हजारो वर्षांपासून आपला भारत मसाले व मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. तर अशा मसाल्याच्या उद्योगासाठी नवउद्योजकाला नक्की काय करावे लागेल ते बघू या.
१. व्यवसाय करण्याची मानसिकता : या विषयावर सदर प्लॅटफॉर्मवर खूप चर्चा झालेली आहेच. तुम्ही हा लेख वाचत आहात याचाच अर्थ तुमची व्यवसाय करण्याची मानसिकता तयार झालेली आहे. शंका असल्यास यावर पुन्हा एकदा विचार करा.
२. सुरुवात करण्यापूर्वी : मार्केट फिरून या, आपल्याला जे मसाले विकायचे आहेत तेच विकले जातायत का ते पहा, किती प्रतिस्पर्धी आहेत, त्यांचा अंदाज घ्या. लक्षात ठेवा, सुरुवातीला बड्या ब्रँड्ससोबत आपल्याला स्पर्धा करायची नाहीये. ते जिकडे कमी पडत आहेत त्या बाजूने आपण मार्केट काबीज करू शकतो. त्यांना सरळ टक्कर द्यायला गेलात तर सपशेल अपयशी व्हाल हे लक्षात ठेवा.
आपल्या प्रतिस्पर्ध्यांची गुणवत्ता व आपली गुणवत्ता तपासून पहा. आपल्याला मसाले जमतात का हे त्रयस्थ लोकांकडून जाणून पहा.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)३. सुरुवात करताना : सुरुवातीलाच प्रचंड पैसा ओतून, प्लांट उभा करून, दणक्यात ओपनिंग करून सुरुवात करू नका. सुरुवातीला आपले मसाले हे बिना ब्रँडचे, साध्या पिशवीतून ओळखी-पाळखीच्यांनाच विकायचे आहेत. हे करताना फायद्या-तोट्याचा फारसा विचार करू नका, रिस्पॉन्स चेक करत राहा.
एकदा हे जमायला लागलं की मग आपण कारखाना टाकायचा विचार करू शकतो. त्यासाठी आपल्याला लागेल जागा, मशिनरी, कामगार, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कारखान्याला साजेसे मार्केट.
लहान जागा या व्यवसायाला पुरते. महागड्या मशिन्स इतक्यात घेऊ नका. ग्राइंडिंग, मिक्सिंग आणि पॅकिंगच्या मशिन्स स्वस्तात उपलब्ध असतात. मिळाल्या तर सेकंड हँड मशिन्स घ्या. कामगार लगेच घेऊ नका. शक्य झाले तर सुरुवातीला घरातल्या लोकांचे सहकार्य घेऊन कारखाना चालवा.
ब्रँडचे नाव ठरवा, फूड लायसन्ससाठी अर्ज करून ठेवा. पॅकिंगसाठी स्वस्तातील स्वस्त पर्याय वापरा, पण आतील मसाले सुस्थितीत राहतील याकडे लक्ष असू द्या.
४. कच्चा माल : केरळ हे सर्व मसाल्यांच्या पदार्थांचे आगार आहे, एकदम मागवला तर कच्चा माल स्वस्त मिळतो हे सर्व मान्य, पण आपल्याला आता लगेच हे करून चालणार नाही.
सुरुवातीला लोकल होलसेलरकडून कच्चा माल घ्या. लागेल तेवढाच घ्या. प्रचंड साठा करून ठेऊ नका. कच्च्या मालातील भेसळ कशी ओळखायची ते शिकून घ्या. एकाच पदार्थाच्या वेगवेगळ्या क्वालिटीज असतात त्या अभ्यासा.
५. प्रोडक्शन व गुणवत्ता : प्रोडक्शनवर स्वतः लक्ष ठेवा. मसाले करताना सर्व कामगार एकच कृती वापरत आहेत ना यावर लक्ष ठेवा. एखादा घटक पदार्थ मागेपुढे झाला तर पदार्थांच्या चवीत बदल होतो. आपल्या मसाल्याची चव, शुद्धता आणि गुणवत्ता एकसारखीच राहिली पाहिजे. तरच ग्राहक टिकेल.
जागेची स्वच्छता ही तेवढीच महत्त्वाची आहे. शक्यतो मानवी त्वचेचा स्पर्श मसाल्यांना होऊ नये, यासाठी प्रयत्न करा (उदा. ग्लोव्हज वापरणे). मसाल्यासंदर्भात ग्राहकाच्या मनात स्वच्छतेविषयी शंका निर्माण झाल्यास आपले भविष्यातील बरेच ग्राहक तो कमी करू शकतो हे लक्षात असू दे.
अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे व त्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या. तयार झालेले मसाले व शिल्लक कच्चा माल कसा साठवून ठेवावा हे माहीत करून घ्या; जेणेकरून त्यात किडे वगैरे होणार नाहीत. मसाल्यांच्या पाउच मागे Nutrition Chart छापावा लागतो. त्यासाठी मसाल्यांचे फूड लॅबमधून रिपोर्ट करून घ्या.
५. मार्केटिंग : तुम्ही जेवढा कारखान्याचा डोलारा मोठा उभा कराल, तेवढं जास्त मार्केटिंग तुम्हाला करावं लागणार आहे हे लक्षात ठेवा. नुसतं भराभर उत्पादन करून ठेवून उपयोग नाही. ते विकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ग्राहकांची गरज ओळखून मार्केटिंग करा.
दुकानदारांना प्रॉडक्ट बद्दल सांगताना इतरांच्या प्रॉडक्टची बदनामी अथवा मानहानी करू नका. सुरुवातीला खूप लोक तोंडावर नकार देतील. नाउमेद न होता जोमाने दुसरे मार्केट शोधा. तुमच्या कमिशनचे गणित सर्व दुकानदारांना एकसारखे असेल असे पहा व ते सोप्या रीतीने सर्व दुकानदारांना समजेल अशा भाषेत मांडा. कष्ट घेतलेत तर मार्केट नक्की मिळेल.
७. ग्राहकांचा प्रतिसाद : सुरुवातीला ग्राहकांचे फोन कॉल्स स्वतः घ्या. कोणते बदल केले पाहिजेत ते अभ्यासा. सर्वांनाच तुमचा मसाला आवडेल असे अजिबात नाही व तसे असूही नये; मात्र खूपच तक्रारी येत असतील तर तातडीने पावले उचला. उत्पादनातील त्रुटी असेल तर ग्राहकाला त्याचे पैसे परत करा अथवा त्याला रिप्लेस प्रॉडक्ट द्या. ग्राहक समाधानी असेल तरच व्यवसाय सफल होतो.
वर सांगितलेल्या गोष्टी वाचून आपल्याला मसाले व्यवसायाचा साधारण अंदाज आला असेल. हे वाचून आपल्याला सुरुवात करताना एक दिशा मिळेल अशी आशा व्यक्त करतो. तुमच्या उद्योगात तुम्हाला भरपूर यश मिळो हीच सदिच्छा!
– प्रथमेश शिरटीकर
(लेखक स्वतः मसाल्यांचे निर्माते आहेत. ‘स्पार्क मसाले’ हा त्यांचा मसाल्याचा ब्रॅण्ड आहे.)
संपर्क : 9172658918
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.