अपयशातून जोमाने उभा राहून यशस्वी झालेला उद्योजक

उद्योग करताना सर्वात महत्त्वाची असते आवड. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय आवडतं हे जर नीट ठाऊक असेल तर आपण जोमाने त्याच्यात कामाला लागतो. प्रसंगी अपयश आले तरी त्यावर मात करतो.

वैभव चौधरी हे पुण्याचे उद्योजक सुरुवातीच्या काळात आलेले उद्योगातील अपयश पचवून जोमाने पुन्हा एकदा उद्योगात उतरले आणि यशस्वी झाले. फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा आकाशात झेपावतो अगदी तसेच काहीसे वैभव चौधरी यांच्याही आयुष्यात घडले.

वैभव चौधरी यांचे २०१४ साली सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण झाल्यावर काही काळ नोकरीचा, मार्केटचा, कामाचा अनुभव घेण्यासाठी त्यांनी तीन महिने नोकरी केली. खरं तर नोकरीत लक्ष ना लागल्यामुळे लगेचच नोकरी सोडली. ९ ते ५ या चक्रात अडकण्याचा त्यांचा पिंड नव्हता. स्वातंत्र्यासोबत समाधानही मिळत नव्हते.

सतत आपला स्वतःचा व्यवसाय असावा, असे विचार मनात असत. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यामुळे शेती हा त्यांचा पारंपरिक उद्योग आहे. घरात आजपर्यंत कोणीच नोकरी म्हणून केली नव्हती. त्यामुळे आपणही उद्योगच करायचा हे पक्कं होतं म्हणूनच नोकरीला रामराम ठोकला आणि शेवटच्या पगारातून व्यवसायाला सुरुवात केली.

सुरुवातीला छोटी छोटी कामं घेत. घरांची बांधकामं, घरांची डागडुजी, इंटीरियर अशी कामं करायला सुरुवात केली. व्यवसायात नवीन असल्यामुळे त्यातील खाचखळगे कळायला खूप मोठी किंमत मोजावी लागली.

सुरुवातीला अनेकांना कामं करून दिली; पण पैसे वसुली जमली नाही. ही बाजू खूपच लंगडी होती. त्यामुळं फसवणूक झाली आणि व्यवसाय वाढण्याऐवजी डबघाईला आला. व्यवसायातील या स्थितीने नैराश्य आले.

मी व्यवसाय बंद करून पुन्हा नोकरी करावी या निर्णयावर आलो. त्याच वेळी आमचे एक मित्र होते गणेश पगारे, त्यांच्या माध्यमातून एक संधी चालून आली. नीलेश शर्मा यांच्या ‘वास्तूशिल्प कन्ट्रक्शन’मध्ये मला त्याने जोडून दिले. शेवटची संधी घेऊन पाहू, असा विचार करून पुन्हा भांडवल उभे केले आणि कामाला सुरुवात केली.

सहा महिने मी निलेश शर्मा या सद‍्गृहस्थांसोबत काम केले. ते तुलनेने आमच्यापेक्षा मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. ते कोटींची कामं घेत, तर आम्ही १०-१२ लाखांची कामं घेत होतो.

ही आमच्यात खूप मोठी तफावत होती. त्यांनी आम्हाला समजावले, धीर दिला आणि एक प्रकारे नवी उमेद दिली की, आपणही अशी कामं करू शकतो. आर्थिक, मानसिक आधार देऊन त्यांनी आम्हाला उभे केले. खरं तर आम्ही एकाच क्षेत्रातले, परंतु स्पर्धक न समजता त्यांनी नव्या व्यावसायिकाला उभे केले. हे वैभव आवर्जून सांगतात.

वैभव म्हणतात, दरम्यानच्या काळात त्यांना आमचे काम आवडले, पद्धत आवडली आणि त्यांनी समोरून ऑफर दिली ती म्हणजे आमच्यासोबत तुम्ही भागीदारीत काम करा. अशा प्रकारे नीलेश शर्मा आणि मी एकत्रित मिळून ‘वास्तूशिल्प इन्फ्रा प्रोजेक्ट’ म्हणून भागीदारीत व्यवसाय सुरू केला.

व्यवसाय डबघाईला आला त्या वेळच्या कामाच्या पद्धती आणि नव्याने काम करताना वापरलेल्या पद्धती यात वैभवनी अभ्यासपूर्ण बदल केले. सुरुवातीला ते ५ ते १० लाखांची कामं घ्यायचे. आज ते कोटींची कामं मिळवतायत.

