एके काळी मराठी माणसाबद्दल बरेच गैरसमज होते. मराठी माणूस धंदा-व्यवसायात कमी पडतो. मराठी माणसाला धंदा जमत नाही. तसेच मराठी माणसांची वृत्ती एकमेकांचे पाय खेचण्याची असते. एकाची प्रगती दुसर्याला बघवत नाही. दोन मराठी भागीदार एकत्र येऊन व्यवसाय नीट करू शकत नाहीत.
गेल्या १०-१२ वर्षांत तरुण मराठी मुले आपली परंपरागत नोकरी करण्याची मानसिकता सोडून हिरिरीने धंदा-व्यवसायांत उतरू लागले आहेत. नोकरी करायची नाही, व्यवसायच करायचा, या निश्चयाने हल्ली अनेक मराठी तरुण व्यवसाय करू लागले आहेत. इतकेच नव्हे तर क्षुद्र, संकुचित मनोवृत्ती सोडून व्यवसायात एकमेकांना मदत करताना दिसतात.
भागीदारी किंवा पार्टनरशिपमध्ये आता मराठी तरुण गुण्यागोविंदाने काम करताना दिसतात. एकमेकांचे पाय खेचण्याऐवजी परस्पर सहकार्याने प्रगतिपथावर वाटचाल करताना दिसताहेत. मराठी माणसाच्या या बदलत्या मनोवृत्तीचे एक उदाहरण म्हणजे पुण्याच्या ‘लॉजिका इंजिनीअरिंग अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.’ या कंपनीची व ‘लॉजिका ग्रुप’ची गेल्या काही वर्षांतील वाटचाल.
निखिल हिरे आणि योगराज जाधव या दोन समविचारी मराठी तरुणांनी काही वर्षांपूर्वीच ‘लॉजिका ग्रुप’ची स्थापना केली आणि अल्पावधीतच त्यांनी उत्तम प्रगती नोंदवलेली आहे. सध्या ‘लॉजिका ग्रुप’ हा इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, इंजिनीअरिंग क्लासेस आणि एनजीआर पॅनेल्स मॅन्युफॅक्चरिंग या तीन क्षेत्रांत काम करतो आहे.
या ग्रुपच्या दोन संचालकांपैकी एक आहेत निखिल अशोक हिरे. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात हिरे कुटुंब फार प्रसिद्ध आहे. नाशिक परिसरात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत हिरे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. निखिल हिरे यांनी डी. वाय. पाटील कॉलेजातून इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये डिग्री घेतलेली आहे.
कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये जॉब उपलब्ध असतानाही त्यांनी प्रत्यक्ष कामाचा जास्त अनुभव मिळावा म्हणून जाणीवपूर्वक छोट्या कंपनीची निवड केली. ते आधी मित्सुबिशी व नंतर कॉन्टिनेन्टल कंपनीत कामाला लागले.
दोन्हीकडे त्यांनी चांगली प्रगती केली. ते प्रोजेक्ट एक्झिक्युुटिव्ह झाले. यापैकी ‘मित्सुबिसी’ कंपनीत त्यांची ओळख योगराज जाधव यांच्याशी झाली. योगराज जाधव हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जातदेवले या गावचे असून त्यांनी औरंगाबादच्या जेएनईसी कॉलेजातून इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी.ई. केलेले आहे.
दोघेही व्यावसायिक वृत्तीचे असल्याने त्यांची मैत्री जुळली. ‘मित्सुबिशी’ व ‘कॉन्टिनेन्टल’ या दोन्ही कंपन्या इंडस्ट्रिअल ऑटोमेशनची कामे करून द्यायच्या.
ऑटोमेशन म्हणजे जे काम पूर्वी मॅन्युअली म्हणजे मानवी हातांनी केले जात असे ते मशीन्सद्वारे व स्वयंचलित पद्धतीने करून देणे. ऑटोमेशनमुळे माणसांवरील अवलंबित्व कमी होते. मानवी चुकांना जागा राहत नाही. उत्पादन वाढते. रिजेक्शन किंवा खराब माल निघण्याचे प्रमाण कमी होते.
कामगारांवर देखरेख करावी लागत नाही. प्रोसेसचे टप्पे निश्चित करता येतात. चूक झाली तरी ती कोणत्या टप्प्यावर झाली हे शोधून काढता येते. तिची जबाबदारी निश्चित करता येते. सुधारणाही करता येतात. यामुळे हल्ली सगळीकडे प्रॉडक्शन प्रोसेसचे ऑटोमेशन केले जात आहे.
निखिल हिरे ‘कॉन्टिनेन्टल’मध्ये ऑटोमेशन्सचेच प्रोजेक्ट हॅण्डल करायचे. त्यांच्या मनात विचार आला की, हेच काम आपण स्वत:चा व्यवसाय म्हणून का करू नये? आपण ऑटोमेशनचा स्वत:चाच व्यवसाय का करू नये?
