कसा सुरू कराल स्वतःचा प्रिंटींग व्यवसाय?

सध्या उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही मनासारखी नोकरीची संधी उपलब्ध होईलच असे सांगता येत नाही. त्यामुळे चांगला शॉर्ट टर्म कोर्स केल्यास निश्चितच नोकरीच्या तसेच व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. फक्त गरज आहे ती योग्य अभ्यासक्रम निवडण्याची.

युवकांनी व्यवसाय किंवा नोकरीमूल्य असलेल्या अभ्यासक्रमालाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. स्वत:मधील कौशल्ये आणि अभ्यासक्रमाचे नोकरीमूल्ये ओळखूनच अभ्यासक्रमाची निवड केल्यास निश्चितच नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यापैकीच एक क्षेत्र म्हणजे प्रिंटींग टेक्नॉलॉजी.

दुसर्‍या महायुद्धानंतर औद्योगिक क्रांतीचे पर्व सुरू झाले. त्यामध्ये इंजिनीयरिंग, मेडिकल, दूरसंचार व कम्युनिकेशन या पायाभूत सुविधा निर्माण करणार्‍या इंडस्ट्रीजची वाढ झपाट्याने झाली व त्याबरोबर प्रिंटींग टेक्नॉलॉजी या उद्योगामध्येही आमूलाग्र बदल होत गेले व छपाईचे क्षेत्र विस्तारले.

शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करण्याची स्पर्धा सुरू झाली व त्यातून शैक्षणिक सामग्रीची गरज निर्माण झाली. या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी छपाईमधील मोठी यंत्रे व तंत्रे विकसित होत गेली. तंत्रज्ञान व दर्जा राखण्यासाठी संगणकाची मदत फार मोठ्या प्रमाणावर घेतली जाऊ लागली अशा तर्‍हेने मुद्रण हा एक आघाडीचा उद्योग म्हणून ओळखला जाऊ लागला.

त्याचबरोबर हे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी प्रशिक्षित करिअर करणार्‍या तरुण-तरुणींची गरज फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. कागदावर शाईने यांत्रिक पद्धतीने छपाई करण्याच्या ठिकाणाला छापखाना तसेच प्रिंटींग टेक्नॉलॉजी, छपाई अथवा मुद्रण उद्योग असेही म्हणतात. सुरुवातील छपाई ही कला म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असे.

हळूहळू कलेवर तंत्रज्ञानाची भर पडून त्याचे टेक्निक व टेक्नॉलॉजीमध्ये परिवर्तन झाले व आज संगणकीय प्रणाली वापरून प्रिंटींग प्रेस हा एक आघाडीचा उद्योग गणला जाऊ लागला आहे. गेल्या तीस वर्षांत प्रिंटिंग प्रेसच्या तंत्रात झालेला बदल हा इतर कोणत्याही व्यवसायातील बदलांच्या तुलनेत अधिक आणि जलद आहेत. ट्रेडर या प्रिंटरपासून ते ब्लॉकमेकिंग करावे लागणार्‍या लेटरप्रेस आणि त्यानंतर प्लेटपासून ते सीटीपी असा झालेला ऑफसेट प्रवास हा अलीकडील आहे.

पूर्वी हाताने खिळे जुळवून फॉर्म बनवण्यात येत असे. हा फॉर्म पाट्यावर बसवून मग त्यावर शाई लाऊन छपाई होत असे. नाशिक जिल्हा मुद्रक संघाने ‘नाशिक इन्स्टिट्युट ऑफ प्रिंटींग स्टडीज’ या संस्थेची स्थापना केली आहे. प्रिंटींग क्षेत्राशी निगडीत विविध शॉर्ट टर्म अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने डीटीपी ऑपरेटर व डिझाईन, यामध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज, पेजमेकर आणि कोरल ड्रॉ या सॉफ्टवेअरचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

यामध्ये ले-आऊट आणि पेज मेकिंग, ले-आऊट आणि डिझाईनिंग, इम्पोझिशन स्किम आणि पेज सेटिंग, टाईपोग्राफी, एडीटींग आणि डमी प्रीपरेशन अशा सर्व प्रक्रियांबद्दलचे ज्ञान दिले जाते. यासाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक असून याचा कालावधी सहा महिन्यांचा आहे.

