अपयश साजरे करा!


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपण अनेकदा यशाच्या अगदी जवळ पोहोचलेलो असतो व आपल्यापैकी बरेच जण थकून, हरून इथे स्पर्धा सोडून देतात आणि अपयशाशी संगत करतात. नेमका हाच (अव)गुण आपल्याला आयुष्यात जिंकण्यापासून लांब ठेवत असतो.

मात्र जे इथून पुढेही प्रयत्न सुरू ठेवतात, कष्ट करत राहतात, प्रयत्नात सातत्य ठेवतात, आशा सोडत नाहीत, तेच पुढे विजेते होतात. ही चिकाटीच त्यांना विजयी करत असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बर्‍याचदा हा फरक फक्त दहा ते पंधरा टक्क्यांचाच असतो.

अनेकदा, त्यामानाने कमी शिकलेली, कमी बुद्ध्यांक असलेली माणसे मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली, श्रीमंत झालेली आपण पाहतो. तर चांगली डिग्र्यांची भेंडोळे असलेली, एम.बी.ए. झालेली, पीएच.डी. केलेली माणसे, अशा माणसांसाठी कामे करत असतात.

कधी विचार केला आहे का? असे का?

मुळात आपले संस्कार, आपल्या मान्यता, आपली मानसिकता घडवत असतात. आपल्या लहानपणापासून आपल्याला अपयशाबद्दलच जास्त शिकवले जाते. परिणामत: आपले जास्त लक्ष हे अपयशावरच असते. अनेकदा आपण यशातही अपयश शोधत असते व अपयशी होत राहतो.

तुम्हाला तुमचे अपयश कधी साजरे करायला शिकवले आहे का? कदाचित नाही. कारण मुळातच अपयश म्हणजे गुन्हा, अपयश म्हणजे वाईट, काही तरी न स्वीकारण्यासारखे, असेच चित्र आपल्या मनात आपल्या संस्कारांमुळे, मान्यतांमुळे तयार झालेले आहे.

अपयश म्हणजे सगळे संपले असे नाही, मग ते शैक्षणिक असो किंवा व्यावसायिक असो, त्याहीपुढे बरेच काही आहे.

अनेक अपयशी माणसांना, त्यांच्या पुढील आयुष्यात उत्तुंग यश मिळालेले आपण पाहिले, वाचले, ऐकले आहे. अनेकदा आपण अपयशापासून दूर पळण्याच्या नादात, नकळत त्याच्या अधिकच जवळ जातो. मला वाटते आपण अपयशाशी मैत्री करायला हवी व त्यालाच तुम्ही तुमचा वाटाड्या बनवायला हवं. अपयश आपल्याला प्रत्येक वेळी काही न काही शिकवत असतं.

इच्छित यशासाठी लागणार्‍या गोष्टी शिकल्या व अमलात आणल्या की झाले. यश तुमच्या खिशात. गफलत आहे ती या दोघात. प्रत्येकाची यशाची व्याख्या ही वेगळी असते; परंतु अपयशाची सारखीच असते. असे का?

यश मिळवण्यासाठी लागणार्‍या गोष्टीं तुमच्याकडे नसल्यामुळे, आलेल्या अपयशाला अनुभव समजून त्यातून काही शिकायचे, काही बोध घ्यायचा व हा प्रवास मोठ्या आनंदाने, मोठ्या आश्वासकतेने, मोठ्या आत्मविश्वासाने पुढे सुरू ठेवायचा, की अपयश-अपयश करत रडत बसायचे, हे ठरवायचा अधिकार तुम्हालाच.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक नवीन धडा घेऊन, परिस्थिती तुमची वाट बघत असते. नवीन अपयश, नवीन अनुभव; परंतु लक्षात ठेवा, अपयश हे घेता येत नाही, अनुभव मात्र घेता येतो. तर अनुभव घेत चला, समृद्ध व्हा, यशस्वी व्हा.

तुम्हाला ज्वलंत इच्छा आहे का ?

