भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

“तुम्ही मनापासून तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले तर सबंध जग तुमची मदत करतं”, हे वाक्य दादासाहेब फाळके यांचं जीवनचरित्र जाणून घेतलं तर लक्षात येतं. दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात. पहिला भारतीय चित्रपट त्यांनी निर्माण केला.

धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. १८८५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्याच जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला.

नंतर त्यांनी बडोदा येथील कलाभवनात शिक्षण घेतले. तेथील प्राचार्य गज्जर यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे शिल्पकला, चित्रकला, थ्री कलर प्रोसेसिंग व छायाचित्रण अशा क्षेत्रांत विविध प्रयोग केले. या काळात त्यांनी जादूविद्यासुद्धा आत्मसात केली व जादूचे यशस्वी प्रयोगही केले.

आता त्यांच्या आयुष्यात त्यांचं संपूर्ण जीवन परिवर्तित करणारी घटना घडली. दादासाहेबांनी ‘दी लाइफ ऑफ ख्राईस्ट’ हा चित्रपट पाहिला. या चित्रपटामुळे ते इतके प्रभावित झाले की, त्यांना वाटू लागले, आपणही चित्रपट निर्माण करावा; पण चित्रपट निर्माण करण्यासाठी त्याविषयीचे शिक्षण घेणे आवश्यक होते.

यासाठी त्यांनी आपल्या परिचितांकडून कर्ज घेतले व १९१२ साली इंग्लंडला चित्रपट तंत्र शिकण्यासाठी गेले. योग्य शिक्षण घेऊन आणि सामग्री जमवून ते पुन्हा भारतात परतले व त्यांनी आपल्या घरातच स्टुडिओ उघडला.

‘रोपट्यांची वाढ’ हा पहिला लघुपट त्यांनी निर्माण केला. नंतर त्यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. हा भारतातील पहिला मूकपट (ज्या चित्रपटांत संवाद नसतात) होय. म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपटाचा जनक म्हणतात. या चित्रपटात लेखक, रंगवेशभूषाकार, संकलक, कलादिग्दर्शक अशा भूमिका फाळकेंनी निभावल्या.

प्रथम मुंबईत व नंतर गावोगावी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट यशस्वी ठरला. अनेक विदेशी संस्थांनी दादासाहेब फाळकेंना चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी निमंत्रण दिले, पण त्यांना जन्मभूमीचीच सेवा करायची होती त्यामुळे त्यांनी या संधी नाकारल्या.

पुढे दादासाहेब फाळकेंनी ‘मोहिनी भस्मासुर’, ‘सत्यवान सावित्री’, ‘कालियामर्दन’, ‘गंगावतारम’ या चित्रपटांची निर्मिती केली. १ जानेवारी १९१८ रोजी त्यांनी ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ स्थापन केली. तेव्हा ‘लंकादहन’, ‘श्रीकृष्णजन्म’ हे चित्रपट निर्माण झाले. ‘लंकादहन’ हा भारतातील पहिला सुपरहिट चित्रपट ठरला. नंतर त्यांनी लहान मुलांसाठी माहितीपट व लघुपट तयार केले. सुमारे शंभर चित्रपटांची निर्मिती दादासाहेबांनी केली.

सन १९७० पासून म्हणजेच दादासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षापासून केंद्र शासनाने ‘दादासाहेब फाळके’ या सर्वोच्च पुरस्काराने चांगली कामगिरी करणार्‍या कलाकारांना गौरविण्यात येतं.

– जयेश मेस्त्री 

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?