मागील दोन वर्षांचा काळ हा आपल्यासाठी शिकवणीचा काळ होता. या दोन वर्षांत ज्या व्यावसायिक, उद्योजक, व्यापार्यांनी योग्य ती शिकवण घेतली, तेच भविष्यात येणार्या संधी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सक्षम असतील.
आपल्या ऑफिस, दुकानांचे दरवाजे बंद असूनही आपल्याला व्यवसाय करायचा होता. ग्राहक आपल्याकडे येत नसला, तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला ग्राहकापर्यंत पोहोचायचं होतं. कारण हा आपल्या आणि आपल्या व्यवसायाच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न होता.
अनेक उद्योजकांनी या काळात अनेक क्लृप्त्या काढल्या. कोणी आपल्या पारंपरिक व्यवसायात ऑनलाइनची भर घातली, तर कोणी संपूर्ण व्यवसाय ऑनलाइन नेला. कोणाला ई-कॉमर्सची मदत झाली, तर कोणाला डिजिटल मार्केटिंगची. कोणी आपल्या प्रणालीत बदल केला, तर कोणी व्यवसायच बदलला.
नवनवीन प्रयोग आणि संशोधन यानेच उद्योग-व्यवसायाला बळ मिळतं, तो नवी कलाटणी घेतो. या काळात हे प्रयोग, संशोधन प्रत्येकाने आपल्या व्यवसायात केले. जो या दोन वर्षांच्या संघर्षाच्या काळाकडून काही शिकला, ज्याने आपल्या व्यवसायात नवनवे प्रयोग केले, नावीन्य आणले आणि तो टिकला असा प्रत्येक उद्योजक अभिनंदनास पात्र आहे.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
आव्हानांना सामोरे गेल्यानंतर पुढे येणारा काळ अनेक नवनवीन संधी घेऊन येणार आहे. जग भारताकडे आता आशेने पाहतेय. पारंपरीक तसेच अनेक नवनवीन उद्योग जगभरातून भारतात येतील. या सर्व संधी आपल्यासाठी प्रगतीची नवी कवाड उघडती. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत सरकारचे धोरणही लघू तसेच मध्यम उद्योगांच्या विकासाचे असणार आहे.
हीच ती वेळ फिनिक्स होऊन आपल्याच राखेतून नवा जन्म घेण्याची. यासाठी ज्या कसोटीचा सामना करावा लागेल, ती कसोटी गेल्या दोन वर्षांत तुम्ही देऊन तावून, सुलाखून बाहेर आलेला आहात.
– शैलेश राजपूत
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.