मित्रांनो, सामान्यतः इच्छा या दोन प्रकारच्या असतात. एक, इच्छा व दुसरी म्हणजे ज्वलंत इच्छा दुसर्‍या प्रकारात इच्छा ही अधिक तीव्र स्वरूपाची असते. पहिल्या प्रकारात माणूस हा नदीच्या काठावर बसून मासेमारी करण्याचा प्रयत्न करतो. यात ती पूर्ण झाली तरी ठीक, नाही झाली तरी ठीक.

त्याला फारसा फरक पडत नाही, कारण ती केवळ इच्छा आहे. अशा बर्‍याच इच्छा त्याच्याकडे असतात. या फक्त साध्या इच्छा. मात्र दुसर्‍या प्रकारात, हा माणूस मासेमारीसाठी प्रत्यक्ष नदीच्या पात्रात उतरतो, त्या अनुभवात उतरतो. यात जोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्याला जगणे केवळ अशक्यच वाटत राहते.

तो आतून रोज तीळ-तीळ तुटत असतो. या काळात त्याला नीट झोपसुद्धा लागत नाही. जसे प्राणवायूशिवाय जगणे केवळ अशक्य, तसेच काहीसे या ज्वलंत इच्छेच्या बाबतीत होते. ज्वलंत इच्छा ही नेहमी पूर्ण होते व जर ती पूर्ण झाली नाही तर ती ज्वलंत इच्छा असूच शकत नाही. याचा अर्थ, तिला अजून धार लावायची गरज आहे. तिने तुम्हाला छळलं पाहिजे. यातच तिच्या पूर्णत्वाचं रहस्य आहे.

जगात अशी अनेक उदाहरणे आहेत की, जी फक्त आणि फक्त ज्वलंत इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण झालेली आहेत; तेही चमत्कारिकरीत्या, आश्चर्याच्या परिसीमा ओलांडून. अगदी माणसे वेड्यासारखी या इच्छेने झपाटलेली मी पाहिली आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून यशस्वी झालेली जगातली सगळी माणसे यात मोडतात.

एक सत्य घटना तुम्हाला सांगतो.

जेसिका कॉक्स नावाची तरुणी. जिला लहानपणापासूनच दोन्ही हात नाहीत. काय करत असेल ही? ही कपाळाला हात लावून रडत बसली नाही. तर दोन हात असलेल्यांनाही जमणार नाही, अशा बर्‍याच गोष्टी ती करते. ती एक मोटिव्हेशनल स्पीकर आहे. ती कीबोर्डच्या साहाय्याने टायपिंग करते, ती कार चालवते. ती तायक्‍वान्डोची दोन ब्लॅक बेल्ट धारक आहे. एवढेच नाही तर, ही तरुणी चक्क विमान चालवते. ती अमेरिकेची परवानाधारक वैमानिक आहे.

आयुष्यात अद्भुत, अचंबित करणार्‍या गोष्टी या कोणाच्या तरी ज्वलंत इच्छेमधूनच घडलेल्या, निर्माण झालेल्या असतात. त्या सामान्य माणसाला नेहमीच असामान्य वाटत राहतात. या सगळ्यांच्या मागे असलेले रहस्य म्हणजेच ‘ज्वलंत इच्छाशक्ती’ No Compromising.

तुमचा रिमोट कंट्रोल कोणाकडे?

मित्रांनो, तुमच्या आयुष्याच्या रिमोट कंट्रोल दुसर्‍याच्या हातात असतो, हे मी म्हटले तर कदाचित तुम्हाला ते पटणार नाही; परंतु ९८ टक्के लोकांच्या बाबतीत हेच खरं आहे. तपासा. कदाचित तुम्ही
तर नाहीत ना, त्या ९८ टक्के लोकांमध्ये. त्याची काही लक्षणे अशी असतात :

कदाचित, तुम्ही म्हणत असाल माझ्या बाबतीत असे बर्‍याचदा होते. तेव्हा मला तुम्हाला प्रश्‍न विचारावासा वाटतो की, तुम्ही केव्हा आनंदी राहायचे, के व्हा दु:खी व्हायचे, केव्हा काम करायचे, केव्हा टाइमपास करायचा, हे कोण ठरवणार? दुसरा कोणी की तुम्ही? तुमचे तुम्हीच ठरवलं पाहिजे, की तुम्ही केव्हा काय करायचे. केव्हा, किती, कोणता व कोणासाठी वेळ द्यायचा.

