा धंदा जितका चालेल, तितका थंड हवेच्या ठिकाणी नाही. त्यामुळे आपण जिथे व्यवसाय करणार तिथल्या गरजांचा विचार करणे गरजेचे आहे.

तुम्ही एखादा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला स्टार्टअप विश्‍वाबद्दल जुजबी तरी माहिती असणे गरजेचे आहे. सामान्य छोटे व्यवसाय, व्यापार व स्टार्टअप यांच्यात बराच फरक आहे. स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी एखादा स्टार्टअप कोर्स करणे खूप फायद्याचे ठरू शकते. भारत सरकारतर्फे ‘स्टार्टअप इंडिया’च्या संकेतस्थळावर व अ‍ॅपवर इंग्रजी व हिंदी भाषेमध्ये असा स्टार्टअप कोर्स पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.

नोकरी व व्यवसाय याबाबत एकच मुद्दा महत्त्वाचा आहे. उद्योजक म्हणून होणारे लाभ बरेच आहेत. ती एक स्वतंत्र जीवनशैली आहे, पण याचा अर्थ नुसते ‘नोकर्‍या सोडा आणि उद्योजक व्हा’, असा आततायी धोशा सध्या सुरू आहे. त्याला भुलून तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका. योग्य विचार करून आणि स्वत:चा स्वभाव, प्रवृत्ती, आवड इत्यादी सर्व गोष्टींचा विचार करूनच स्वत:चे भविष्य ठरवा. उद्योजक होण्याचा निर्णय तर पूर्ण विचारांती व धाडसाने घेण्याची गरज आहे. पुढे यश तुमची वाटच पाहते आहे.

– शैलेश राजपूत

Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?