युगप्रवर्तक उद्योजक नारायण मूर्ती

अमंत्रम अक्षरोनास्ति, नास्तिमूलमनौषधीम ।
अयोग्य: पुरुष: नास्ति, योजको स्तत्र दुर्लभ:॥

या संस्कृत सुभाषिताचा शब्दश: अर्थ होतो, भाषेतील प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो, प्रत्येक वनस्पतीत औषधी गुणधर्म असतात, प्रत्येक माणसात कोणता तरी विशेष गुण असतोच. हे सगळे जरी खरे असले तरी मग जगात सर्वत्र इतका असंतोष, निराशा, असमाधान का दिसते? कोणीच आपल्या आयुष्याबाबत समाधानी दिसत नाही. प्रत्येक जण त्रासलेला, मेटाकुटीला आलेला दिसतो. असे का? याचे उत्तर या श्‍लोकातच शेवटच्या दोन शब्दांत दिलेले आहे. ते म्हणजे – योजको स्तत्र दुर्लभ:

‘तुझे आहे तुजपाशी’ या न्यायाने प्रत्येकाजवळ अफाट क्षमता आहे, पण आपापली संसाधने सुनियोजित रीतिने कामाला लावून (ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोर्सेस) स्वत:ची प्रगती साधणे अनेकांना जमत नाही. ते बाह्य परिस्थितीला दोष देत राहतात. अपयशाची कारणे बाहेर शोधतात व जन्मभर असमाधानीच राहतात.

मानवी समाजाच्या इतिहासाचे अध्ययन केले तर टप्प्याटप्प्यावर असे काही महापुरुष जन्माला आलेले दिसतात ज्यांनी त्यांच्या प्राप्‍त परिस्थितीत उपलब्ध साधनांच्या आधारेच आपल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधली व एका नव्या युगाचा प्रारंभ केला. भारताच्या औद्योगिक क्षेत्राचा विचार केला तर अलीकडच्या काळातील असेच एक औद्योगिक महापुरुष म्हणजे ‘इन्फोसिस’चे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती.

‘इन्फोसिस’ची प्रारंभीची टीम

नारायण मूर्ती आणि ‘इन्फोसिस’ या दोन्ही गोष्टींबद्दल आजवर बरेच काही लिहून-बोलून झाले आहे. त्याची पुनरुक्ती करण्यात काही अर्थ नाही. तो वेळेचा अपव्यय ठरेल. १९८० च्या दशकात सॉफ्टवेअर क्षेत्रातील नारायण मूर्ती व त्यांच्या सहा सहकार्‍यांनी पदरचे पैसे गुंतवून ‘इन्फोसिस’ची स्थापना केली. आज ती १० हजार कोटींची उलाढाल करणारी, परदेशी स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी झालेली पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

प्रश्‍न फक्त एखाद्या कंपनीने किती काळात किती आर्थिक प्रगती केली हा नाही. ‘इन्फोसिस’पेक्षा अधिक वेगाने प्रगती करणार्‍या कंपन्या कमी नाहीत. तरी भारतीय सॉफ्टवेअर क्षेत्र म्हटले की आधी ‘इन्फोसिस’ आठवते, कारण नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहकार्‍यांची दूरदृष्टी, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता, निरंतर प्रतिकूल परिस्थितीशी त्यांनी दिलेली झुंज, दाखवलेली चिकाटी.

नारायण मूर्तीच ‘इन्फोसिस’चा चेहरा आहेत. त्यामुळे नारायण मूर्तींबद्दल लिहायचे तर ‘इन्फोसिस’चा उल्‍लेख टाळणे शक्य नाही. ‘इन्फोसिस’ची आजवरची वाटचाल, तिने जपलेली सामाजिक बांधिलकी, कर्मचार्‍यांना देण्यात येणारा नफ्यातील हिस्सा यांच्याबद्दलही सुशिक्षित वाचकांना माहिती असतेच. तेव्हा ते सर्व पुन: पुन्हा गिरवून सांगण्यात काही अर्थ नाही.

तपशिलांचा हा सर्व बडिवार बाजूला सारला तर ‘इन्फोसिस’ आणि नारायण मूर्ती यांची काही कालातीत वैशिष्ट्ये आहेत. त्या वैशिष्ट्यांंमुळेच नारायण मूर्ती इतर उद्योजकांपेक्षा वेगळे ठरतात. त्यांना युगप्रवर्तक उद्योेजक म्हणावे लागते.