त्याहीपुढे जाऊन मी असे म्हणेन की, तुमच्या आयुष्याचा रिमोट तुमच्या हातात असायला हवा. तुम्हीच तुमचे मालक व्हावे. तुमच्या आयुष्याचा रिमोट इतरांना कंट्रोल करू देऊ नका. तुमच्या आयुष्यावर इतरांना मालकी गाजवू देऊ नका. स्वतःच्या आयुष्याच्या रिमोटचा ताबा घेतल्यावर बघा, तुमचे आयुष्यरूपी ओहळाचे पाणी कसे मार्ग काढते, ध्येयरूपी सागरापर्यंत पोहोचते ते. अशाने तुमची दशा व दिशा निश्‍चितच बदलेल, यात शंका नाही.

तेव्हा आजच, या क्षणापासून स्वतःचे मालक व्हा. तुमचा वेळ तुम्ही कसा वापरायचा, हे तुम्हीच ठरवा. तो अधिकार इतरांना देऊ नका. आपण या गोष्टींना एवढे सरावलो आहोत की, आपल्याला दुसरे कोणी नियंत्रित करतेय, याची शंकासुद्धा मनाला शिवत नाही. तुम्ही तुमची सूत्रे जाणीवपूर्वक स्वतःच्या हातात घ्या.

तुम्हीच तुमच्या जहाजाचे कॅप्टन व्हा!

माझ्या आयुष्यरूपी जहाजाचा कॅप्टन मीच, असे म्हणायला शिका. स्वतःची जबाबदारी स्वीकारायला शिका, म्हणजे तुमच्या कर्तृत्वाला एक वेगळी झळाळी प्राप्त होईल. तुमच्या आयुष्यरूपी जहाजाला कुठे नकारात्मक विचारांची, निराशेची छिद्रे पडू नयेत, याची काळजी घेत राहा. हीच छोटी-छोटी छिद्रे, पुढे तुमच्या जहाजाला बुडवायला कारणीभूत ठरतात. या अशा छिद्रांपासून लांब राहा.

लोक काय म्हणतील?

हा विचार करत जगणारा मोठा वर्ग आपल्याकडे आहे. मला काय वाटते? याचा फारसा विचार न करता, लोकांच्या नजरेत जास्तीत जास्त चांगले बनून कसे राहता येईल याचा विचार करत, हे आलेला दिवस ढकलत असतात. त्यामुळे हे लोक जरी वरकरणी आनंदी, समाधानी, यशस्वी दिसत असले, तरी कुठे तरी स्वतःच्या मनाविरुद्ध बरेच निर्णय त्यांनी घेतलेले असतात व उसना आनंद, समाधान चेहर्‍यावर घेऊन ते फिरताना दिसतात.

हे स्वतःच्या इच्छा दाबून टाकत असतात. त्यामुळे बर्‍याचदा हे आपले विचार पुढच्या पिढीवर लादण्याचा प्रयत्न करतात. हा जन्म पुन्हा मिळेल की नाही, मला माहीत नाही व मिळालाच तर, तेव्हाही आपण, आपले आयुष्य जगूच, असेही नाही. त्यापेक्षा आज, आत्ताचे, हे अनमोल आयुष्य आपण आपल्या शर्तीवर जगण्याचे धाडस का करू नये? आपण या क्षणाला पूर्ण का जगू नये?

तुमच्या आयुष्यरूपी जहाजाचे उद्धारकर्ते तुम्हीच व्हा.

तुमच्या आयुष्याची दिशा व दशा ही तुम्ही घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते. तुमचे निर्णय तुम्हीच घ्यायला शिका. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. असे म्हटले जाते की, तुम्ही एखादा निर्णय घेतला आणि त्यात अपयश आले, तर ते खरे अपयश नसून, दुसर्‍याने घेतलेल्या निर्णयात यशस्वी होणे व हे असेच नेहमी करत राहणे, हेच खरे अपयश.

