महिला उद्योजकांसाठी सहकारी बँकांच्या विशेष योजना

सहकारी बँका या उद्योजकांना नेहमीच आपल्याशा वाटतात, कारण या बँका उद्योजकांशी व्यवहारापुरत्या मर्यादित न राहता त्यांच्यासोबत वैयक्तिक नाते जोडतात. ग्राहकाच्या गरजा समजून घेऊन त्यावर समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सुरू असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी सहकारी बँकांतून कर्ज उपलब्ध करून घेणे तुलनेने सोपे जाते.

गेल्या काही काळापासून विविध सहकारी बँक महिला उद्योजकांना आपल्याकडे वळवण्यासाठी विविध योजना आणत आहेत. यापैकी काही योजनांची खाली थोडक्यात माहिती देत आहोत. सविस्तर माहितीसाठी तुम्हाला त्या त्या बँकेच्या जवळील शाखेस भेट द्यावी लागेल.

सारस्वत बँक : उद्योगिनी योजना

देशातील क्रमांक एक असलेल्या सहकारी बँकेत महिलांसाठी विशेष उद्योगिनी ही योजना उपलब्ध आहे. यामध्ये महिलांना विविध दरांमध्ये सूट देण्यात आली आहे.

सूक्ष्म म्हणजे मायक्रो क्षेत्रात मोडणाऱ्या महिला उद्योजिका यामध्ये कोणतेही मार्जिन न भरता दोन लाखांपर्यंत कर्ज मिळवू शकतात. लघु म्हणजे स्मॉल क्षेत्रातील उद्योजिकांना ५० लाखांपर्यंत कर्ज सुविधा आणि मध्यम म्हणजे मीडियम क्षेत्रातील महिला उद्योजकांना एक कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. लघु व मध्यम क्षेत्रातील कर्जासाठी २० ते २५ टक्के मार्जिन आवश्यक आहे.

महिला उद्योजक कर्ज : टीजेएसबी बँक

छोटे छोटे व्यवसाय जसे की ब्युटी पार्लर, कॅटरिंग, मसाले बनवणे असे करणाऱ्यांसाठी टीजेएसबी बँकेने विशेष कर्ज सुविधा उपलब्ध केली आहे. महिला बचत गटांनाही या योजनेत प्राधान्य देण्यात येते. या योजनेद्वारे २ लाखांपर्यंत कर्ज घेऊन ६० महिन्यांच्या सुलभ हफ्त्यांत परतफेड करण्याचीन सोय आहे.

भारत वनिता उद्यमी : भारत को ऑप. बँक

भारत को-ऑप. बँकेमध्ये महिला उद्योजकांसाठी ही विशेष योजना उपलब्ध आहे. कॅश क्रेडिट रुपात महिला उद्योजकांना याद्वारे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

Women Entrepreneur : अभ्युदय बँक

महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटकात प्राबल्य असणारी ही बँक महिला उद्योजक व व्यावसायिकांना आपल्या कर्ज योजनेत विविध चार्जेस माफ करते तसेच त्यांना लागणारे विविध प्रकारचे अर्थसहाय्य करते. अधिक माहितीसाठी या बँकेच्या शाखेत तुम्ही भेट देऊ शकता.

स्त्री उद्योजिका आणि स्वयंसिद्धा : एनकेजीएसबी बँक

एनकेजीएसबी बँकेने महिला उद्योजक तसेच व्यावसायिक महिलांसाठी या दोन विशेष योजना तयार केल्या आहेत. महिला उद्योजक विविध कारणांसाठी या योजनांद्वारे टर्म लोन किंवा कॅश क्रेडिट घेऊ शकतात. कमी होत जाणाऱ्या रक्कमेनुसार व्याजाची रक्कमही यात कमी होत जाते, तसेच यावरील प्रोसेसिंग चार्जेस व अन्य खर्चातही सूट देण्यात आली आहे.

उद्योगिनी : जनकल्याण बँक

जनकल्याण सहकारी बँक या बँकेच्या शाखा तुलनेने कमी असल्या तरी महिला उद्योजकांसाठी बँकेच्या योजना खूप चांगल्या आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेद्वारे महिला उद्योजकांना अर्थसहाय्य केले जाते. या योजनेद्वारे १० लाखांपर्यंत टर्म लोन घेऊ शकता व सात वर्षांत त्याची परतफेड करू शकता.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?