आजच्या आधुनिक काळात अनेक डॉक्टर आणि बालरोगतज्ज्ञ असं सांगतात की लहान मुलांना तेल आणि मालिश करू नये. यामुळे त्यांना इन्फेक्शन होऊ शकते, शारीरिक त्रास तर होतोच, पण काही वेळा गंभीर दुखापतही होऊ शकते. पण अनेक घरांमध्ये हा वैद्यकीय सल्ला जुमानला जात नाही आणि बाळ-बाळंतिणीला तेलमालिश केलं जातं.
डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रातील लोक जे सांगतात ते सर्रास चुकीचं आहे का की त्याच्याकडे आपण इतकं दुर्लक्ष करावं? तर नाही. डॉक्टर सांगतात ते चुकीचं मुळीच नाहीय. आपल्याकडे बाळ आणि बाळंतिणीला मालिश करण्याचं काम पूर्वी सुईण करत असत. तिच्याकडे पंरपरेनुसार आलेलं पण या क्षेत्रातलं ते शास्त्रशुद्ध ज्ञान होतं. त्यामुळे सुईणीचे मऊमऊ हात लागला की बाळाला गुदगुल्या होऊन तो खदखदून हसायचा.
आजच्या काळात मात्र चित्र बदललं आहे. अनेक घरांमध्ये पारंपरिक सुईणींची जागा कोणत्याही आजीने किंवा मोलकरणीने घेतली आहे. यांचा बाळाच्या नाजूक शरीराचा, त्याच्या भावविश्वाचा अभ्यास नसतो; जो पूर्वीच्या सुईणींना असायचा. यामुळे बाळाला त्रासच होतो आणि डॉक्टर तेल आणि मालिश या दोन्हींपासून बाळाला लांब ठेवायचा सल्ला देतात.
पारंपरिक सुईणीचं महत्त्व आणि तिची आजच्या शहरी जीवनातली कमतरता लक्षात घेऊन सुनीता देसाई या पंचेचाळीस वर्षीय महिलेने या क्षेत्राकडे वळण्याचं ठरवलं. त्यांनी पारंपरिक शास्त्र आणि आयुर्वेदिक पद्धतीनुसार बाळाला आणि बाळाच्या आईला मालिश, धुरी आणि आंघोळ यांच्या लाभाचा अभ्यास केला.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
त्यासाठी त्यांनी धन्वंतरी आयुर्वेदात बाळांचा मसाज कसा करतात, याचं प्रशिक्षण घेतलं. याचसोबत भारताबाहेर बाळांच्या मालिशच्या कोणकोणत्या पद्धती आहेत याचा अभ्यास करण्यासाठी त्या थायलंडला गेल्या आणि तिथे बाळाच्या मसाजचे वेगवेगळे कोर्स त्यांनी केले.
सुनीता देसाई या धन्वंतरी आयुर्वेदमध्ये लहान वजनाच्या बाळांना सुमारे दोन वर्षे मालिश देत होत्या. या बाळांना खूप सांभाळून हाताळावं लागतं. त्याचा अनुभव सुनीता यांना होता. धन्वंतरी आयुर्वेदमधलं शिक्षण आणि अनुभव तसंच थायलंडमधलं शिक्षण यांच्या आधारावर भारतात परतल्यावर त्यांनी Sofuto Baby Care Pvt. Ltd. नावाची कंपनी सुरू केली.
त्या 35 ते 50 या वयोगटातील महिलांना आपल्याकडे ठेवतात. त्यांना बाळाच्या मालिशचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देतात. टच थेरपी शिकवतात आणि हसतखेळत बाळाला त्या मसाज देऊ शकतील यासाठी तयार करतात. बाळाच्या मनात मालिश आणि तेलाबद्दल भीती निर्माण होऊ न देता त्याची आवड निर्माण झाली पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न असतो.
जन्मापासून ते एक वर्ष पूर्ण होईपर्यंत बाळांना त्या मालिश देतात. मालिशमुळे बाळाला झोप चांगली लागते, पोटातील गॅसेस कमी होतात. इतरही छोटे-छोटे आजार बरे होतात.
सध्या कल्याण ते ठाणे आणि अंधेरी ते सांताक्रुज दरम्यान सुनीता देसाई यांच्या सात सहयोगी कार्यरत आहेत. लवकरच पूर्ण मुंबई-ठाण्यात त्यांना सेवा सुरू करायची आहे. यासाठी त्यांना 35 ते 50 वयोगटातील दहावी-बारावी झालेल्या महिलांची गरज आहे. भविष्यात फ्रँचायजी देऊन महाराष्ट्रभर विस्तार करण्याचा देसाई यांची योजना आहे.
सुनीता देसाई यांचा जन्म सांगली जिल्ह्यात औदुंबर येथे झाला. पण त्यांचं शिक्षण आजोळी झालं. आजोळी मामांचं किराणा दुकान होतं. बालपणातच त्याही या दुकान चालवत. तिथूनच त्यांच्यावर उद्योजकीय संस्कार झाले. पुढे बी.ए. करून शाळेत नोकरी आणि त्यासोबत त्या ऍक्टिव्हिटी सेंटर चालवत होत्या.
सुनीता देसाई यांच्या उद्योजकीय वाटचालीत त्यांना त्यांचे पती यांची मोलाची साथ मिळाली. सुनीता यांनी थायलंडला जाऊन प्रशिक्षण घेण्यासाठी आपले दागिने गहाण ठेवले होते. त्यामुळे कंपनी सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल नव्हते.
अशावेळी पतीने स्वतःच्या कंपनीतून त्यांना पाच लाखांचे कर्ज काढून दिले आणि त्यातून हा व्यवसाय सुरू करता आला. डिजिटल मार्केटिंगसाठी त्यांची मुलेही त्यांना सहकार्य करतात. याशिवाय सासू-सासरेही आवश्यक ते सहकार्य करतात. कुटुंबांच्या सहकार्याला सुनीता आपल्या या वाटचालीचा कणा मानतात.
संपर्क – 9930306666
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.