मार्केटिंगच्या विविध वाटा

आपण आपल्या व्यवसायाचा प्रचार करणे गरजेचे आहे, कारण जर लोकांना आपल्याबद्दल माहीतच नसेल तर लोक आपल्याकडून आपले उत्पादन विकत कसे घेतील? एखादे उत्पादन लोकांसमोर आणण्याचे असंख्य प्रकार आहेत; पण यात महत्त्वाचे हे आहे की, आपण आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी योग्य असा पर्याय निवडतो का?

समजा, आपण खाद्यपदार्थांचा व्यवसाय करत आहोत, तर नुसती फोनवरून लोकांना त्याची माहिती देण्यापेक्षा त्यांना त्याची चव प्रत्यक्ष चाखायला दिली तर त्याचा जास्त फायदा होईल. म्हणजेच आपण आपला व्यवसाय लोकांसमोर आणण्यासाठी रोज नवनवीन मार्ग शोधायला हवेत.

त्याचसोबत इतरांनी वापरलेल्या मार्गांचासुद्धा अभ्यास करत राहिले पाहिजे. आता आपण प्रमोशनच्या अशा काही पद्धती बघू या ज्या आतापर्यंत बर्‍याच जणांनी वापरून पाहिल्या आहेत आणि त्यात त्यांना साधारणपणे फायदाच झालाय. पाहू काही पर्याय.

व्हिडीओ जाहिरात

आपण असे म्हणतो की, एक फोटो हा शंभर शब्दांइतका व्यक्त होतो. त्याचप्रमाणे एक व्हिडीओ हा शंभर फोटोंइतका व्यक्त होतो, कारण आपण जे वाचतो त्यापेक्षा आपण जे समोर पाहतो ते आपल्या जास्त चांगलं लक्षात राहतं. जसे आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायला जातो, तेव्हा आपल्याला त्या वस्तूची वृत्तपत्रातील जाहिरात आठवेलच असे नाही; पण आपल्याला त्या वस्तूची टीव्हीवरील जाहिरात नक्की आठवते.

तसेच आपण आपल्या उत्पादन बनवण्याच्या प्रक्रियेचे, आपल्या दैनंदिन कामांचे, आपल्या कर्मचार्‍यांचे किंवा आपल्या उत्पादनाच्या गुणवैशिष्ट्यांचे व्हिडीओज् बनवलेत आणि ते योग्य लोकांपर्यंत पोचवलेत तर आपल्याला नफा वाढवण्यात याचा नक्की फायदा होऊ शकेल. शंभर लोकांपर्यंत एका वेळी पोचणे चांगले आहे; परंतु वीस योग्य लोकांपर्यंत पोहोचणे हे जास्त उत्तम आहे.

असे म्हटले जाते की, आपल्या ग्राहकांपैकी वीस टक्के ग्राहक आपल्याला ऐंशी टक्के नफा मिळवून देतात. त्यामुळे एका वेळी अनेक लोकांपर्यंत केलेले प्रमोशन (मास मार्केटिंग) चांगलेच आहे; परंतु त्याहून उत्तम म्हणजे ज्या व्यक्ती खरोखरच आपल्याकडून खरेदी करतील त्यांच्यापर्यंत पोहोचणे, कारण थोड्या पण योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचले तर आपला कन्व्हर्जन रेट (त्या व्यक्तींपैकी किती जण आपल्याकडून खरेदी करतील) जास्त असेल.

त्याच्या उलट जर आपण अनेक लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचता यावे असे प्रयत्न करत असू तर आपला कन्व्हर्जन रेट हा कमी असेल. आपला व्यवसाय ओळखून या दोन्हींपैकी आपल्याला काय उपयुक्त आहे हे प्रत्येक उद्योजकाने ठरवायला हवे.

आपली ऑनलाइन प्रसिद्धी वाढवा. तंत्रज्ञानाच्या या युगात एखादा व्यवसाय जर आपले ऑनलाइन अस्तित्व निर्माण करू शकला नाही तर तो हळूहळू काळाच्या पडद्याआड जाऊ लागेल. आज जवळजवळ सर्वच लोक हे ऑनलाइन येऊ लागले आहेत.

