Advertisement
उद्योगोपयोगी

नवउद्योजकांना बँकेकडून कर्ज कसं मिळेल?

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा म्हटला की आपल्या समोर पहिला प्रश्न उभा राहतो की, त्यासाठी लागणारे भांडवल कसे उभे करायचे? व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्यांपैकी सत्तर ते ऐंशी टक्के लोकांची गाडी इथेच अडते आणि त्यांचा व्यवसाय आयुष्यात कधीच सुरू होत नाही.

आपल्या देशात; विशेष म्हणजे आपल्या मराठी समाजात दुसऱ्याच्या व्यवसायावर सढळ हस्ते पैसा लावावा इतका मुबलक पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्यांपैकी सत्तर ते ऐंशी टक्के लोकांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत. त्यामुळे आपण बँक व अन्य वित्तसंस्थांकडून पद्धतशीररीत्या भांडवल उपलब्ध करू शकलो तर आपली उद्योजक होण्याची स्वप्ने पूर्ण होऊ शकतील.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

बँक व कर्जविषयक पूर्वग्रह दूर करा

बँकेकडून कर्ज मिळत नाही किंवा बँकेतून कर्ज मिळवणे कठीण जाते किंवा बँकेत वशिलाच लागतो, असे वेगवेगळे पूर्वग्रह मनात ठेवल्यामुळे आपण या पर्यायांकडे गांभीर्याने पाहत नाही. आपल्या मनात अशा प्रकारचा कोणताही गैरसमज असल्यास एक विचार करावा की, बँकेचा व्यवसाय काय आहे?

सामान्य माणसाची बचत खाती आणि ठेवी सांभाळणे एव्हढ्यानेच बँका चालू शकतील का? योग्य व्यक्तीला कर्जपुरवठा करणे आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या व्याजावर अधिकाधिक नफा कमावणे हाच बँक व अन्य वित्तसंस्थांचा व्यवसाय आहे.

योग्य अर्जदारास कर्ज देणे हेच जर का बँकेचे काम असेल व आपल्याला बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करायचे असेल तर आपल्याला स्वतःला योग्य अर्जदार म्हणून सिद्ध करणे गरजेचे आहे.

व्यावसायिक कर्ज मिळवण्याची पूर्वतयारी

बचत करा :

कोणत्याही व्यवसायात तुम्ही स्वतः किती भांडवल लावता आहात हे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही स्वत:च्या व्यवसायात पैसा लावणार नसाल तर बँक किंवा अन्य कोणी का लावेल? तुम्ही नोकरी करत असाल किंवा विद्यार्थी असाल, तर आतापासून स्वतःच्या व्यवसायासाठी बचत करायला सुरुवात करा. बँकेने तुम्हाला कर्ज देण्यासाठी तुमचे त्या बँकेशी व्यवहार असले तर ते चांगले.

त्यामुळे योग्य बँकेची निवड करून त्यात बचत खाते (Saving Account), आवर्ती खाते (Recurring Account) किंवा ठेवी (Fixed Deposit) यापैकी तुम्हाला योग्य वाटेल त्यात पैसे जमा करायला सुरुवात करा. चांगल्या एखाद्या म्युच्युअल फंडाची SIP घेऊन त्यातसुद्धा पैसे गुंतवू शकता. अशा प्रकारे बचत करून दोन-तीन वर्षांत थोडी का होईना, पण तुमची स्वतःची राशी जमा होईल.

CIBIL score तयार करा :

भारतीय अर्थव्यवस्थेत सिबिलचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुमचा सिबिल तपासल्याशिवाय तुम्हाला कोणतीच वित्तसंस्था कर्ज देत नाही. अनेक तरुणांचे व नवोदित उद्योजकांचे सिबिल हे शून्य असतात, कारण त्यांनी याआधी कधी कर्ज घेतलेले नसते.

सिबिल स्कोअरविषयी सविस्तर लेख वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा –> udyojak.org/importance-of-cibil/

आपला सिबिल तयार करण्यासाठी 15 ते 20 हजार रुपयांचे तरी बँक किंवा वित्तसंस्थेकडून कर्ज घ्या. हल्ली मोबाइल किंवा अन्य उपकरणे घेण्यासाठी अनेक छोट्या छोट्या फायनान्स कंपन्या कर्ज देतात. तुलनेने ही छोटी कर्ज मिळवणे सोपे असते.

अशी कर्जे घ्या व नियमाप्रमाणे त्याचे EMI म्हणजे हप्तेन हे न चुकता फेडा. तुमचा एकही EMI bounce होणार नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्या. तुम्हाला कर्ज मिळाले व तुम्ही त्याचे EMI न चुकता भरू लागलात, की तुमचा सिबिल score सुधारायला लागेल. एकूण 900 पैकी तुमचा score 700+ असायला हवा. 700+ सिबिल असलेले अर्ज फेटाळले जाण्याची शक्यता खूप कमी असते.

आवश्यक नोंदणी :

तुमच्या व्यवसायाची नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. उद्योग नोंदणी करण्याचे खालील प्रकार आहेत. त्यापैकी तुम्ही योग्य पर्याय निवडून व्यवसायाची नोंदणी करू शकता.

– एकल मालकी (Sole Proprietary firm)
– भागीदारी (Partnership Firm)
– एकल व्यक्ती कंपनी (One Person Company)
– सीमित भागीदारी (Limited Liability Partnership)
– खासगी कंपनी (Private Limited Company)

चालू खाते (Current Account) उघडा :

बरेच छोटे उद्योजक हे बँकेत चालू खाते उघडण्याऐवजी व्यवसायाचे बरेचसे व्यवहार हे स्वतःच्या बचत खात्यातूनच करतात. ही अतिशय चुकीची पद्धत आहे. तुमचे सर्व व्यवसायासंबंधी व्यवहार हे फक्त कंपनीच्या चालू खात्यातूनच व्हायला हवेत.

