‘कायझेन’ म्हणजे सतत चांगले बदल घडवणे

जपान – उगवत्या सूर्याचा देश. दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात अमेरिकेने जपानवर दोन अणुहल्ले केले आणि उगवत्या सूर्याच्या या देशाला एक मोठे ग्रहणच लागले. या अणुहल्ल्यांनी जपानचा कणाच मोडून काढला. अर्थव्यवस्था कोलमडून टाकली.

अस्मिता बेचिराख केली, पण जपान आणि जपानी माणूस हा अत्यंत चिवट वृत्तीचा मानला जातो. इतक्या महाकाय संकटाला सामोरे जाऊनही त्यांच्यात पुन्हा उभे राहण्याची उमेद जीवंत होती.

आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या रद्दी आणि कचर्‍यापासूनच जपानने आपली अर्थव्यवस्था उभी करायला सुरुवात केली. रद्दीमालाची बाजारपेठ ते आज जगात सर्वात उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन करणारा देश या जपानच्या वाटचालीचे श्रेय जाते ते त्याच्या व्यवस्थापकीय कार्यपद्धतीला.

या कार्यपद्धतींपैकी एक आहे ‘कायझेन’. ‘कायझेन’ या जपानी शब्दाचा अर्थ हा ‘काय’ म्हणजे बदल आणि ‘झेन’ म्हणजे चांगला. कायझेन म्हणजे चांगला बदल.

‘कायझेन’मध्ये आपण दररोज जे करतो, त्यामध्ये काही ना काही चांगला बदल आणि तोही सामुहिकरीत्या केला जातो. त्यानंतर त्याचे standardization केले जाते, म्हणजेच हा बदल हा त्या ठराविक प्रक्रियेतील एक भाग होऊन जातो.

उदा. एखादे उत्पादन घेत असताना ठराविक वेळ लागतो तसेच ठराविक श्रम घ्यावे लागतात, तेच जर का त्यामध्ये काही बदल केल्यास लागणारा वेळ आणि श्रम यांची बचत होऊ शकत असेल, तर तो बदल करून त्याच्या अनुमानाची नोंद केली जाते व पुढच्या वेळी तेच काम करताना या बदलाप्रमाणे काम सुरू केले जाते. जेणेकरून पूर्वी लागणारा जास्तीचा वेळ आणि श्रम हे स्वाभाविकच या प्रक्रियेत कमी होतात.

कोणत्याही गोष्टीत सुधारणा करण्यासाठी त्यात कमतरता कशात आहे याची जाणीव होणे आधी गरजेचे आहे. कायझेनची सुरुवात ही या जाणिवेने होते. समस्या काय आहे जे जाणूनच घेतले नाही, तर त्यात सुधारणा करणे शक्यच नाही.

आपण भारतीयांच्या बाबतीत हा दोष मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आपण जे करत आहोत, त्यात आपल्याला कोणतीही उणीव दिसूनच येत नाही. यामुळे आपण त्यामध्ये सुधारणा करण्यास तयारच नसतो.

  • कायझेनचे दुसरे वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये जेथे समस्या आहे त्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देणे हे अनिवार्य आहे. कायझेनच्या परिभाषेत याला ‘गॅम्बा’ म्हटले जाते. ‘गॅम्बा’मध्ये प्रत्यक्ष ठिकाणाहून समस्येविषयी माहिती गोळा केली जाते आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यावर उपाययोजना केली जाते.
  • कायझेन म्हणजे व्यवस्थेमध्ये कोणताही मोठा बदल नसून ती छोट्या-छोट्या बदलांची शृंखला आहे.
  • कायझेनमध्ये असलेल्या परिस्थीतीत समाधानी न राहता त्यात सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो.
  • कायझेन हे केवळ उत्पादन क्षेत्रातच सुधारणेसाठी नाही, तर ते जीवनाच्या प्रत्येक अंगात सुधारणेसाठी वापरले जाऊ शकते. कायझेन ही सतत सर्वोत्तमाचा शोध घेणारी एक जीवनशैलीच आहे.

प्रत्येक उद्योजकाने कायझेनसह अन्य जपानी कार्यपद्धतींचा सखोल अभ्यास करून त्यांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?