ग्रामीण महाराष्ट्राला ‘डिजिटल’ युगाशी जोडणारा सुमित

पहिल्या पिढीचा उद्योजक म्हटलं की, अडचणी आणि समस्यांचा डोंगर पार करणं अगदी अनिवार्यच असतं जणू. काही उद्योजकांना आपल्याच माणसांचा विरोध सहन करावा लागतो. त्यातही ग्रामीण भागात जर एखाद्याने अशा प्रकारे ईकॉमर्स उद्योग करायचा म्हटला तर सर्वात जास्त अडचणी येतात.

ग्रामीण भारतात अजूनही मोठ्या प्रमाणात ई-कॉमर्सविषयी पुरेशी माहिती नाही. त्यामुळे अशा ठिकाणी पाळंमुळं उभारणंही तेवढंच कौशल्याचं काम आहे. आज आपण अशाच एका नवोद्यजकाची ओळख करून घेऊयात. सुमित भंडारवार यांची. मुंबईत जन्मलेल्या सुमितचं बालपण आणि शिक्षण महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात झालं.

अमोलकचंद महाविद्यालयातून बीकॉमपर्यंत शिक्षण पूर्ण करून सुमितने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांना आपल्या मुलांनीही सरकारी नोकरी करावी अशी फार इच्छा होती. त्यामुळेच सुमितने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली; परंतु यात त्याला यश नेहमी थोडक्यात हुलकावणी देत राहिले.

वेळ पुढे सरकत होता. अशात आई-वडिलांनाही नातेवाईक, गावकरी यांच्याकडून सतत विचारणा होत असे, अजून किती शिकणार? इतकी वर्षे लागतात का शिक्षणाला? अशा प्रकारचे प्रश्‍न विचारून ते त्यांना भंडावत. त्यामुळे आईवडील सुमितला फैलावर घेत. यामुळे सतत मन तणावाखाली असे.

काय करावे सुचत नसे. एकदा मनाशी पक्कं ठरवलं, आता आपण काम शोधायचं. निदान आपला स्वत:चा खर्च स्वत: करून पुढचं शिक्षण घ्यायचं. अशातच एके दिवशी त्याला एका अमरावती येथील मित्राचा फोन आला. त्याने एका ईकॉमर्समध्ये कार्यरत असलेल्या एका कंपनीची माहिती दिली.

सुमित म्हणतात, २०१७ मध्ये त्या कंपनीची डिस्ट्रिब्युटरशिप घेतली. त्यांच्यासाठी मी काही काळ काम केलं. हे काम करताना मला ईकॉमर्स या क्षेत्राविषयी रुची निर्माण झाली. भविष्यातील ईकॉमर्स क्षेत्राचा होणारा विकास आणि भविष्यात उपलब्ध होणारी प्रचंड संधी ओळखून मी ते काम पूर्णपणे शिकून घेतले आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय पक्का केला.

स्वत:चा उद्योग सुरू करणार म्हटल्यावर सर्वात प्रथम मला अनेक आघाड्यांवर संघर्ष करावा लागला. घरच्यांचा, नातेवाईकांचा रोष, विरोध पत्करला. अनेकांचा अविश्वास पाहिला. भांडवल उभारताना खूप त्रास झाला. स्वत:चे कार्यालय सुरू करण्यासाठी जागाही नव्हती. लोकांचा विश्‍वास संपादन करण्यात खूप अडचणी आल्या. सुरुवातीच्या काळात अनेक लोक माझ्यावर हसतही असत, परंतु माझा निर्णय ठाम होता.

सुमितनी स्वतःची प्रभाषा इकॉम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. सुरुवातीला आशाव्हेंचर या नावाखाली नवनवीन संकल्पना लढवून तसेच अनेक कंपन्यांसोबत करार करून स्वतःची वेबसाइट आणि अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन विकसित केले.

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच फिनो पेमेंट बँकसोबत tie-up आहेत. याच्या माध्यमातून राष्ट्रीयीकृत बँकांचे तसेच काही खासगी बँकांचे ग्राहक सेवा केंद्र म्हणजे CSP/MINI BANK सेंटर उपलब्ध करून दिले. पोर्टल आणि अँड्रॉईड अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


जसे अकाऊंट ओपनिंग सुविधा, मोबाइल आणि DTH विक्री, रिचार्जेस, रेल्वे, बस टीकीट आणि हॉटेल बुकिंग, मनी ट्रान्स्फर सुविधा, पॅन कार्ड तसेच सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे कुठल्याही बँकेची उचल म्हणजे बँक खातेदाराला त्याच्या बँक खात्यातून AEPS प्रणालीद्वारे किंवा मायक्रो एटीएमद्वारे पैसे काढून देणे अशा सेवा आशाव्हेंचर ग्राहकांना देत होते.

मायक्रो- एटीएम आणि एम पॉस मशीन, थम मशीन, कॅश काऊंटर मशीनही उपलब्ध करून दिल्या जाऊ लागल्या. इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, आयएसओ कंपनी रजिस्ट्रेशन, जीएसटी नंबर, जीएसटी फाइलसंबंधीत कामे, खासगी आणि सार्वजनिक कंपनीची नोंदणी, विविध कायदेशीर कागदपत्रे आणि त्यासंबंधित व्यवहार आदींची सेवा, तसेच वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून देणे अशा सेवा एकाच छताखालून देण्यासाठी काम करतोय. त्यासाठी विविध कंपन्यांसोबत बोलणीही सुरू केली आहेत.

