जाणून घ्या रबर क्षेत्रातल्या उद्योगसंधी

भारतात उत्पादन क्षेत्रात रबर उद्योगाला एक विशेष महत्त्व आहे. जगभरात भारत हा रबर उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे तसेच वापरकर्त्यांच्या दृष्टीने तिसर्‍या नंबरवर आहे. रबर उद्योग हा साधारणत: सहा हजार छोट्या-मोठ्या उद्योगांनी तयार झालेला असून त्यात ३० मोठ्या, ३०० मध्यम, तर ५,६०० लघुउद्योगांचा समावेश आहे.

नवउद्योजकांसाठी रबर क्षेत्रातील लघुउद्योग हा नफा मिळवून देणारा ठरत आहे. आपण आता तेरा रबर क्षेत्रातील अशा उद्योग संधी पाहू या, ज्या जर तुम्ही उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच फायद्याच्या ठरतील.

भारतात चालू असलेल्या रबर उद्योगात अवजड टायर्स, ऑटो टायर्स, नळ्या, वाहनांचे भाग, चपला, पट्टे, पाइप, सायकलचे टायर्स, केबल्स, तारी, दप्तरांचे भाग, बॅटरीचे डबे, लॅटेक्सचे सामान, औषधोत्पादनासंबंधीचे सामान, मोल्ड्स आणि अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

रबर उद्योगाचे वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही सेनादले, विमानोड्डाण, रेल्वे, कृषी, वाहतूक, दळणवळण, खाणी, रुग्णालये, क्रीडा अशा असंख्य दैनंदिन जीवनात आवश्यक असणार्‍या क्षेत्रांत रबर उद्योगाला प्रचंड मागणी आहे आणि ती पुढेही वाढतच जाणार आहे. विशेषतः भारतात रबर क्षेत्रातील लघुउद्योजकांना मोठी संधी आहे. व्यवस्थित नियोजन केले तर कुणीही व्यक्ती रबर उद्योग उभा करू शकतो. आता या रबर क्षेत्रातील तेरा प्रमुख उद्योगसंधी पाहू :

फुगे बनवणे

फुगे हे अगदी पातळ रबरापासून बनवले जातात. साधारणतः आपण उत्तम आणि सोयीस्कर असे लॅटेक्सचे मिश्रण वापरून फुगे बनवू शकतो. वाढदिवस असो वा एखादी पार्टी, भारतात फुग्यांची मागणी प्रचंड आहे.

तसेच सगळ्या खेळण्यांमध्ये फुगे हे सर्वात स्वस्त खेळणे असल्यानेही फुग्यांना आज खूप मागणी आहे. फुगे रस्त्यावर पाच दहा रुपयांना विकण्यापासून मॉलमध्ये अडीचशे ते तीनशे रुपयांतसुद्धा विकले जातात.

खोडरबर बनवणे

खोडरबर हे मुख्यतः नैसर्गिक रबरापासून बनवले जातात. लहान मुले, चित्रकार, अकाऊंटंट अशा सर्वांनाच खोडरबर दैनंदिन कामात गरजेचा असतो. आज देशात तसेच परदेशातील निर्यातीतही खोडरबरला मागणी आहे.

रुग्णालयातील साहित्य बनवणे

नवीन उद्योग रुग्णालयातील रबरी वस्तू जसे हातमोजे, नळ्या, इंजेक्शन्स, ट्रेज इ. वस्तू बनविणारा उद्योग असू शकतो. या सर्व गोष्टी सर्व रुग्णालयांमध्ये फक्त गरजेच्याच नाहीत तर दैनंदिन वापरासाठी लागणार्‍या असतात. यात नक्की कोणत्या वस्तू बनवायच्या हे आपण ठरवू शकतो; परंतु ते ठरविताना आपल्याकडे भागभांडवल किती आहे आणि कोणत्या प्रकारचा कच्चा माल उपलब्ध आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

लॅटेक्सचे धागे बनवणे

हे धागे सामान्यतः होजियरीच्या उद्योगांत वापरले जातात. तसेच हे धागे मासेमारीची अवजारे, खेळणी आणि रुग्णालयातील अनेक साधने बनविण्याकरिता कच्च्या माल रूपात लागतात. छोट्या प्रमाणात परंतु जास्त नफा मिळवून देणारा उद्योग सुरू करायचा असल्यास लॅटेक्सचे धागे बनविणे हा एक उत्तम पर्याय होईल.

रबरबँड निर्मिती

रबरबँड हे घरांपासून कारखान्यांपर्यंत सगळीकडे वापरले जाणारे उत्पादन आहे. जगभरात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) मधून रबरबँड्सना सर्वात जास्त मागणी आहे. वर्तमानपत्र बनविणारे उद्योजक रबरबँडचे सर्वात मोठे ग्राहक आहेत.

कारण त्यांना वर्तमानपत्र घरोघरी नेऊन देण्याआधी त्यांचा गठ्ठा एकत्र ठेवायला मोठ्या प्रमाणात रबरबँडची गरज असते. रबरबँड बनविण्याची प्रक्रिया ही अजिबात किचकट नाही, तर कोणतीही नवउद्योजक होऊ पाहणारी व्यक्ती हा उद्योग सुरू करू शकते.