हे असले निर्णय तुम्हाला परावलंबी बनवत असतात. तर न डगमगता निर्णय घ्यायला शिका. एक वेळेस तो चुकला तरी चालेल; पण घ्या. तो चुकलेला निर्णय तुम्हाला अनुभव प्राप्त करून देईल. तर बरोबर निर्णय यशाचा शिरपेच. तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास यातून प्राप्त होईल, तो तुम्हाला तुमच्या आयुष्यरूपी जहाजाचा कुशल कॅप्टन बनायला मदत करेल व महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला आवडायला लागाल.

तुम्ही स्वतःलाच जिंकायला लागाल. स्वतःला जिंकणारी माणसेच, इतराना लवकर जिंकतात. काही मोठे निर्णय घेताना, त्या क्षेत्रांशी संबंधित ४-५ योग्य माणसाचे मार्गदर्शन नक्कीच घ्या, यामुळे तुमच्या निर्णयाला बळकटी प्राप्त होते. मी माझ्या ट्रेनिंग प्रोफेशनमध्ये अनेक लोकांना भेटतो व मला खरेच आश्चर्य वाटते की, वयाच्या ३०-४० वर्षांनतंरही त्यांना स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत.

निर्णय न घेता येणे, ही एक सामान्य बाब आहे; परंतु जाणूनबुजून निर्णय घ्यायला टाळाटाळ करणे, आपले निर्णय घेण्याची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलणे, ही एक प्रवृत्ती आहे. पुढे हा न्यूनगंड होतो. मला असे वाटते की, एखादा निर्णय टाळण्यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे निर्णय घेण्याचे टाळल्यामुळे जबाबदारीतून मुक्तता होते व दुसरे म्हणजे निर्णय चुकलाच तर अपयशाचे खापर आपल्यावर फुटायला नको.

तुमचे निर्णय चुकले तरी चालतील, परंतु ते घ्या.

भले छोटे- छोटे निर्णय घ्या. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला शिका. तुमच्या आयुष्यरूपी जहाजाचे कॅप्टन तुम्हीच बना. एका चांगल्या कॅप्टनसाठी लागणार्‍या अनेक गुणांपैकी निर्णयक्षमता हा एक महत्त्वाचा गुण आहे. स्वतःच्या आयुष्यरूपी जहाजाचे कॅप्टन बनू इच्छित असाल तर निर्णय घ्यायला लागाच.

कॉलेजमध्ये असताना मी एका कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या कोर्सला होतो. तेथील शिक्षकांनी शेवटच्या assignment ला आम्हा सर्वांना एक प्रेझेन्टेशन दाखवले, त्यातल्या एका स्लाइडवर अनेक नामांकित व्यक्तींचे फोटो होते. त्यात रतन टाटा, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, धीरूभाई अंबानी, बाबा आमटे, गांधीजी, ए.पी.जे. अब्दुल कलाम अशा यशस्वी व नामांकित व्यक्ती होत्या. त्यात नेमकी एक चौकट रिकामी होती.

त्या शिक्षकाने आम्हाला विचारले, या रिकाम्या चौकटीत कोणाचा फोटो असावा, असे तुम्हाला वाटते? सर्व जण शांत, तसा हा अनपेक्षित प्रश्‍न होता. सर्व जण विचार करू लागले, की इथे कोणत्या यशस्वी व्यक्तीचा फोटो यायला हवा होता. आम्ही दिलेल्या काही उत्तरांनी समाधानी न झालेल्या, त्याशिक्षकानेच शेवटी उत्तर दिले.

ते म्हणाले, तुम्हा प्रत्येकाला वाटले पाहिजे की, माझा फोटो इथे यायला हवा आणि मी अचंबित झालो, कारण आपण असा कधी विचारच केला नव्हता. स्वतःला कधी असा प्रश्‍नच विचारला नव्हता, की काय मलाही त्या पंगतीत बसता येईल? त्या क्षणी, ते उत्त्तर मलाही सुचले नव्हते.

पुढे अनेक दिवस मला वाटत राहिले, की किमान मला तरी या अनपेक्षित प्रश्नाचे उत्तर यायला हवे होते. मुळात, आपली मानसिकता ही चांगल्या, उच्च, उत्कृष्ट गोष्टी दुसरीकडे शोधण्याची असते. याचाच अर्थ, माझाच या गोष्टीवर विश्वास नाही, की मी एक उत्कृष्ट, यशस्वी व्यक्ती होऊ शकतो.

