उद्योजक उद्योग घडवतो त्याचसोबत उद्योगामुळे उद्योजक घडतो. उद्योगासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या तीन गोष्टी म्हणजे उद्योगपूरक अर्थव्यवस्था, योग्य संधी आणि गरज याविषयी आपण आधीच्या तीन भागात विस्तृत विवेचन केलेले आहेच. आज आपण उद्योग याविषयी बोलणार आहोत.
उद्योग म्हणजे काय? अर्थात उद्योगाची व्याख्या करणे हा या लेखमालेचा उद्देश नाही; पण उद्योग कसा उभा राहतो हे कळण्यासाठी त्याचं थोडाफार विश्लेषण गरजेचं आहे. उद्योग ही मुळात एक प्रवाही प्रक्रिया किंवा कार्यपद्धती आहे असे आपण म्हणू शकतो. कोणताही उद्योग या सोप्या व्याख्येमध्ये नक्कीच सामावला जाऊ शकतो.
वस्तू किंवा सेवेविषयी निर्माण झालेली चौकशी इथपासून ती सेवा पुरवून किंवा ती वस्तू वितरीत करून त्याचे पैसे घेणे ही सर्व एक व्यापक प्रक्रिया आहे. त्यात अनेक उपप्रक्रिया असतात.
प्रक्रिया दोन प्रकारात मोडतात – व्यापक आणि सूक्ष्म. हल्लीच्या मॅनेजमेंटच्या भाषेत यांनाच मॅक्रो आणि मायक्रो प्रोसेस असं संबोधल जात. उद्योग समजून घेताना ही पूर्ण प्रक्रिया समजून घेणं महत्त्वाच ठरतं आणि त्यात आपण कुठल्या गोष्टीची गरज भागवू शकतो; आपल्याकडे असं कोणतं कौशल्य किंवा ज्ञान आहे ज्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेचा मी भाग होऊ शकतो आणि त्यातून पैसे मिळवू शकतो, हे समजून घेतल्यास तो उद्योग उभा करणे शक्य होऊ शकते.
याचाच उपयोग करून तो उद्योग मोठा करणेसुद्धा शक्य होऊ शकते. आपण याचे उदाहरण पाहणारच आहोत. पण त्याआधी एक गोष्ट सहज तुमच्या लक्षात आणून देतो. अर्थव्यवस्था – संधी शोधणे – गरज पूर्ण करणे आणि उद्योग उभा करणे हीसुद्धा एक व्यापक प्रक्रिया आहे त्यात अनेक सूक्ष्म भाग असतात आणि याचाच अभ्यास करून उद्योग निर्माण करता येऊ शकतो.
लेखमालेच्या पहिल्या भागात मी पंढरपूरच्या वारीविषयी लिहिले होते. पुणे ते पंढरपूर प्रवास ही जर एक व्यापक प्रक्रिया आहे अर्थात ब्रॉड किंवा मॅक्रो प्रोसेस आहे असे मानले, तर मधल्या साधारण वीस ते बावीस दिवसांचा प्रवास हा सूक्ष्म म्हणजे मायक्रो प्रोसेस होऊ शकतो.
आज आपण एक वेगळे उदाहरण पाहू या, आपल्यासमोर घडलेले आणि सतत घडत असणारे. शहरं निर्माण झाली आणि मग शहरांच्या सीमा विस्तारत गेल्या. शहरांच्या सीमेबाहेर राहणाऱ्यांसाठी शहरात कामासाठी येणे ही नित्य गरजेची बाब होऊन बसली.
शहराबाहेरून शहरात कामासाठी येणे ही जर मॅक्रो प्रोसेस आहे असे गृहीत धरले, तर या संपूर्ण प्रक्रियेत त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची गरज भागवणे ही एक संधी होते. आपण त्याची साधारणपणे व्यापक यादी बनवण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे हा विषय निश्चितपणे आपल्यापर्यंत पोहोचेल.