रबरी पट्टे बनवणे

ज्या कारखान्यामध्ये सतत उत्पादन प्रक्रिया चालू असते त्या कारखान्यांत सामान वाहून नेणार्‍या रबरी पट्ट्याची गरज लागते. भारतातील सतत प्रगतिशील असलेल्या औद्योगिकीकरणामुळे रबरी पट्ट्याची मागणी ही दिवसेंदिवस वाढतच आहे.

थर्मल ऊर्जा बनविणारे उद्योग, खतनिर्मिती करणारे उद्योग, रेल्वे उद्योग, रसायने बनविणारे कारखाने अशा अनेक क्षेत्रांत या पट्ट्यांची गरज लागते. त्यामुळे रबरी पट्टे बनविणारा उद्योग हा रबर क्षेत्रातील सर्वात जास्त नफा मिळवून देणारा उद्योग म्हणता येईल.

रबरी चटई बनवणे

रबरी चटईही अनेक ठिकाणी वापरली जाते, ज्यात प्रामुख्याने कारखान्यांतील लादीवरील आवरण बनविण्यासाठी, कारखान्यात वस्तू स्थिर ठेवण्यासाठी, घरच्या वापरासाठी, पायपुसणी बनवण्यासाठी, गाडी ठेवतो त्या जागी लावण्यासाठी इ.चा समावेश आहे. रबरी चटईची उत्पादन प्रक्रिया फार किचकट नसल्याने लघुउद्योजकांसाठी ही एक चांगली उद्योगसंधी आहे.

रबरी गॅसकेट्स बनवणे

सध्याच्या काळात रबरी गॅसकेट्स बनविणे हा एक उत्तम नफा मिळवून देणारा उद्योग आहे. मुख्यतः वाहन क्षेत्रात आणि मोठ्या कारखान्यांमध्ये या रबरी गॅसकेट्सची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. रबरी गॅसकेट्स बनविण्याचा कारखाना काढणे कोणत्याही नवउद्योजकासाठी सोपे तसेच नफा मिळवून देणारे आहे.

रबरी हातमोजे बनवणे

साधारणतः वैद्यकीय क्षेत्रात, वाहन क्षेत्रात आणि उत्पादन क्षेत्रांत रबरी हातमोज्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हात आणि बोटांचे उष्णता, विजेचा धक्का, ओरखडे, घटक रसायने तसेच विविध साथींपासून रक्षण करण्यासाठी हे रबरी हातमोजे वापरले जातात. हा उद्योग एखाद्या छोट्या स्टार्टअपला जितके भांडवल लागते तितके उभे करून सुरू करता येऊ शकतो.

रबरी शिक्के बनवणे

रबरी शिक्के बनविण्याचा उद्योग आपण घरच्या घरीसुद्धा सुरू करू शकतो. सध्याचे रबरी शिक्के कार्यालयीन वापरासाठी जास्त प्रमाणात वापरले जातात. हा व्यवसाय अतिशय कमी भांडवलातसुद्धा सुरू केला जाऊ शकतो. सध्या रबरी शिक्क्यांसोबत आधीपासूनच शाई साठवून ठेवलेले शिक्के बनविणे हासुद्धा एक उत्तम पर्याय आहे.

रबराची खेळणी बनवणे

आज कुणीही रबराची खेळणी बनविण्याचा उद्योग सुरू करू शकतो, कारण त्यात फार गुंतागुंतीची यंत्रणा (machinery) लागत नाही आणि त्याचा कच्चा मालसुद्धा सहज उपलब्ध आहे. तसेच रबरी खेळण्यांना मागणीसुद्धा भरपूर आहे.

चपला बनवणे

विविध रंगांच्या रबरी पट्ट्यांपासून चपला बनविणे हासुद्धा एक नफा मिळवून देणारा उद्योग आहे. तसेच हा उद्योगसुद्धा घरच्या घरी सुरू करता येऊ शकतो. चपला हे असे उत्पादन आहे ज्याची मागणी कधीच बंद होणार नाही. साधारणतः प्रत्येक मनुष्य चपला रोजच्या रोज वापरतोच. वाढत्या लोकसंख्येसोबत रबरी चपलांची मागणीसुद्धा वाढतच आहे.

टायर्सचे रि-ट्रेडिंग (टायर्सना नवीन आवरण लावणे)

टायर रिट्रेडिंग ही एक आधुनिक पद्धत आहे. या प्रक्रियेने जुने, खराब झालेले टायर्स पुन्हा नवे कोरे असल्यासारखे वापरता येतात. टायरचा जो भाग जमिनीच्या संपर्कात येतो त्याला ट्रेड असे म्हणतात. टायर्स जर उत्तमरीत्या काम करायला हवे असतील तर त्याला ट्रेंड्स लावणे अनिवार्य असते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हा एक नावाजलेला उद्योग आहे.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?