मुळात त्या पठडीतला विचार करायची सवयच आपल्याला कधी नसते. तशी आपली विचारसरणीच घडवली गेलेली नसल्यामुळे असेल कदाचित. यशस्वी व्हायला फार पापड लाटावे लागतात. त्यासाठी फार त्याग करावा लागतो. काही तरी असे करावे लागते, की जे आपल्या सोसण्यापलीकडचे आहे.

आपण सामान्य माणसे हे करूच शकत नाही, असा विपरीत गैरसमज आपल्या संस्कारातून नकळत आपल्या मनावर झालेला असतो. म्हणून आपण त्या उंचीवर जाऊन विचार करत नाही. जे लोक त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाले, तेसुद्धा एक वेळेस तुमच्या-आमच्यासारखेच सामान्य होते. कधी त्यांची चरित्रे वाचा, म्हणजे तुमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडेल.

माझ्यात एक अव्यक्त यशस्वी व्यक्ती आहे.

मीच या यशाला सर्वार्थाने योग्य आहे. स्वतःच्या क्षमतेविषयी शंका घेऊ नका. तसे करणे, म्हणजे मला निर्माण करणार्‍या, त्या परमेश्वरावर शंका घेण्यासारखे आहे, असे मला वाटते व जर त्या परमेश्वराच्या निर्मितीवर शंका घ्यावी लागली, तर मग तो नक्कीच परमेश्वर होऊ शकत नाही. जो चुकतो तो परमेश्वर असूच शकत नाही. म्हणजेच त्या ईश्वराने आपल्याला सर्व काही भरभरून दिले आहे, आपल्याला फक्त त्याचा उपयोग करायचा आहे आणि यशस्वी व्हायचे आहे.

एक गोष्ट मात्र खरी, जगातल्या एका जरी माणसाने एखादी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट केली, तर तुम्हीही ती करू शकता. ती करणे शक्य आहे. फक्त त्याची किंमत मोजावी लागते. त्याने ती मोजलेली असते एवढेच. तुमची तयारी असेल तर तुम्हीही ते प्राप्त करू शकता, यात शंका नाही.

मी माझ्या एका कार्यक्रमात उपस्थितांना प्रश्‍न विचारला की, इथे बसलेल्या लोकांपैकी तुम्हाला वाटणार्‍या एका लिडरकडे बोट दाखवा. तिथे, त्या क्षणी उपस्थित असलेल्या शंभर लोकांपैकी प्रत्येक जण हा दुसर्‍यातला लिडर शोधत होता. मला तिथे एकही माणूस स्वतःकडे बोट दाखवून, हा पाहा लिडर म्हणणारा भेटला नाही.

सांगण्याचे तात्पर्य एवढेच, की आपण हे मानायला तयारच नाही, की मी एक चांगला लिडर आहे. मी एक यशस्वी होण्यासाठी लागणारी गुणसंपन्न व्यक्ती आहे. अशा प्रकारची विचारसरणी रुजवण्याचे काम आपल्याकडे फारसे होत नाही. मुळात अशा संस्काराचा वारसा आपल्याला जतन करता आला पाहिजे. तसे संस्कारच आपल्या मुलांना लहानपणापासून देता आले पाहिजे.

आपण आपल्यातली खरी क्षमता ओळखतच नाही. ती वेळीच ओळखा. तेव्हा आत्ताच यावर काम करायला लागा. जगातली ८० टक्के माणसे, त्यांना परमेश्वराने दिलेल्या उत्साह, शक्ती, बुद्धी, आकलनता, कल्पकता, क्षमता यांचा २० टक्क्यांपेक्षाही कमी वापर करतात.

तेव्हा निसर्गाने तुम्हाला दिलेल्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करा. त्यासाठी स्वत:ला आजच तयार करा. या चांगल्या कामासाठी आजच्यापेक्षा जास्त चांगला दिवस कदाचित नसेल. स्वतःवर यशस्वितेबाबत शंका घेणे, म्हणजे परमेश्वरावर शंका घेणे होय.

– विश्वास वाडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?