सायकल दुरुस्त करणारा नागेश आज चालतोय स्वतःचे स्टार्टअप


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपल्या सर्वांचं एक स्वप्न असतं. शिक्षण घ्यायचं इंजिनिअरिंग किंवा एमबीए करायचं. एक छानशी सहा आकडी पगार असलेली नोकरी मिळवायची आणि पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी सेटल व्हायचं. एका सामान्य कुटुंबातल्या नागेशलासुद्धा बी.कॉम. करून एमबीए व्हायचं होत, पण सहा आकडी पगाराची नोकरी करण्यासाठी नाही तर एखादा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करता यावा यासाठी.

लहानपणीच धीरूभाई अंबानींची मनावर पडलेली छाप, कॉलेजला गेल्यावर वारेन बफे यांची तत्त्वे कळल्यानंतर आपणही उद्योजक व्हावं, हे त्याने मनाशी पक्कं केलं होतं. नुकतीच बारावी उत्तीर्ण होऊन बी. कॉमच्या पहिल्या वर्षात दाखल झालेल्या नागेश बुद्धेच्या मनात नवीन काहीतरी सुरू करावे.

एखादे इन्टरनेट कॅफे उघडावे का या प्रयत्नात असताना कौटुंबिक कलहामुळे वयाच्या अठराव्या वर्षीच कौटुंबिक व्यवसाय असलेल्या सायकलीच्या दुकानाची जबाबदारी घ्यावी लागली. अचानक आलेली जबाबदारी, कुटुंब तुटल्यामुळे आलेलं कर्ज हे कमी म्हणून की काय ट्युशनवरून परतताना मोटार सायकलचा अपघात झाला.

यात उजवा पायला गंभीर दुखापत झाली, त्यावर शस्त्रक्रिया आणि ऐन उमेदीच्या काळात नागेशला सहा महिने बेड रेस्ट घ्यावी लागली. भविष्यात नीट चालता-पळता येईल का नाही याची शाश्वती नसताना हिंमत न हरता लवकरात लवकर पुन्हा सायकलीच्या दुकानात रुजू झाला.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

व्यवसाय-व्यापाराची घडी बसवता बसवता नागेशने दुकानात अभ्यास करून फक्त परीक्षेला हजेरी लावून बी.कॉमची पदवी मिळवली आणि वडिलांच्या छत्रछायेखाली व्यवसायाचे धडेही…

नुसत्या लौकिक शिक्षणावर थांबेल तो नागेश कसला! नागेशच्या मनात नेहमी नवीन काहीतरी व्यवसाय करावा, लोकांना मदत करावी असा विचार घोळत होता. सातत्याने नवीन काहीतरी शिकत राहणे, यशस्वी उद्योजकांची चरित्र वाचणे, नवनव्या व्यवसायाची संधी शोधणे असे उद्योग सुरूच होते, परंतु गेली चार-पाच वर्ष झाली काहीतरी नवीन व्यवसाय करावा म्हणून प्रयत्न करत असतानाही एखादा व्यवसाय ठरायचा आणि काहीतरी कारणामुळे तो सुरूच व्हायचं नाही.

प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे स्ट्रगल असतात, पण नागेशचा स्ट्रगल वेगळाच आहे. इतरांचे व्यवसाय सुरू व्हायचे आणि बंद पडायचे, पण याचं मात्र विचित्रच होत; व्यवसायच सुरूच होत नव्हता. यातच नागेशला एक नैराश्य येत होतं, दिशाहीन वाटत होतं. पुढे काय करावं आणि काय नाही याची गाठ काय सुटत नव्हती.

लहानपणी झालेल्या संस्काराची प्रचिती आली आयुष्याच्या या वळणावर पुन्हा स्वामी विवेकानंदांच्या विचाराने दृष्टी मिळाली. याच काळात अध्यात्मिक गुरूही भेटत गेले. अशाच प्रयत्नात असताना उद्योजक शरद तांदळे यांची भेट झाली.

आपल्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आणि इंग्लंडच्या प्रिन्सकडून ‘तरुण उद्योजक’ म्हणून पुरस्कृत झालेल्या व्यक्तिमत्वाची भेट अविस्मरणीय ठरली. त्यांच्याबरोबर झालेली चर्चा फारच ऊर्जादायी होती.

एक दिवस दोन इंजिनिअर मित्रांबरोबर गप्पा मारत असताना असं कळलं की त्यांना फेसबुक पूर्ण वापरता येत नाही, म्हणजे फक्त लाईक आणि कमेंट इतकंच ते वापरतात. मी चेष्टेत म्हाणालो तीनशे रुपये फी द्या शिकवतो. नंतर एक गोष्ट लक्षात आली की त्याच्या जवळपास निम्म्या तरी मित्रांची फेसबुक आणि जीमेलची खाती त्यानेच काढून दिली होती.