निखिल हिरे यांच्यावर त्यांचे एक चुलत बंधू संजय हिरे यांचा मोठा प्रभाव आहे. ते संजय हिरे यांना आपला आदर्श, रोल मॉडेल मानतात. संजय हिरे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. ते ‘वेंकटेश्वरा हॅचरीज’साठी पशुखाद्य बनवतात. त्यांची खूप मोठी फॅक्टरी आहे. संजय हिरे यांना ट्रेड एक्झिबिशन्स अटेंड करण्याची खूप आवड आहे.
त्यांच्याबरोबरच निखिल हिरेही सर्व तर्हेची ट्रेड एक्झिबिशन्स अटेंड करतात. उद्योग प्रदर्शने बघितली की आपल्या जाणिवा विस्तृत होतात. आऊटलुक्स वाइड होतात. आपल्याला नवी टेक्नॉलॉजी समजते. आपण कुठे आहोत हे समजते, पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असे ते मानतात.
निखिल हिरे यांच्या मनात व्यवसाय करण्याचा विचार प्रबळ झाला. त्यांनी आपले जुने सहकारी योगराज जाधव यांच्याशी त्याबाबत चर्चा केली. त्यांच्याही मनात तसेच विचार होते. दोघांनी मिळून २०१४ ला ‘लॉजिका ऑटोमेशन अॅण्ड कंट्रोल सिस्टीम्स’ची स्थापना केली. सुरुवातीला भांडवल कमी असल्यामुळे दोघांनी सर्व्हिस इंडस्ट्रीवर भर दिला.
दोघे नोकरी सांभाळून खासगीरीत्या कंपन्यांच्या मशीन्सचे ऑटोमेशन करून देत. अशा तर्हेने त्यांनी दोन वर्षे काम केले. नोटाबंदीच्या काळात त्यांना मोठा फटका बसला. आठ महिने त्यांना मिळणारी कामे बंद झाली. तेव्हा एकाच व्यवसायावर अवलंबून राहून चालणार नाही, याची त्यांना जाणीव झाली. हिरे कुटुंब हे शिक्षण क्षेत्रात नावाजलेले आहे.
तेव्हा पूरक व्यवसाय शिक्षणाशी संबंधित करायचा असे त्यांनी ठरवले. इंजिनीअरिंगचे विद्यार्थी कॉलेजात पाठ्यपुस्तकीय शिक्षण घेतात; पण प्रत्यक्षात फिल्डवर काम कसे चालते यांची त्यांना माहिती नसते. तेव्हा इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी लॉजिका इंडस्ट्रिअल ट्रेनिंग अॅकॅडमीची सुरुवात केली. यातही त्यांना सुरुवातीला मर्यादित प्रतिसाद मिळाला.
केवळ तीनच विद्यार्थी आले; पण त्यांनाच उत्तम प्रशिक्षण दिल्याने व नंतर चांगल्या ठिकाणी कामाला लावल्याने पुढे त्यांच्या क्लासचे चांगले नाव होत गेले. आता पुणे व औरंगाबाद येथे लॉजिका इंडस्ट्रिअल ट्रेनिंग अॅकॅडमीच्या शाखा आहेत.
त्यांचे एक टेंडर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड नसल्याने हातचे गेले. म्हणून त्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून कंपनी प्रायव्हेट लिमिटेड करून घेतली. ती म्हणजेच आजची ‘लॉजिका इंजिनीअरिंग अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि’. होय.
कालांतराने या दोन्ही पार्टनर्सनी आपापली नोकरी सोडून दिली व ते पूर्णवेळ व्यवसायात उतरले. पुढे काही कारणांमुळे योगराज जाधव यांना औरंगाबादला जावे लागले. लॉजिकाची एक शाखा तिथेही आहे. ते तिथून कंपनीचा कारभार बघतात.
या दोघाही पार्टनर्सना मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात उतरायचे होते. त्यासाठी ते ज्यामध्ये स्पर्धा कमी असेल असे एखादे ऑफबीट प्रॉडक्ट शोधत होते. खूप प्रयत्नांनंतर त्यांना तसे प्रॉडक्ट सापडले ते म्हणजे एनजीआर किंवा न्यूट्रल ग्राऊंडिंग रजिस्टार पॅनेल्स. जिथे जिथे ट्रान्सफॉर्मर असतो तिथे हे पॅनेल लागतेच.
कुठल्याही ट्रान्सफॉर्मरमध्ये आर, वाय आणि बी असे तीन फेज असतात. या तीन फेजमधून सतत वीजप्रवाह वाहत असतो. मात्र तो नेहमी कमीजास्त होत असतो. ज्या फेजमध्ये वीजप्रवाह जास्त होतो तिथून तो न्यूट्रलला वाहून नेला जातो व त्याचे ग्राऊंडिंग होते म्हणजे तो जमिनीत सोडला जातो.
जर ग्राऊंडिंग नीट केले नसेल तर पुढे जोडलेली उपकरणे म्हणजे मशीन्स, टीव्ही, फ्रिज वगैरे जळून जाऊ शकतात. ट्रान्सफॉर्मरमधील कुठल्याही एका फेजवर जास्त सप्लाय आला तर तो कमी करण्याचे काम एनजीआर पॅनेल्स करतात.
