वेल्डिंग व्यवसाय कसा सुरू कराल?

दोन अथवा त्याहून अधिक धातूंना जोडण्याच्या प्रक्रियेला ‘वेल्डिंग’ असे म्हटले जाते, तर वेल्डिंग करणार्‍या कारागिरास ‘वेल्डर’ म्हणतात. भारतात दरवर्षी अंदाजे ६० दशलक्ष टन पोलादाचा वापर होतो. त्यातील बहुतेक पोलाद हे रेल्वेगाड्या, अवजड वाहने, पूल आदी ठिकाणी वापरले जाते.

देशात मॅन्युफॅक्चारिंग, पायाभूत विकास, वीजनिर्मिती, जहाज बांधणी, रेल्वे, बिल्डींग बांधकाम, ऑटो क्षेत्र, संरक्षण साधने अशा विविध क्षेत्रांचा झपाट्याने विकास होत आहे. या प्रत्येक क्षेत्रात स्टीलच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

भारतात दरडोई स्टीलचा वापर जेमतेम ६० किलो असून अमेरिकेत हेच प्रमाण दरडोई ३०० किलो आहे. इतर देशांचा विचार करता जगाची सरासरी २१५ किलो स्टीलची आहे. पुढील पाच वर्षात स्टीलच्या प्रमाणात तिपटीने वाढ होणार असून मोठ्या प्रमाणात कुशल वेल्डरची गरज लागणार आहे.

याचाच विचार करून सध्या राज्यात माध्यमिक शाळेतच विद्यार्थ्यांना मल्टी स्कील अंतर्गत वेल्डिंगचे प्रशिक्षण दिले जाते. यात प्रामुख्याने वेल्डिंगचे प्रकार आर्क, गॅस, फोर्ज वेल्डिंगचे प्रात्यक्षिक, विविध जोड, वेल्डिंग करतांना घ्यावयाची काळजी, प्रीहिटिंग, वेल्डिंगच्या सहाय्याने चप्पल स्टन्ड, घडवंची, पुस्तक ठेवणी तयार करणे आदींचे प्रशिक्षण दिले जाते.

देशातील औद्योगिक क्षेत्रातील वेल्डिंग टेक्नोलॉजी क्षेत्रात कुशल कामगारांची संख्या कमी आहे. सध्या भारतात दीड लाख कुशल वेल्डरचा तुटवडा आहे. स्टीलचा वापर वाढल्यास व्यावसायिक कुशल वेल्डरचा आणखी तुटवडा निर्माण होऊ शकतो.

कुशल वेल्डर निर्माण करण्यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग’ या प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या देशभरात १४ शाखा असून ही संस्था जागतिक स्तरावर काम करणार्‍या ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग’ ची सभासद आहे.

या संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचे वेल्डिंगचे विविध कोर्सेस घेतले जातात. गेल्या पाच वर्षात भारतात केवळ ६०० प्रमाणित वेल्डर प्रशिक्षित झाले. तर याच काळात चीनने तब्बल २२ हजार वेल्डर प्रशिक्षित केले आहेत.

पुढील दहा वर्षात भारताला पायाभूत क्षेत्रातील विकास कामांसाठी ९० हजार कुशल वेल्डरची गरज भासणार आहे. आज अरब राष्ट्रात तसेच ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, आफ्रिका या देशात वेल्डरला चांगल्या पगारावर मागणी आहे.

आयटीआय मधील वेल्डर या कोर्स व्यतिरिक्त मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन वेल्डिंग ऑपरेशन, इंटीग्रेटेड कोर्स इन बेसिक वेल्डिंग, सर्टिफिकेट कोर्स इन अ‍ॅडव्हान्स वेल्डिंग, सर्टिफिकेट कोर्स इन आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंग आदी कोर्स इंडो जर्मन टूलरूम औरंगाबाद येथे उपलब्ध आहे.

या सर्व कोर्ससाठी दहावी उत्तीर्ण पाहिजे. बारावी सायन्स, तंत्रनिकेतन पदविका, अथवा इंजिनिअरींग पदवीधर विद्यार्थी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग’ या संस्थेत अभ्यासक्रमांसाठी नाव नोंदवू शकतात.

याची सविस्तर माहिती www.iiwindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. येथे ‘मास्टर इन वेल्डिंग टेक्नोलॉजी’ हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम उपलब्ध असून इंजिनिअरींग शाखेतील पदवीधर विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.

वेल्डिंगचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महावितरण, महानगरपालिका, खासगी कंपनी, एस टी महामंडळ, टेलिफोन कार्यालय, रेल्वे विभाग, बांधकाम विभाग, विविध लॅब टेक्निशियन, आयटीआय, तंत्रनिकेतन, तसेच विविध शाळा, महाविद्यालय यातील तांत्रिक शिक्षक, व्यवसाय प्रशिक्षक आदी ठिकाणी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

विद्यार्थी स्वतःचा व्यवसायदेखील करू शकतो. यात वेल्डिंग वर्कशॉप सुरु करू शकतो. विविध कंपनीत ट्रेनी वेल्डरला १५ ते २० हजार रुपये प्रतिमाह वेतन दिले जाते. कुशल वेल्डरला प्रतिमाह वीस ते चाळीस हजार रुपये वेतन दिले जाते.

स्वतःचे वर्कशॉप असल्यास यातून तीस ते साठ हजार रुपये प्रतिमाह कमाई होऊ शकते. प्रत्येक गावात गल्लोगल्ली आपण अनेक फॅब्रीकेशनचे वर्कशॉप पाहतो. वेल्डिंगचे महत्त्व इथेच आपल्याला जाणवते.

– मधुकर घायदार
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक
9623237135

Author

  • मधुकर घायदार यांचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनीअरिंग झाले असून ते राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शिक्षक आहेत. 'शिक्षक ध्येय' या साप्ताहिकाचे ते संपादकही आहेत.

    संपर्क : 9623237135 ई-मेल : madhukar.ghaydar@gmail.com

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?