नागेश बुद्धे

आपल्यासारख्या तरुणांची ही अवस्था आहे, तर मग आपल्या वडिलांच्या वयाच्या लोकांचा कसं असेल? समजा एखाद्याला आपल्या व्यवसायाची फेसबुकवर साधी प्रोफाईल करायची असेल तर? यातच नागेशला संधी दिसली. ही पण एक सेवा असू शकेल का? आपण लिहिलेलं लेख लोकांना आवडतात, पण फेसबुक शिकवण्यासाठी आपल्याला कोण पैसे देईल? मग असं काही आहे का किंवा असू शकतं का? असे नानाविध प्रश्न त्याला भेडसावू लागले.

‘गुगल’बाबाची मदत घेतली. अभ्यास केला. मग उमगलं सोशल मीडिया मार्केटिंग, इंटरनेट मार्केटिंग, पुढे जाऊन सर्च इंजिन मार्केटिंग-SEO. सायकलच्या दुकानात बसून लॅपटॉपवर बोटं फिरवता फिरवता नागेशला एक एक गोष्ट उमगत होती.

नागेशला आयटीची आवड लहानपणापासून होती. कॉम्पुटर फंडामेंटल, नेटवर्किंग, कोडिंग यांची तोंडओळख होतीच. नागेशचे बरेच मित्र आयटीतच होते. ठरलं मग पूर्ण वर्ष या गोष्टी शिकण्यात घातल्या. मोठ्या भावाच्या इन्स्टिट्यूटमध्ये या वयात विद्यार्थी म्हणून कोडिंगच शिक्षण घेतलं. दहा दिवसात एच.टी.एम.एल. शिकून झालं.

‘विक्रम अ‍ॅनालॅटिक्स’ ही नव्या नावाची तसेच नवीन प्रकारची सेवा देणारी कंपनी स्थापन केली. त्याच्या या कंपनीत मुख्यत्वे डिजिटल मार्केटिंग सेवा दिल्या जातात. आधीच्या व्यवसायाचा अनुभव होताच. व्यवसाय कधीच स्थिर नसतो कोणत्या महिन्यात जास्त तर कोणत्या महिन्यात कमी होत असतो. आयुष्यात थांबून कसे चालेल. नवी वाट, नव्या दिशा चोखाळून बघितल्याशिवाय जग कळणार कसं?

आज ‘विक्रम अ‍ॅनालॅटीक्स’ने मागील पाच वर्षांत पन्नासपेक्षा जास्त व्यवसायांना मदत करून व्यवसायवृद्धी करून दिली आहे. फक्त आणि फक्त विश्वासार्हतेच्या जोरावर आता एक भक्कम ‘टीम विक्रम’ तयार झाली आहे. ‘विक्रम अ‍ॅनालॅटिक्स’ने सरसकट सर्व क्षेत्रांसाठी काम करण्याऐवजी फक्त रियल इस्टेट क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. ते याच क्षेत्रातील ग्राहकांना सेवा पुरवतात.

आतापर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद या शहरातील खूप बांधकाम व्यवसायिकांना नागेशने मदत केली आहे. मुळातच रियल इस्टेट व्यवसाय हा हाय तिकीट गेम आहे. इथे गुंतवणूकही मोठी आणि विक्रीही मोठ्या किमतीची आहे. खरी मेख तर अशी आहे की कोविडनंतरही रियल इस्टेटमध्ये मागणी जोर धरत असताना मात्र प्रोजेक्ट बुकिंग होत नाहीत. इथे आपण बिल्डर आणि डेव्हलपरची चूक आहे असे नागेश ठाम पणे सांगतो.

रियल इस्टेट व्यवसायातील प्रत्येक निकड नागेशने बांधली आहे आणि याच जोरावर तो बिल्डर आणि डेव्हलपरना पूर्णपणे मदत करू शकतो. उत्तम मार्केटिंग करून प्रोजेक्ट लोकांपर्यंत पोहचवणे, टीम ट्रेनिंग करून त्याचे विक्रीत रुपांतर करणे आणि या धावपळीत रियलेटर्सचा ताण कसा कमी होईल याचे कन्सल्टिंगही उत्तम प्रकारे नागेश देत आहे.

आज नागेश व टीम विक्रमकडे पाहिल्यावर कळते की आयुष्यात यश हे काही एक ठिकाण नाही. हा एक प्रवास आहे. यात चढउतार खाचखळगे असणारच, परंतु प्रवास महत्त्वाचा आहे. यातूनच आपल्या मर्यादा आणि बलस्थाने खुलून येतात.

झालेला अपघात विसरून पुन्हा शारीरिक तंदुरुस्ती मिळवून महाराष्ट्रातील बहुतेक गड-किल्ले नागेशने ट्रेक करून सर केले आहेत. उद्योगात किंवा व्यक्तीगत आयुष्यात मिळालेले अपयश न लपवता खुलेपणाने सांगतो आणि त्यातून शिकून उभारी घेतो अशा दिलखुलास व्यक्तिमत्वामुळे नागेश सहजच सर्वांना आपलेसे करून घेतो.

संपर्क – 9960377005

error: Content is protected !!
Scroll to Top