जोडोनिया धन उत्तम व्यवहारे

पैसा ही एक अशी गोष्ट आहे की जी मिळवण्यासाठी आपण आपले आयुष्य खर्ची घालतो; परंतु तो कितीही कमावला तरी बहुतेकांना समाधान मिळत नाही. अशांना पैसा कमीच पडतो. अशी माणसं जणू पैशासाठी जगत असतात. खरं तर पैशानं सगळ्याच गोष्टी साध्य होतात असे नाही.

मात्र त्याच्यामुळे बर्‍याच गोष्टी साध्य होतात. समजा आपण एखाद्या निर्जन बेटावर आहोत. तिथं आपल्याला भरपूर पैसे दिले गेले आहे; परंतु तिथं खाण्याचे पदार्थ नाहीत, पिण्यासाठी पाणी नाही, मानवी वस्ती नाही आणि अन्य भौतिक सुविधा नाहीत.

अशा ठिकाणी आपल्याकडील पैशानं आपण काय करू शकतो? काहीच नाही. तिथं पैशाला काहीही मूल्य नाही. पैशाची ही मर्यादा ओळखणं अतिशय आवश्यक आहे.

पैसा हे वस्तूविनिमयाचं माध्यम आहे. कोणत्याही वस्तूचं मूल्यनिर्धारण करण्याचं ते मापदंड आहे. पैसा म्हणजे सुख, यश असे म्हणता येईल का? आपल्या गरजा भागल्यानंतर जी मन:स्थिती निर्माण होते, त्यातून यशाची भावना किंवा सुखाची भावना निर्माण होते. मात्र जास्त पैसे मिळवले म्हणून यशस्वी झालो, असं म्हणता येईल का? यश पैशानं मोजता येईल का?


'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹२२२ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)

उद्दिष्टपूर्ती, कार्यसिद्धी हे यशाचे मापदंड असतील, तर पैसा हा फार तर त्याचे साधन असेल; पण पैसा हे साध्य कधीच नसतं. कधी कधी आपण पैशाला साध्य समजून बसतो आणि मग सुख आणि यश बाजूला ठेवून या भ्रामक पैशाच्या पाठीमागे धावून दु:खी होत राहतो.

खिशात पैसा म्हणजे जीवनाला आधार, असा काहींचा समज असतो. पैसा असल्यानं आता माणसांच्या आधाराची गरज नाही, असे समजून आपण सुरक्षित असल्याचं त्यांना वाटू लागतं. ही मंडळी स्वत:च्या वर्तमानासाठी, म्हातारपणासाठी, इतकेच नव्हे तर पुढील पिढ्यांसाठीही पैशांची तरतूद करू लागतात.

पैसा आणि सुरक्षितता यांचा संबंध अशाप्रकारे जोडल्याने ते सतत पैशाच्या मागे धावू लागतात. यामुळे पैसाच त्यांचे जीवन नियंत्रित करू लागतो आणि ही मंडळी पैशांच्या साहाय्याने सारे काही विकत घेण्याचा प्रयत्न करतात; इतरांच्या भावनांचा विचार न करता त्यांचं जीवनही नियंत्रित करू लागतात.

मात्र अशांना पैसा सुख देत नाही. म्हणूनच अनेक धनाढ्य मंडळी दु:खी, कष्टी असल्याचं आपल्याला दिसतं. संतोष, तृप्ती, समाधान हे इतरांसाठी काहीतरी केल्यानं मिळत असतं.

आपल्याकडे पैसा असेल आणि इतरांना अडचणीच्या वेळी त्याची मदत केल्यास निश्चितच समाधान मिळतं. इतरांविषयी वाटणारे प्रेम, सलोखा, आस्था ही मानवी जीवनाची पूर्णत्वाची अवस्था आहे. म्हणूनच पैशानं ती तयार होत नाही. पैशाने श्रीमंत असणारी, इतरांना मदत करावी असं वाटणारी माणसं लोभी नसतात. ती पैशाचा उपयोग चांगल्या कामासाठी करतात.

मात्र हेही लक्षात घ्यायला हवं की पैशाचा त्यागही करून चालत नाही. ते दुसरं टोक झालं. पैसा आला पाहिजे आणि तो नीट वापरला पाहिजे. पैशाचा योग्य वापर करता आला तर पैसाही मोठं सुख देऊ शकतो. मोठं समाधान देऊ शकतो. टोकाचा त्यागही नको आणि टोकाचा लोभही नको, यामध्ये तारतम्य ठेवून जर मध्यम मार्ग स्वीकारला तर पैसा खूप काही करू शकतो.

पैसा हे साधन आहे, हे आपल्याला समजायला हवं. समाधान, प्रेम, यश ही उद्दिष्टं आहेत. पैशाच्या साधनाद्वारे आपण आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचायला हवं. आपण पैशाचे गुलाम होता कामा नये; पैशाला आपला गुलाम करायला हवा.

सन्मार्गाने पैसा मिळवल्यानं आणि तिचा योग्य विनियोग केल्यानं अधिक सुखी होऊ. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेच करी’, असं संत तुकाराम महाराजांनी म्हणूनच म्हटलं आहे.

– डॉ. संतोष कामेरकर
7303445454
(लेखक व्यवसाय मार्गदर्शक आहेत.)

Author

  • डॉ. संतोष कामेरकर हे एक प्रतिथयश उद्योजक, प्रसिद्ध वक्ते व प्रशिक्षक आहेत. त्यांनी स्वतःला शून्यातून उभं करून आज करोडोंमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक नाउमेद तरुणांना प्रेरणा देणारा आहे. संपर्क : 7303445454

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?