निखिल हिरे यांनी अशा तर्हेचे पॅनेल्स एका उद्योग प्रदर्शनात बघितले; पण ते चायनीज बनावटीचे होते. निखिल हिरे व योगराज जाधव यांनी वेगवेगळ्या प्रकारे इनोव्हेशन्स, संशोधन करून एनजीआर पॅनेल्सचे स्वदेशी प्रारूप तयार केले. नंतर कन्सल्टंटकडून मार्केट सर्व्हे करून घेतला व अशा प्रकारच्या प्रॉडक्टला कितपत मागणी येईल, भविष्य कसे राहील याचा अहवाल बनवून घेतला.
त्यानंतरच ते या पॅनेल्सचे मॅन्युफॅक्चरिंग करू लागले. पूर्वी भारतात सुरक्षेविषयी फारशी जाणीव नसल्याने अशा तर्हेची पॅनेल्स फारशी कोणी वापरत नसे. औद्योगिक सुरक्षेकडे फारसे लक्ष दिले जात नसे. अलीकडच्या सरकारच्या काळात औद्योगिक सुरक्षेसंबंधी नियम कडक बनले. सुरक्षेसंबंधी जाणीव वाढली. त्यामुळे अशा प्रकारच्या पॅनेल्सची मागणी वाढली.
आता ‘लॉजिका इंजिनीअरिंग’ ११ विविध प्रकारचे एनजीआर पॅनेल्स बनवतात. ते ‘रिलायन्स’, ‘बीपीसीएल’, ‘अदानी ग्रुप’, ‘एचपीसीएल’, ‘आयओसीएल’, ‘महाजनको’, ‘एमएससीबी’, ‘महाट्रान्सको’ आदी वीज कंपन्यांना हे एनजीआर पॅनेल्स पुरवतात.
तसेच ते जर्मन ग्रुपच्या कंपन्या ‘कॉन्टिनेटल’, ‘बॉश्च’, ‘महिंद्रा’, ‘बजाज’, ‘एन्डुरन्स’, ‘वनास’ यांना ऑटोमेशन्स करून देतात. ते क्लायंटसच्या गरजांनुसार स्पेशल पर्पज मशीन्स बनवून देतात तसेच मशीन व्हॅलिडेशन व कॅलिबरेशनही करून देतात. यूएसएफडीएसाठी ते ऑडिएटेड ऑडिटर आहेत.
या एनजीआर पॅनेल्सवर त्यांचे अधिक संशोधन चालू आहे. किती ज्यादा व्होल्टेजचे ग्राऊंडिंग केले गेले याचा रिपोर्ट आता मिळू शकतो. तसेच त्याच्याही पुढे जाऊन हे जादाचे व्होल्टेज इतर कामांसाठी वापरता येईल असे तंत्र त्यांनी डेव्हलप केले आहे. त्यामुळे त्यांच्या पॅनेल्सला उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद मिळत आहे. सध्या या पॅनेल्सचे ऑस्ट्रेलिया व यूएईमध्ये एक्सपोर्ट करण्यासंबंधी बोलणी चालू आहेत.
निखिल हिरे यांच्या वाटचालीत त्यांचे आई-वडील आणि चुलत बंधू संजय हिरे तसेच त्यांचे एक मित्र रोहित शिंदे यांचा मोठा मोलाचा वाटा आहे. रोहित शिंदे हे एक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत. तसेच त्यांचे अजून एक मित्र अमोल कारखिले.
संकटाच्या, अडचणीच्या प्रसंगी अमोल कारखिले त्यांचे मनोधैर्य वाढवतात. त्यांचे ऋण निखिल हिरे व्यक्त करतात. निखिल हिरे यांच्या पत्नी शीतल या बी.ई. कॉम्प्युटर आहेत. त्या लॉजिका ट्रेनिंग अॅकॅडमीचे पुण्यातील काम बघतात.
निखिल हिरे यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील निमगाव हे आहे. तिथून जवळच एक आश्रमशाळा आहे. निखिल हिरे व त्यांच्या शाळकरी मित्रांचा एक ग्रुप आहे. ते सर्व वर्षातून अनेक वेळा या आश्रमशाळेतील मुलांना फराळ, शालेय साहित्य यांचे वाटप करतात. गेली तीन वर्षे हा उपक्रम चालू आहे.
मराठी तरुणांना निखिल हिरे सल्ला देतात की, १० ते ५ नोकरी करायची व स्वत:ला सेटल्ड समजायचे, ही संकुचित मनोवृत्ती सोडून द्या. १० ते ५ च्या मेन्टॅलिटीतून बाहेर पडा. मराठी तरुणांनी व्यवसायातच उतरले पाहिजे. धाडस दाखवा. व्यवसायात उतरा. प्रचंड कष्ट करा म्हणजे मग यश तुमचेच आहे. लॉजिका ग्रुपची आजवरची वाटचाल ही हेच सिद्ध करते.
संपर्क – निखिल हिरे – ९५६१८३७८५३,
योगराज जाधव – ९०४९३१२१००
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.