ऑफसेट प्लेटमेकर – या अभ्यासक्रमात प्लेटमेकिंगबद्दल ज्ञान दिले जाते.

ऑफसेट मशिन ऑपरेटर – यामध्ये ऑफसेट प्रिंटींग मशिनचे भाग, त्याबद्दलची सविस्तर माहिती, फिडरचे प्रकार आणि फिड बोर्ड, इंक युनिटचे प्रकार आणि त्यांची रचना, डम्पिंग युनिट, डिलीव्हरी युनिट या माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

बुक बाईंडर-बुक बाईंडिंगच्या अभ्यासक्रमात कागदाचे प्रकार आणि आकार ओळखणे, बाईंडिंगसाठी लागणार्‍या उपकरणांची माहिती, पेपर कटिंगचे प्रकार, फोल्डिंग आणि फोल्डिंगच्या पद्धती यांचा समावेश आहे.

तंत्रनिकेतनमध्ये प्रिंटींग टेक्नॉलॉजीमधील तीन वर्षांची पदविका व त्यानंतर मुद्रण उद्योगातील पदवी (B.E. Printing) प्रिंटींग इंजिनीअरिंग हा चार वर्षांचा कोर्स बारावीनंतर ‘महाराष्ट्र मुद्रण परिषद’ संचालित ‘इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटींग टेक्नॉलॉजी व रिसर्च’ पनवेल, नवी मुंबई,

‘गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटींग टेक्नॉलॉजी’ मुंबई, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटींग टेक्नॉलॉजी’ पुणे, ‘कॉलेज ऑफ प्रिंटींग इंजिनीअरिंग अ‍ॅड ग्राफिक कम्युनिकेशन’ पुणे, ‘धीरूभाई इन्स्टिट्यूट’ ठाणे, ‘गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक’ बीड, ‘एस.आय.ई.एस. कॉलेज’, नवी मुंबई, ‘जीआयपीटी’ नागपूर येथे उपलब्ध आहे.

मुद्रण क्षेत्राचा विस्तार हा व्यावसायिक मुद्रण क्षेत्र, वर्तमानपत्रांचे मुद्रण, फ्लेक्स प्रिंटींग, पॅकेजिंग, स्कीन प्रिंटींग, टी शर्ट, मग प्रिंटींग, मॅट, स्पॉट, थर्मल लॅमिनेशनमध्ये होतो. सध्या छपाईमधील रोजगाराच्या अनेक टप्प्यांवरील संधी निर्माण झाल्या आहेत.

मुद्रण क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ग्राफिक डिझायनर, प्रोग्रॅमर, उत्पादन व्यवस्थापक, व्यापार व्यवस्थापक, दर्जा नियंत्रक, विपणन व्यवस्थापक, संशोधक, प्रोडक्शन मॅनेजर, आदी पदावर नोकरी मिळू शकते तसेच स्वत:चा व्यवसायदेखील सुरू करता येतो.

– मधुकर घायदार
9623237135
(लेखक हे शासकीय आश्रमशाळा कनाशी, जिल्हा नाशिक येथे व्यवसाय प्रशिक्षक आहेत.)

Author

  • मधुकर घायदार

    मधुकर घायदार यांचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनीअरिंग झाले असून ते राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शिक्षक आहेत. 'शिक्षक ध्येय' या साप्ताहिकाचे ते संपादकही आहेत.

    संपर्क : 9623237135 ई-मेल : madhukar.ghaydar@gmail.com

    View all posts

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?