पूर्वी छोटी छोटी घरंबांधणीची कामं घ्यायचो आज ४०० एकरचा स्वतंत्र प्रोजेक्ट आम्ही उभारतोय. असं म्हणताना वैभव म्हणतात, या प्रवासात आम्ही खूप शिकलो. सुरुवातीला फक्त काम मिळतेय ते उचलू आणि पूर्ण करू अशी भूमिका होती.

त्यामुळे आपण कोणाचे काम घेतोय त्यांची माहिती न घेताच काम सुरू केले जाई. ते आपले पैसे देतील ना याची काहीच खातरजमा आमच्याकडून केली जात नसे, त्यामुळे खूप समस्या आल्या; परंतु आता कोणतेही काम घेण्यापूर्वी नीट अभ्यास करतो आणि मगच ते स्वीकारतो.

त्यामुळे अनेक समस्या उद्भवण्यापूर्वीच संपून जातात. सारासार विचार खूप गरजेचा आहे, असं ते म्हणतात. रात्रंदिवस एक करून झपाट्याने कामं केली आणि करतोय.

या सर्व प्रवासात आमच्या वास्तुशिल्पचा प्रत्येक घटक अविभाज्य भाग झालाय. म्हणूनच आज ० ते ७ कोटींची भरारी आम्ही घेऊ शकलोय. आम्ही दोघे भागीदार, त्यासोबत पाच इंजिनीअर, चार सुपरवायझर आणि तीनशे ते साडेतीनशेच्या दरम्यान कामगार काम करतायत.

ही आमची टीम आणि आमचं बलस्थानं आहेत. पुण्यात हडपसर येथे त्यांचे कार्यालय आहे, तर पुणे, रांजणगाव, एमआयडीसी शिर्डी, धुळे, जळगाव या ठिकाणीही आमची कामं चालू आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आमचा विस्तार करतोय.

आज आमची कंपनी पुण्यातील नामांकित बिल्डर्ससोबत काम करते. तसेच उत्तम दर्जाची घरं बांधून लोकांना समाधान व आनंद देण्याचा प्रयत्न करते. मंदी आणि रिअल इस्टेट याचा लोक खूप बागुलबुवा करतायत; पण खरं तर खूप संधी या क्षेत्रात आहेत. आम्ही स्वत: घरबांधणी करून देतो. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट याच्या अखत्यारीत येणारे रस्तेबांधणी करतो.

गव्हर्मेंटची विविध टेंडर्स निघतात त्याची कामे आम्ही करतो. विविध मोठमोठे प्रोजेक्ट्स असतात अशा ठिकाणी कन्स्ट्रक्शनची कामं आम्ही करतो. जसं की, रस्ता स्ट्रीटलाइट, कंपाऊंड अशा नानाविध प्रकारच्या कामांची संधी आहे. आम्ही ही सारी कामं करतोय.

‘रॉयल पुरंदर’ पुरंदर येथे आणि ‘प्राइड वर्ल्ड सिटी’ विमानतळ भागात आम्ही महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टवर आज काम करतोय. याचसोबत माझा सुयश नानकर नावाचा मित्र आहे ज्याने मला पदोपदी साथ दिली.

अनेक कामं येताना आम्ही चर्चा, विचारविनिमय करतो. यातूनच मग छोटी छोटी कामं आम्ही यशस्वीपणे एकत्रित पूर्ण केलीत. कुटुंबीयांचे सहकार्य खूप गरजेचे असते.

माझ्या सुदैवाने मला कधी माझ्या घरच्यांनी टोकले नाही. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तुला जो जो अनुभव घ्यायचाय तो घे याविषयीचे स्वातंत्र्य दिले. याची आठवण वैभव यांनी ठेवली आहे.

वैभव म्हणतात, मराठी माणूस हा नोकरीच्या मागे असतो. व्यवसायात उतरण्याचे धाडस ते करायला घाबरतात. कुणी आपल्याला हसेल, आपल्याला हे जमेल का? भांडवल कसे उभे राहणार? मी छोटी कामं घेतली तर फायदा होईल का?

एक ना अनेक प्रश्न. केवळ या प्रश्नांच्या जंजाळात अडकून जातात. ठेच लागली तर पुन्हा उभे राहायला हवे. झाले नुकसान व्यवसायात तरी हिंमत सोडू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्योजकाने संयम ठेवायला हवा.

आज झाड लावले तर उद्या लगेच फळ मिळत नाही. तसेच हेसुद्धा आहे. संयम बाळगा नक्की परिस्थिती बदलेल. या क्षेत्रात मराठी व्यावसायिकांना जमेल ती मदत व मार्गदर्शन करायला आम्ही तयार आहोत. ती आपली सामाजिक जबाबदारीच आहे असे आम्ही समजतो.

वैभव चौधरी – ९७३०५६२५५६

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?