कथा उद्योजकांच्या

१० x १० च्या भाड्याच्या खोलीत राहणारा संतोष आज आहे हॉटेल आणि रिसॉर्टचा मालक

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


संतोष कामेरकर म्हणजे भारदस्त आवाज, प्रेरणादायी भाषण आणि लोकांनी मनं चेतवणारं एक प्रभावी व्यक्तिमत्त्व. शून्यातून सुरुवात करून करोडपती, अब्जोपती होणार्‍यांच्या अनेक कहाण्या आपण भाषणांतून आणि पुस्तकांतून ऐकत-वाचत असतो; परंतु वास्तवात अशा माणसाशी भेट होण्याचा आणि संवाद साधण्याचा योग आला.

लहानपणीची गरीबीत नातेवाईकांच्या घरी झालेल्या एका अपमानातून एक शालेय वयीन मुलगा जिद्दीने पेटून उठला आणि ‘संतोष कामेरकर’ म्हणून एक उद्योजक, व्यापारी, प्रशिक्षक, संघटक, गुंतवणूकदार या रूपांत स्वत:चे अस्तित्व निर्माण केलं.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

अमिताभ बच्चनच्या १९७०-८० च्या दशकातल्या एखाद्या सिनेमाला शोभेल असाच जीवनप्रवास आहे संतोष कामेरकर यांचा. त्यांच्या या प्रवासातून अनेक तरुणांना गरीबीचा बागुलबुबा न करता जिद्दीने स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल.

वयाच्या तिसर्‍या वर्षी कामेरकर यांचे वडील वारले. त्यानंतर आपल्या शालेय वयीन मुलाला आणि मुलीला घेऊन त्यांची आई रत्नागिरीहून मुंबईत आली. अठराविश्वे दारिद्र्य असल्यामुळे तेव्हा त्यांना वांद्र्याला बहिरामपाड्यात भारत नगरमध्ये भाड्याच्या १० x १० च्या खोलीत राहावं लागलं. अशा वातावरणात मुलं बिघडण्याचीच शक्यता जास्त, पण संतोष यांच्या आईच्या संस्कारांमुळे ही दोन्ही मुलं त्या वातावरणापासून स्वत:ला दूर ठेवू शकली.

वयाच्या तेराव्या वर्षांत असताना संतोष आपल्या लहान बहिणीसोबत एका नातेवाईकांकडे दिवाळसणाला गेले होते. बहिण लहान असल्यामुळे तिने समोर ताटात ठेवलेल्या मिठाईसाठी हट्ट केला आणि समोर आणलेली मिठाई जवळजवळ खेचूनच घेतली. आतल्या खोलीत जाताजाता यजमानांची स्त्री म्हणाली, ज्यांना कधी काही मिळतच नाही, अशा भिकार्‍यांना कधी घरात आणू नये. हे वाक्य संतोषच्या मनाला खूप लागले.

हा एकप्रकारे अपमानच होता. गरीबी ही तेव्हाची परिस्थिती होती; पण याचा अर्थ आपण भिकारी आहोत, असा नाहीय. या अपमानातून संतोष यांनी निश्चय केला की या पुढे काहीही करून स्वत:ला सिद्ध करायचेच आणि ही परिस्थिती बदलायचीच. याच जिद्दीतून खर्‍या अर्थाने कामेरकरांच्या यशकथेला सुरुवात झाली.

संतोषचा मामा मुंबईत कोकणातून आंबे-फणस आणून विकत असे. त्या वर्षी मामा मुंबईला आंबे-फणस घेऊन आला, पण मुंबईत येऊन आजारी पडला. आता हा सर्व माल तू विकशील का, असे मामाने संतोषला विचारले. त्यानेही लगेच होकार दिला. संतोषचा मित्रपरिवार खूप मोठा होता, त्यांच्या सोबतीने वांद्रे आणि परिसरात त्याने आंबे-फणस विकले.

वयाच्या तेराव्या वर्षी संतोषचा हा पहिला व्यवसाय झाला आणि त्यातून नफाही कमावला. पुढल्या वर्षी मामाने पुन्हा आंबे विकाशील का असे विचारले त्यावेळी मात्र संतोषने मामाला हो म्हटले, पण त्याच्याकडून एक भाव निश्चित करून व्यावसायिक तत्त्वावर विकत घेतले. पुढे जवळजवळ पंधरा वर्षं संतोषने हा आंब्यांचा व्यापार केला.