तुमच्या स्वतःच्या खर्चासाठी एक ठरावीक रक्कम दरमहा तुमच्या बचत खात्यात वळती करा व स्वतःचे वैयक्तिक सर्व व्यवहार हे तुमच्या बचत खात्यातून करा. शिवाय तुम्ही अधिकाधिक व्यवहार हे डिजिटल करायला सुरुवात करा. रोखीने व्यवहार शक्यतो टाळा.

उलाढाल (Turnover) वाढण्याला प्राधान्य द्या :

तुमची पत ही तुमच्या उलाढालीवर ठरते. तुम्हाला अधिकाधिक कर्ज उपलब्ध होण्यासाठी तुमची उलाढाल अधिकाधिक असणे गरजेचे आहे. उलाढाल म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तुमची विक्री. विक्रीचे आकडे हे दिवसा-महिना-वर्षागणिक वाढत जायला हवेत.

आयकर परतावा भरा :

आयकर परतावा (Income tax) तुम्ही भरणे बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अनिवार्य आहे. तुमचे उत्पन्न कमी असल्यास तुम्ही NIL return म्हणजे शून्य कर भरू शकता, पण return file करणे खूप गरजेचे आहे.

बँक कर्ज

बँकेकडून प्रामुख्याने दोन प्रकारची व्यावसायिक कर्जे दिली जातात.

टर्म लोन (दीर्घकालीन कर्ज)

व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, जागा इत्यादी घेण्यासाठी बँकेकडून तुम्हाला टर्म लोन दिले जाते. टर्म लोन मिळवण्यासाठी तुमचा व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच बिझनेस प्लॅन तयार हवा. या प्लॅनमध्ये व्यवसायात लागणारी यंत्रसामग्री, कच्चा माल, जागा इत्यादी स्थायी गोष्टींच्या तरतुदी केलेल्या असतात.

सोबत तुम्ही या प्रोजेक्टमधून कशा प्रकारे नफा कमवाल व बँकेचे पैसे परत फेडाल याचे विवरणही तुम्हाला द्यावे लागते. तुम्ही दिलेल्या प्रोजेक्ट रिपोर्ट बँक अभ्यास करून ते वास्तवात येणे शक्य आहे की नाही याची पडताळणी करते व त्यानुसारच तुम्हाला कर्ज मंजूर केले जाते.

अनेक वेळा हे कर्ज तुमच्या खात्यात न देता यंत्रविक्रेता व अन्य पुरवठादारांना परस्पर दिले जातात. त्यामुळे कर्ज ज्या कारणासाठी दिले जात आहे, त्याचसाठी पैसे वापरले जातात. टर्म लोन हे तुम्हाला ठरावीक कालावधीपर्यंत दिले जाते. मासिक हप्त्यानुसार तुम्हाला त्याची परतफेड करायची असते.

नवउद्योजक अनेक सरकारी योजनांनुसार टर्म लोनसाठी अर्ज करू शकतात. सरकारी योजनांनुसार तुम्हाला काही प्रमाणात अनुदानही मिळू शकते. तुम्ही व्यवसाय करून अन्य लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, या उदात्त हेतूने सरकार हे अनुदान देत असते. मात्र बरेच तरुण हे निव्वळ अनुदान मिळवणे हेच आपले ध्येय समजत असतात. अशा वेळी तुमचे ध्येय तुमचा उद्योग उभा करण्यापासून विचलित होऊ शकते हे विसरू नका.

कॅश क्रेडिट – वर्किंग कॅपिटल (खेळत्या भांडवलासाठी)

कॅश क्रेडिट हे व्यवसायाच्या अन्य दैनंदिन गरजा भागवण्यासाठी खेळते भांडवल म्हणून दिले जाते. तुमच्या वर्षभराच्या संकल्पित (प्रोजेक्टेड) उलाढालीच्या वीस टक्क्यांपर्यंत कॅश क्रेडिट तुम्हाला मिळू शकते. कॅश क्रेडिट ही व्यवसाय उत्तमरीत्या चालावा यासाठी दिली जाणारी सुविधा आहे.

तुम्हाला जी राशी मंजूर केली असेल, त्यापैकी तुम्हाला महिनाकाठी जेवढे पैसे वापराल तेवढ्यावरच व्याज आकारले जाते. तुमचे debtors व stock याच्या आधारावर तुम्हाला कॅश क्रेडिट मंजूर केले जाते. मंदीतही व्यवसाय सुरळीत चालावा यासाठी चांगल्या कॅश क्रेडिटची गरज असते.

बँक व वित्तसंस्थांकडून व्यवसायासाठी इतरही विविध प्रकारची कर्जे व सुविधा दिल्या जातात. यासाठी आपल्याला बँकेशी सुरळीत व्यवहार व दृढ संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे.

बँकेकडे कर्ज मागायला जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, बँक ही लाखो-करोडो लोकांच्या आयुष्यभराच्या जमापुंजीचे रक्षण व संवर्धन करत असते. त्यामुळे ती नव्याने कर्ज घेणाऱ्या प्रत्येकाचीच काटेकोर तपासणी करते. त्यांचे हे कर्तव्य आहे. तुम्ही त्यांच्या कसोटीला तावून सुलाखून उतरणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्हाला कर्ज मागायला गेलो असता बँकेने उभेसुद्धा केले नाही, अशी ओरड करत बसण्यापेक्षा याला एक कसोटी म्हणून घ्या व त्याचा सामना करा.

– शैलेश राजपूत


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!