अन्न व खाद्य क्षेत्रातील उद्योगसंधी

‘अन्न हेच पूर्णब्रम्ह’, असं आपल्याकडे म्हटलं जातं. आजच्या उद्योजकीय युगातही ते अगदी १०० टक्के सत्यात उतरताना दिसतं. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याचे साधन म्हणून माणूस उद्योग किंवा नोकरीकडे पाहतो, पण भूक भागवण्याच्या याच प्रश्नातून कित्येक उद्योग आपल्या आजूबाजूला जन्माला आल्याचे आज आपण पाहतो.

यावरूनच आपल्याला लक्षात येतं की काळ कितीही पुढे गेला आणि तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरी खाद्य क्षेत्रातील उद्योगांना मरण नाही. म्हणूनच आज आपण याच क्षेत्रातील काही व्यावसायिक कल्पनांची माहिती करून घेणार आहोत.

उपहारगृह : हॉटेल किंवा उपहारगृह (Restaurant) हे हल्ली कुठेही पाहायला मिळते. त्यामुळे कुठेही चालू शकेल असा हा व्यवसाय आहे. एक चांगला आचारी हा या व्यवसायात अत्यंत आवश्यक असतो. यासोबतच मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आणि विचारपूर्वक/दक्षतापूर्वक नियोजन करण्याचीसुद्धा गरज असते. या उद्योगात जम बसायला वेळ लागतो, त्यामुळे व्यवसायात सयंम खूप महत्त्वाचा आहे.

मिठाई-फरसाणचे दुकान : फरसाण आणि नमकीनचे चाहते सर्वच जण असतात, कोणत्याही उत्सवाला आणि आनंदाच्या प्रसंगी मिठाईला मागणी असतेच. आजकाल सर्वचजण तयार पदार्थांना प्राधान्य देतात. या कारणामुळे स्वतंत्रपणे किंवा एकाच दुकानात या फरसाण आणि मिठाईचा उद्योग हा फायद्याचाच ठरतो. मात्र या व्यवसायात उतरण्यापूर्वी गरज असते बाजाराचा अभ्यास करण्याची.

फास्ट फूड शॉप : सध्याच्या युगात वेळेला इतकं महत्त्व आहे की आपण खाद्यपदार्थांमध्येसुद्धा पटापट बनवल्या जाणाऱ्या पदार्थांना प्रथम प्राधान्य दिलं जातं. म्हणूनच फास्ट फूड शॉप हे सर्वात जास्त लोकप्रिय व्यवसायांमध्ये येतं. तरुण प्रामुख्याने नाश्त्यामध्ये फास्ट फूड्सनाच प्राधान्य देतात. या क्षेत्रातही फ्रँचायझी उपलब्ध आहेत, जंबो वडापाव हे त्यातलेच एक नाव येथे वानगीदाखल देत आहे.

किराणा मालाचे दुकान : हा एक खूप जुना पण आवश्यक असा व्यवसाय आहे. अगदी छोट्या जागेतून याला सुरुवात करता येईल. पण त्यापूर्वी सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. लोकांची गरज आणि आजूबाजूला असलेली इतर दुकानं यांचा अभ्यास करून तुम्हाला तुमच्या किराणा मालाच्या दुकानाची रचना करावी लागेल. कोणत्या प्रकारच्या ग्राहकाला तुम्ही आकृष्ट करणार आहात हे डोळ्यांसमोर धरून तुम्हाला नवीन किरणा मालाच्या दुकानाची ब्रॅण्डिंग करावी लागेल.

बेकरी : कितीही मोठ्या किंवा छोट्या पातळीवर सुरू करता येणारा असा हा खाद्य व्यवसाय आहे. या व्यवसायात सुरु करण्यासाठी बिस्कीट आणि ब्रेड याच्याशी संबंधित वेगवेगळ्या पाककृती तयार करता आल्या पाहिजेत.

कॅटरिंग सेवा : उत्तम नियोजन कौशल्य आणि लोकांना हाताळण्याची क्षमता असल्यास हा व्यवसाय तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. या व्यवसायात सुरवात करणं आणि तग धरणं कठीण जातं, पण हळूहळू जम बसतो.

चॉकलेट बनवणे : चॉकलेट बनवण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी हा व्यवसाय अगदी अनुकूल आहे. कमी गुंतवणुकीत आणि घरून सुरु करता येणाऱ्या व्यवसायांपैकी हा एक आहे.