ग्रामीण जनतेला सुरुवातीच्या काळात ऑनलाइन गोष्टींकडे वळवणे खूप कठीण होते. लोकांना याची माहितीच नसल्याने खूप अडचणी आल्या. भारत सरकारकडून डिजिटल इंडिया तसेच ई-कॉमर्स उद्योगांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात असल्यामुळे लोकांच्या विचारांमध्ये बदल होऊ लागला आणि लोक कॅशलेस आणि ऑनलाइन सुविधांकडे वळू लागल्यामुळे आपोआप पोर्टल्स सेंटरची मागणी होऊ लागली.

हळूहळू सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ लागल्या. लोकांचा विश्वास संपादन केला. इन्व्हेस्टमेंट मिळायला मदत होऊ लागली. मग पोर्टल सुविधा विकायला सुरुवात केली ज्यामुळे लोकांना रोजगार तर मिळेलच पण गावातील लोकांना बँकिंग सुविधा तसेच आवश्यक लागणारी कागदपत्रे तसेच अनेक सुविधा त्यांना तिथेच online apply करून उपलब्ध होतील व वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल.

सध्या माझ्यासोबत आठ जणांची टीम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात पुढील वर्षभरात वितरकांचं जाळं तयार करण्याचे सुमितचे ध्येय आहे. वितरक म्हणून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आमच्याकडून वितरकांना दोन दिवसांचं ट्रेनिंग दिलं जातं. आतापर्यंत विदर्भात यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वाशिम, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, पुणे आदी जिल्ह्यांत आशाव्हेंचरचे वितरक आहेत.

तसेच यवतमाळमध्ये अगदी सहा महिन्यांत ९० फ्रँचायझी उभ्या राहिल्या आहेत. वितरकांना लागणारा बॅक ऑफिस सपोर्ट आणि टेक्निकल सपोर्ट त्वरित दिला जातो ज्यामुळे कोणत्याही समस्या लगेचच सोडवल्या जातात. त्यासाठी विविध माध्यमांतून वितरकांना व फ्रँचायझी चालकांना एकमेकांशी जोडलेले आहे.

महाराष्ट्राबाहेरही उत्तर प्रदेश येथे वितरक आहेत. भविष्यात आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार आदी ठिकाणी विस्तारण्याचा सुमितचा मानस आहे. त्यासाठी येत्या मार्च महिन्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेले पोर्टल सुमित ग्राहकांसाठी घेऊन येत आहे.

सुमित म्हणतात, या संपूर्ण प्रवासात चांगल्या लोकांचीही साथ मिळाली. माझ्या आईवडिलांचा सुरुवातीला विरोध होता, परंतु नंतर त्यांनीच मला पाठिंबा दिला. हळूहळू आईवडिलांचा माझ्यावर विश्‍वास पक्का झाला. स्वप्निल वाणी यांनी सुरुवातीला त्यांचं कार्यालय विनामूल्य वापरायला दिलं. माझ्या उमेदीच्या काळात त्यांनी मला मदतीचा हात दिला ज्यामुळे मी पुढे खूप प्रगती करू शकलो. त्याशिवाय निखिल घोडे यांनी कंपनी नोंदणी, कायदेशीर बाबी अशा अनेक गोष्टींत मदत केली.

अभिजीत सास्तिकर यांनी माझी पहिली फ्रँचायझी घेतली. प्रतीक फटिंग आणि कंपनी लोगो तयार करण्यासाठी मदत करणारे त्याचे वडील कैलास काका, तसेच माझ्यासोबत सुरुवातीच्या काळापासूनच सदैव खंबीरपणे उभा राहणारा प्रतीक चरुडकर असे अनेक चांगले लोकही भेटले.

नातेवाईकांना, गावकर्‍यांना आणि माझी खिल्ली उडवणार्‍या अनेकांना माझ्या कामातून उत्तर मिळाले ही खरी माझ्यासाठी उपलब्धी आहे. उद्योगाची सुरुवात करताना माझ्याकडे कार्यालयासाठी जागाही नव्हती; परंतु आज शहराच्या मध्यभागी स्वत:ची दोन कार्यालयं आहेत. हे सर्व मी माझ्या उद्योजक होण्याच्या ध्येयातून करू शकलो.

भविष्यात अनेक गोष्टी करण्यासाठी मी तयार आहे. देशभर ई-कॉमचे जाळे विणणे हे माझे नजीकच्या काळातील उद्दिष्ट आहे. जास्तीत जास्त तरुणांनी उद्योगात यावे यासाठी सुमीत सर्वतोपरी मदतीसाठी तयार आहे.

अनेक तरुणांना गुंतवणुकीची खूप मोठी समस्या असते; त्यामुळे इच्छा असूनही त्यांना मार्ग सापडत नसतो अशा लोकांसाठी भविष्यात स्वत:ची निधी कंपनी बनवून गरजू आणि प्रामाणिक लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यासोबत स्वत:चं डेअरी प्रॉडक्ट प्रोसेसिंग फार्म आणि उत्पादक युनिट सुरू करण्याचं स्वप्न आहे.

सुमित भंडारवार
९४२००२७४००, ८६६८२१४९४९


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!