ऑनलाइन म्हणजे सोशल मीडिया असोत, वेबसाइट्स असोत किंवा ई-मेल असो, आपला व्यवसाय जर बहुतांश लोकांपर्यंत आपल्याला न्यायचा असेल तर आपल्याला आपल्या व्यवसायाचे ऑनलाइन अस्तित्व निर्माण केलेच पाहिजे.

आता एखादा फेसबुकवर प्रमोशन करतो म्हणून मीसुद्धा तिथेच करायला हवे असे नाही, तर आपल्या व्यवसायाला साजेशा अशा ठिकाणी आपण लोकांना आपला व्यवसाय काय आहे हे दाखवले पाहिजे, ज्यातून आपल्या उत्पादनांची माहिती लोकांना मिळेल आणि आपल्या विक्रीत वाढ होईल. आपल्या व्यवसायाचे ऑनलाइन स्टोअर निर्माण करणे हासुद्धा एक उत्तम पर्याय आहे.

पुढील काही प्रकारे आपण आपल्या व्यवसायाचे ऑनलाइन अस्तित्व सहजपणे तयार करू शकतो :

  • वेबसाइट
  • ऑनलाइन शॉप (ई-कॉमर्स वेबसाइट)
  • ई-मेल
  • ब्लॉग्स
  • फेसबुक पेज
  • लिंक्डइन पेज
  • ट्विटर हँडल
  • पिंटरेस्ट
  • इतर सोशल मीडिया

ऑफलाइन मार्केटिंग बंद करू नका. ऑनलाइन मार्केटिंगचे खूप फायदे असले तरी ऑफलाइन मार्केटिंगला स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे. लोकांना प्रत्यक्ष जाऊन भेटणे, वेगवेगळ्या नेटवर्किंग फोरम्सशी जोडलेले असणे, तसेच वृत्तपत्र किंवा मासिकांत जाहिरात, पत्रके वाटणे, पोस्टाने पत्रे पाठविणे, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणे हे ऑफलाइन मार्केटिंगचे काही सोपे प्रकार आहेत.

याचसोबत टेलीकॉलिंग हेसुद्धा फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे आपले ग्राहक होतील असे लोक जिथे जिथे भेटणे शक्य आहे, तिथे त्यांना भेटा. आजच्या धावत्या जगात ही मार्केटिंगची पद्धत आपल्याला कंटाळवाणी वाटेल, परंतु आपला उद्योग जर वाढवायचा असेल तर ह्यांना पर्याय नाही.

माहितीयुक्त मार्केटिंग नक्कीच लाभदायक ठरेल. आपण आपल्या व्यवसायानुसार ऑनलाइन आणि ऑफलाइनमधील अगदी योग्य पर्याय निवडलेत आणि फक्त आमचे हे उत्पादन विकत घ्या, आमची ती सर्व्हिस विकत घ्या, हेच लोकांना सांगितलेत, तर काही काळानंतर लोक आपल्या व्यवसायाला कंटाळतील. त्यामुळे लोकांना उपयोगी असलेल्या गोष्टीसुद्धा त्यांना द्या.

म्हणजेच जर आपले कपड्यांचे दुकान असेल तर कपडे व्यवस्थित कसे ठेवावेत, कोणत्या ऋतूत कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत अशा प्रकारच्या टिप्स आपण लोकांना देऊ शकता ज्यांनी लोक आपल्या व्यवसायात गुंततील. आपल्या व्यवसायाप्रमाणे अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण लोकांना देऊ शकता.

आपले उत्पादन लोकांसमोर आणण्याचे असे असंख्य प्रकार आहेत. त्यातील हे सध्याचे सर्वोत्तम पाच मार्ग आपण आता पाहिले. लोकांचे विचार, लोकांची गरज आणि लोकांची मागणी याचे उत्तर म्हणजे आपले उत्पादन आहे, हे जर आपण लोकांना सांगू शकलात तर नक्कीच आपला व्यवसाय वाढत जाईल.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?