आपल्या माहितीनुसार, भारतात संगणक युग 1985 च्या नंतर सुरू झाले. 1990-95 नंतर त्याने वेग धरला. नारायण मूर्ती यांनी संगणकयुगाचे स्वप्न बघितले तेव्हा भारतात या युगाची चाहूलसुद्धा लागलेली नव्हती. आय.आय.टी. कानपूरमध्ये नारायण मूर्तींनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा कॉम्प्युटर बघितला.

एम.टेक झाल्यानंतर त्यांच्यापुढे अनेक नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी होती; पण त्या सर्व ऑफर्स नाकारून त्यांनी अहमदाबादच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये खूप कमी पगारावर रुजू झाले ते फक्त तिथे असलेल्या (तेव्हा भारतातील एकमेव अशा) कॉम्प्युटरवर काम करण्याची संधी साधण्यासाठी.

तिथे त्यांनी कॉम्युटर प्रणालीचा साद्यंत अभ्यास केला. इतका की सकाळी सात ते पहाटे तीन म्हणजे दिवसातले वीस तास मूर्ती कॉम्प्युटरवर काम करीत. कॉम्प्युटरच्या तेव्हाच्या बेसिक लँग्वेजेस, त्यातून कॉम्प्युटरला द्यायच्या सूचना म्हणजे प्रोग्रामिग आणि डिकोडिंग यांचा त्यांनी तिथे अभ्यास केला. खरे म्हणजे ‘इन्फोसिस’चा पाया तिथेच रचला गेला, असे म्हटले पाहिजे. यात त्यांची उपलब्ध संधीचा पुरेपूर लाभ उठवून सोने करण्याची वृत्तीही दिसून येते.

मूर्ती यांनी कमी पगार असूनसुद्धा ‘आयआयएम-अहमदाबाद’ का निवडले, याचे एकमेव कारण म्हणजे यापुढचे युग हे संगणकाचे युग असेल. हे डब्यासारखे दिसणारे यंत्र पुढील काळात माणसाचे जीवन आमूलाग्र बदलून टाकणार आहे, सर्व मानवी व्यवहारांत क्रांती घडवणार आहे, हे नारायण मूर्ती यांनी भारतात संगणकयुगाची सुरुवात होण्यापूर्वी पंधरा वर्षे अगोदर ओळखले होते.

1972 ते 74 या काळात मूर्ती यांनी पॅरिसच्या सेसा कंपनीत नोकरी केली व पॅरिस विमानतळावर होणार्‍या मालवाहतुकीचे नियोजन करणारी सॉफ्टवेअर यंत्रणा विकसित केली. त्यानंतर भारतात परत आल्यावर 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांनी त्याच सॉफ्टवेअर यंत्रणेचा भारतातील रस्ते, पाणी, वीज यांच्या नियोजनासाठी उपयोग करून घ्यावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला होता.

1975 ला भारतात कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर हे शब्दसुद्धा कोणी ऐकले नव्हते. म्हणजे नारायण मूर्ती काळाच्या किती पुढचा विचार करीत होते आणि नेहमी सामाजिक बांधिलकी कशी जपत होते याचा अंदाज येतो.

हे द्रष्टेपण हे नारायण मूर्ती यांचे खरे वेगळेपण आहे. काळानुसार पावले टाकणारे, वारा येईल तशी पाठ फिरवणारे उद्योजक आपण नेहमीच बघतो. इथे मूर्ती यांनी काळाचा पट भेदला. चर्मचक्षूंच्या पलीकडच्या भविष्याचा वेध घेतला. आपल्याला साथ देणारे सहकारी शोधले आणि नंतर ते स्वप्न वास्तवात उतरवून दाखवले. ही काळाच्या पलीकडे बघण्याची क्षमता हे मूर्तींचे खरे वेगळेपण आहे.