कुकिंग क्लासेस : महिलांना सहज जमू शकेल असा हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय घरून करता येतो आणि यांच्यामध्ये गुंतवणूकसुद्धा कमी लागते.

फिरते उपहारगृह : आजघडीला सर्वात जास्त लोकप्रिय आणि झपाट्याने वाढत असलेल्या या व्यवसायात गुंतवणूक फार लागत नाही. यामध्ये गरज भासते ते म्हणजे ती योग्य अशा वाहनाची आणि नियमित कच्च्या मालाची.

आइस्क्रीमचे दुकान : वर्षाचे बारा महिने चालणाऱ्या या उद्योगात सुरुवात अगदी कमी भांडवलातून करता येते. या व्यवसायात मोठया कंपन्यांची फ्रँचायझीसुद्धा उपलब्ध आहे, ज्यामुळे मार्केटिंगचे कष्ट वाचू शकतात.

रसवंती गृह/ रसपान गृह : आइस्क्रीमला जोड म्हणून किंवा स्वतंत्रपणे अशा दोन्ही स्वरूपात करता येणार हा व्यवसाय आहे.

डेअरी व्यवसाय : आइस्क्रीमप्रमाणेच हाही एक असा उद्योग आहे ज्यामध्ये तुम्ही मोठ्या उद्योगांची फ्रँचायझी घेऊ शकता, अन्यथा स्वतःची दुग्धोप्त्पादने बनवून विकू शकता.

चायनीज फूड स्टॉल : तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय असलेला असा हा अजून एक व्यवसाय. एखादे महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संकुलाजवळील ठिकाणी हा व्यवसाय जास्त यश देऊ शकतो. तरीदेखील या व्यवसायातसुद्धा पुरेसा बाजाराचा अभ्यास करूनच उतरणे योग्य ठरते.

ऑरगॅनिक दुकान : आरोग्याबद्दल जागरूकता मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे, तेही प्रामुख्याने शहरी भागात लोक आरोग्याबद्दल जास्त सतर्क असतात. त्यामुळेच अशा भागात ऑरगॅनिक अन्नाला जास्त महत्त्व मिळू लागले आहे. म्हणूनच अशा भागात ऑर्गॅनिक पदार्थांचे दुकांनांना चालना मिळू लागली आहे.

पापड उद्योग : जेवणात तोंडी लावण्यासाठी लागणारे पापड हे अगदी घरच्या घरी आणि कमीत कमी पैशात बनवता येतात. त्यामुळे आपण अगदी सोप्या पद्धतीने घरून या उद्योगाची सुरुवात करू शकतो. घरच्या घरी करता येण्यासारखा हा व्यवसाय आहे.

लोणची उद्योग : हा घरून करता येईल असा अजून एक लघुउद्योग आहे. कमी गुंतवणुकीतून सुरुवात करून स्थानिक बाजारपेठेसोबतच निर्यातीचाही विचार या उद्योगात आपण करू शकतो. पापड-लोणची हा व्यवसाय महाराष्ट्रातील अनेक महिला बचत गट करताना दिसतात.

जॅम-जेली बनवणे : ब्रेडवर लावायला उपयोगात येणारे असे हे जॅमचे उत्पादन अगदी घरातूनही सुरू करता येते, तेही कमीतकमी भांडवलात, तर केकवर लावली जाणारी जेलीसुद्धा अशा पद्धतीने तयार करता येते. त्यामुळे हाही फायदेशीर उद्योग आहे.

बिस्कीट-कुकीज बनवणे : घरातून सुरू केला जाऊ शकणाऱ्या व्यवसायांपैकी हा एक व्यवसाय आहे. तसेच यामध्ये तुम्ही स्वतःचे असे बिस्कीट बनवणारे एक स्वयंचलित युनिटसुद्धा उभे करू शकता.

सॉसचे उत्पादन : सॉसचा उपयोग ब्रेडवर लावून खाताना, तसेच बटाटा वडा, समोसा अशा फास्ट फूडमध्ये चटणीसोबत केला जातो. याचे सोया सॉस, टोमॅटो सॉस असे वेगवेगळे प्रकार आहेत. बाजारातील मागणी आणि भांडवलाची गरज या दोहोंच्या आधारे तुम्ही हा उद्योग सुरू करू शकता.

आहार सल्लागार : आहार व आरोग्य विषयक अभ्यासक्रम पूर्ण करून, प्रशिक्षण घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. आज लोकांमध्ये प्रकृती व आरोग्यविषयक जाणीव वाढते आहे त्यामुळे या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?