संतोष कामेरकर यांनी सिद्धार्थ कॉलेजला पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ते याचसोबत आयटीआयसुद्धा करत होते. त्यावेळी त्यांना कॉलेजच्या जी.एस.च्या निवडणुकीला उभे राहण्याची संधी मिळाली. याला विरोधकांकडून खूप विरोध झाला, पण त्यांनी माघार घेतली नाही आणि ते कॉलेजचे जी.एस. झाले. कॉलेजचे जी.एस. म्हणून काम करताना त्यांच्यात नेतृत्वगुणांचा विकास झाला.

पुढे संतोषला एका मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनीत नोकरी लागली. तिथे त्यांनी मार्केटिंगचा अनुभव घेतला. वक्तृत्व चांगलं असल्यामुळे त्याच कंपनीत प्रमोशन मिळून त्यांना ट्रेनर तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली. कॉलेजमध्ये विकसित झालेल्या नेतृत्वगुणांच्या आधारावर संतोष यांनी एम.एल.एम. कंपनीला शंभर लीडर तयार करून दिले.

याच दरम्यान संतोष कामेरकरांचे लग्नही झाले. एम.एल.एम. कंपनीच्या कामासाठी त्यांना महिन्यातले २०-२० दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरावं लागायचं. कंपनीला लीडर बनवून देण्यात त्यांना चांगलाच पैसा मिळायचा म्हणून ते कामातून विश्रांती घेत नसत.

यातून मिळालेला पैसा त्यांनी वेगवेगळ्या धंद्यांमध्ये गुंतवला. वेगवेगळे सीझनल धंदे ते करायचे. छोट्या-छोट्या जमिनी विकत घ्यायचे आणि त्याचा जरा भाव वाढला की ते विकून त्यातून कमावलेला नफा दुसरीकडे गुंतवायचे.

पुढे त्यांनी जागेच्या व्यवहारांतूनच पनवेलजवळ एक जागा विकत घेतली आणि त्या जागेवर एक फार्महाऊस बांधले. या फार्महाऊसच्या आजुबाजुला झाडे लावली आणि त्याला कमर्शियल टच दिला. तिथे रेस्टॉरंट सुरू केले.

लोकं पर्यटक म्हणून येऊ लागले, तसा या नवीन धंद्यातही जम बसू लागला. फार्महाऊस रस्त्याला लागून असल्याने व्यवसाय चांगला वाढू लागला. याचसोबत कामेरकर यांचा ट्रेनिंग क्षेत्रातही चांगला जम बसला होता. सोबत विविध पुस्तके लिहून त्यातूनही मानधन मिळू लागले.

एवढ्यावरच न थांबता संतोष कामेरकर यांनी आता लॉजींगसह एक हॉटेल बांधले आहे. वर्षभर पर्यटकांचा त्यांच्या हॉटेलवर राबता असतो. या सर्व प्रवासात त्यांची पत्नी श्रद्धा कामेरकर यांनी त्यांना मोलाची साथ दिली आहे. हॉटेल व्यवसायात माल खरेदी करणे, कर्मचार्‍यांशी सुसंवाद ठेवणे अशा अनेक जबाबदार्‍या त्या लिलया पार पाडतात.

संतोष कामेरकर यांचे हॉटेल हे होऊ घातलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे भविष्यात याचा विस्तार करून एक भव्य पंचतारांकीत हॉटेल उभे करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. ‘ट्रेनर्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या माध्यमातून संतोष कामेरकर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षकांची एक संघटना उभी करत आहेत.

उद्योजकीय जीवनासह ते अनेक सामाजिक कामांतही योगदान देतात. ज्ञातीच्या आर्थिक उद्धारासाठी काम करण्याची गरज लक्षात घेऊन ते ‘वैश्य सहकारी बँके’तही संचालक म्हणून कामकाज बघतात. कामेरकर सांगतात, ‘खरा यशस्वी उद्योजक तो जो अनेक व्यवसायातून नफा कमावतो.’ त्यांच्या स्वत:कडे आता विविध व्यवसायांतून पैसा येऊ लागला.

ट्रेनिंग व्यवसाय, सीजनल व्यवसाय, जागेचे व्यवहार आणि आता रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट असे अर्थार्जनाचे विविध मार्ग वडिलांच्या मृत्युपश्चात रत्नागिरीतून मुंबईला आलेल्या आणि भारत नगरसारख्या झोपडपट्टीत १० x १० च्या भाड्याच्या खोलीत राहिलेल्या संतोष कामेरकर यांनी निर्माण केले. शून्यातून सुरुवात करून आज ते करोडपती झाले आहेत.

संपर्क : संतोष कामेरकर
७३०३४४५४५४


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!