यानंतरचे नारायण मूर्ती यांचे जे वैशिट्य मनाला भावते ते म्हणजे आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून त्याचा प्रदीर्घ काळ पाठपुरावा करीत राहणे. इन्फोसिसची स्थापना मूर्ती व त्यांच्या सहकार्‍यांनी 1980 च्या दशकात केली तेव्हा त्यांची संभावना वेडे पीर म्हणूनच झाली. भारतीय कंपन्या युरोपियनांसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कारकुनी स्वरूपाची कामे करून देत; पण भारतीय तंत्रज्ञच सॉफ्टवेअर बनवू शकतात, असा विचार तेव्हा कुणाच्या मनालाही शिवला नव्हता.

मूर्तींचा भारतीय तंत्रज्ञांच्या क्षमतेवर विश्वास होता म्हणूनच त्यांनी परदेशात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे मार्केटिंग केले. हे सर्व ते तेव्हा करीत होते जेव्हा भारतात प्रशासकीय पातळीवर घनघोर अंधकार पसरलेला होता. ‘इन्फोसिस’ला पुण्याच्या पहिल्या कार्यालयात एक टेलिफोन लाइन मिळवण्यासाठी एक वर्ष आणि पहिला संगणक आयात करण्यासाठी तीन वर्षे थांबावे लागले होते. या गोष्टी आता सर्वांना महिती आहेत.

2 जुलै 1981 म्हणजे ‘इन्फोसिस’चा मूळ अवतार इन्फोसिस कन्सल्टंटस् प्रा.लि.ची स्थापना ते 1980 च्या दशकाची अखेर या संपूर्ण दहा वर्षांच्या प्रदीर्घ काळात मूर्ती आणि त्यांचे सारे सहकारी शब्दश: प्रवाहाच्या विरुद्ध पोहत होते. ते सर्व आयआयटीयन्स होते. सर्वांनी उत्तम पगाराच्या नोकर्‍या सोडून अनिश्चिततेच्या गर्तेत उडी मारली होती आणि पहिली अनेक वर्षे आशेचा अंधूकसा किरणही त्यांना दिसत नव्हता.

एवढा प्रदीर्घ काळ केवळ अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवून, लौकिक आयुष्य पणाला लावून एका वेड्या स्वप्नाचा पाठलाग करणे ही सामान्य गोष्ट नसते. नारायण मूर्ती यांनी ती केली.

आज ‘इन्फोसिस’चे जे स्वरूप आहे त्याच्या शतांशही तेव्हा नव्हते. एकदा वेळ अशीही आली की, त्यांचे सारे सहकारी निराश झाले होते. रोजच्या रोज नवनव्या अडचणींचा सामना करण्यापेक्षा हे नवे धाडस बंद करावे व पुन्हा आपापल्या शिक्षणाच्या जोरावर नोकर्‍या मिळवाव्यात, अशा निर्णयाप्रत सर्व सहकारी आले होते.

तेव्हा नारायण मूर्ती यांनीच ठामपणे सांगितले की, तुम्ही सर्व सोडून जात असाल तर मीच तुमचे शेअर्स विकत घेतो. त्यांचा दृढनिश्चय बघून सहकार्‍यांनी नमते घेतले. नंंतर ‘इन्फोसिस’ बंद करण्याचा विषय पुन्हा कधीही निघाला नाही.

काळाने मूर्तींचे म्हणणे खरे ठरवले. मूर्तींपुढे काळाने लोटांगण घातले आणि नंतर भारताचे अवकाश संगणक- युगाने व्यापून टाकले तेव्हा ‘इन्फोसिस’ हाच भारताच्या सॉफ्टवेेअर क्षेत्राचा चेहरा ठरली. सगळी समीकरणे बदलली. ‘इन्फोसिस’वाचून भारतीय सॉफ्टवेअर क्षेत्राचे पानही हलेनासे झाले.

‘इन्फोसिस’ आणि नारायण मूर्ती यांची अजूनही काही वैशिष्ट्ये त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतात. भारतीय कामगारांना बोनस म्हणजे तेराव्या महिन्याचा पगार मिळवण्यासाठी प्रदीर्घ लढा द्यावा लागलेला आहे. पगारवाढ वगैरे गोष्टींसाठी दरवर्षी शेकडो कंपन्या बंद पडताना आपण बघतो.