शहराबाहेरून शहरामध्ये येण्यासाठी सामान्यांना परवडणारी वाहतूक व्यवस्था यासाठी सरकारी बसेस तर आहेतच, परंतु अनेक खाजगी वाहने अशा नियमित वर्दळ असलेल्या या मार्गांवर वाहतूक सेवा पुरवतात.
महत्त्वाच्या थांब्यांवर (आपल्या रोजच्या भाषेत नाक्यांवर) जिथे लोकांना वाहनांची वाट पाहावी लागते. अशा ठिकाणी चहा, नाश्ता, पानाची दुकाने क्वचितप्रसंगी पोळी भाजीचे डबे किंवा पार्सल देणारी केंद्रे, भाजी वाल्याची दुकाने असतात.
जर मोकळ्या जागा असतील तर बरेचसे बांधकाम व्यवसायिक अशा मध्य जागीच कार्यालयीन इमारती उभारतात आणि अनेक लहानमोठे उद्योग आपली कार्यालये अशा ठिकाणी स्थापन करतात. अशा अनेक कार्यालयांची उभारणी झाल्यास तिथे त्या उद्योगाचे केंद्र निर्माण होते (उदा. आय.टी. हब पुणे हिंजेवाडी).
त्या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्यांसाठी कार्यालयांच्या जवळ घरांची गरज निर्माण होते. घरांची गरज निर्माण झाल्यावर बांधकाम व्यावसायिक तिकडे वळताच, पण घराची गरज भागवणारे असंख्य छोटे-मोठे उद्योग सहाजिकच त्याच्या आजूबाजूला उभे राहू शकतात.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण नक्की कोणाची आणि कोणती गरज भागवू शकतो, याचा अभ्यास केला तर उद्योग उभारण्यापासून आणि उद्योजक होण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही.
आता आपण पाहिलेले उदाहरण हे खूप मोठ्या किंवा व्यापक स्वरूपातले आहे. आपला उद्योग मध्यभागी ठेवून आपण कोणाची आणि कोणती गरज कशी भागवू शकतो, याचा अभ्यास उद्योजकांनी केला तर त्याला यातून अनेक नवीन संधी दिसू शकतात. यात त्याला कदाचित नवीन व्यवसायिक विभाग (सेगमेंट) सुरू करता येऊ शकते.
उदाहरणार्थ : खानपान सेवा पुरवण्याचा (केटरिंग) व्यवसाय करणारी व्यक्ती अशा ठिकाणी दुपारच्या जेवणाचे डबे पुरवण्याचा व्यवसाय नक्कीच करू शकते. यातून त्याला कॅटरिंगच्यासुद्धा लहान-मोठ्या आणि नियमित ऑर्डर मिळू शकतात आणि व्यवसाय वाढायला मदत होऊ शकते.
अशी असंख्य उदाहरणे आपल्या बाजूला नित्यनेमाने घडत असतात, त्या संधी (गरजा) शोधून त्याचे उद्योगात रुपांतर करणे हे खऱ्या उद्योजकाचे आणि उद्योजकतेचे लक्षण आहे.
पहिल्या तीन भागात न सांगितलेलं काम मी या भागात उद्योजकांना करायला सांगणार आहे, ते म्हणजे थोडासा गृहपाठ. आपला उद्योग केंद्रस्थानी ठेवून आपण कोणकोणत्या नवीन ग्राहकांना, नवीन ठिकाणी आणि असलेल्या संसाधनांमधून (रिसोर्सेस) कोणत्या नवीन प्रकारच्या वस्तू किंवा सेवा पुरवू शकतो, याचा उद्योजकांनी किंवा नवउद्योजकांनी अभ्यास करावा आणि त्यातून संधी शोधण्याचा प्रयत्न करावा.
– सीए तेजस पाध्ये
संपर्क : ९८२०२००९६४
- भाग १ : उद्योजक आणि अर्थव्यवस्था
- भाग २ : गरजेतून निर्माण होते उद्योगसंधी
- भाग ३ : लोकांची गरज ओळखा, त्यातून उभा राहील तुमचा यशस्वी व्यवसाय
- भाग ४ : समाजात घडणाऱ्या व्यापक आणि सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास करून शोधू शकता उद्योगसंधी
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.