याच्या नेमके विरुद्ध आपले कर्मचारी कंपनी सोडून जाऊ नयेत म्हणून त्यांना नफ्यातला काही अंश देऊन त्यांच्यात कंपनीबद्दल आत्मीयता, मालकी हक्काची भावना जागृत करण्याचा प्रयोग करणारी ‘इन्फोसिस’ ही केवळ सॉफ्टवेअर क्षेत्रातीलच नव्हे तर एकूण औद्योगिक विश्वातील पहिली कंपनी आहे.

कोणत्याही कंपनीचा नफा कमावणे हे उद्दिष्ट असतेच; पण त्यातील काही भाग समाजाला परत देण्यासाठी चक्क कंपनीच्याच नावाचे ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ स्थापन करणारीही ‘इन्फोसिस’ ही पहिली भारतीय कंपनी आहे. नारायण मूर्तींवर असलेला डाव्या विचारसरणीचा प्रभाव, दलित-शोषित वर्गाबद्दल त्यांना वाटणारी कणव आणि सुधा व नारायण मूर्ती या दाम्पत्याची सामाजिक जाणीव यामागे आहे.

‘इन्फोसिस फाऊंडेशन’तर्फे केली जाणारी सामाजिक कामे हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.रस्त्यावरील कचरा वेचणारे, वेश्या, अनाथ, मनोरुग्ण, घरातून बाहेर काढले गेलेले निराधार वृद्ध अशा अनेक समाजघटकांसाठी ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ भरीव कार्य करीत आहे.

नारायण मूर्ती अजून एका कारणासाठी इतर उद्योेजकांपेक्षा वेगळे ठरतात. ते म्हणजे त्यांची व सुधा मूर्ती यांची साधी राहणी. पैसा हा उच्चभ्रू प्रतीच्या, छानछोकीच्या राहणीमानासाठीच कमवायचा असतो, श्रीमंतीचे प्रदर्शन करायचे असते, अशा समजुती आपल्या अंतर्मनात रुजलेल्या आहेत. अशा आपल्या संस्कृतीत नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची अतिशय साधी राहणी ही एक आश्चर्यजनक गोष्ट आहे.

अतिशय साधी राहणी

भारतातील सर्वोत्तम आयटी कंपनीचे सीईओ असलेले नारायण मूर्ती बंगलोरच्या शांत जयनगर भागात एका साध्या फ्लॅटमध्ये राहतात. कंपनीच्या बसमधून आपल्या कार्यालयात जातात किंवा आपली गाडी स्वत: ड्राइव्ह करतात. सुधा मूर्तींच्या अंगावर सोन्याचे कोणतेही दागिने नसतात.

या गोष्टी या दाम्पत्याबद्दलची आदरभावना अजूनच वाढवतात. त्यांच्याकडे बघून उलट आपण किती ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ प्रवृत्तीचे आहोत, असे वाटायला लागते. भरपूर पैसे कमवावेत आणि गरजेपुरते आपल्यासाठी ठेवून उरलेले सर्व समाजातील वंचित घटकांसाठी दान करावेत, ही नारायण मूर्ती यांची खरी शिकवण आहे.

मूर्ती त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांसाठी चहा घेऊन येणार्‍या शिपायाची ओळख, हा माझा सहकारी, म्हणून करून देतात. महात्मा गांधींच्या धनवान लोक हे समाजाचे आर्थिक विश्वस्त आहेत, या तत्त्वाचे नारायण मूर्ती प्रत्यक्ष आचरण करतात. आपली संस्कृती पैसा व अधिकारापेक्षा ज्ञान, वय, साधना यांना मान देणारी आहे.

ऋषी विश्वामित्र आल्यावर राजा दशरथ उभा राहात असे, अशी आमच्या संस्कृताची शिकवण सांगते. आजच्या अहंकारी युगात या गोष्टी पचनी पडणे कठीण झाले आहे. त्या शोधायच्या असतील तर सुधा व नारायण मूर्ती या दाम्पत्याकडे उदाहरण म्हणून बघावे. भारतीय संस्कृतीतील जे जे काही मंगलमय, अनुकरणीय आहे त्याचे नारायण व सुधा मूर्ती हे चालतेबोलते मूर्तिमंत स्वरूप आहे. या युगप्रवर्तक उद्योेजकाचे तेच सर्वोत्तम वैशिष्ट्य आहे.

– प्रशांत असलेकर
9322049083, 9689114854

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?