Advertisement
कथा उद्योजकांच्या

तंत्रज्ञानातील बदलांना सामोरे जाण्यास सज्ज राहा : संजय ढवळीकर

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


“बँका, इन्शुरन्स आणि इतर अनेक सरकारी सुविधांच्या बाबतीत गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले. आपण सगळेच त्याचे साक्षीदार आहोत. आता बँका, विमा कंपनी वा सरकारी सुविधांच्या कार्यालयात प्रत्यक्ष ग्राहकाने जाण्याची गरज उरलेली नाही.

नेटबँकिंग आणि पेमेंट गेटवेच्या माध्यमातून आपण बँका व इतर अनेक सरकारी सुविधांची देयके भरू शकतो. रेल्वेचे आरक्षण, चित्रपटांची तिकिटेही आपण घरबसल्या मिळवू शकतो. बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता सर्वच सेवा क्षेत्रांचा चेहरामोहरा बदलत आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

आपण सगळ्यांनीच या सर्व तंत्रज्ञानीय बदलाला सामोरे जाण्यासाठी सज्ज, तत्पर राहिले पाहिजे. विशेषत: उद्योजकांना तर या सर्व बदलांची माहिती घेणे, त्यानुसार आपल्या उद्योगाच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तो उद्योजक स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल.” हे विचार आहेत युनाइट्स बिझनेस सोल्यूशन्स प्रा. लि. या आधुनिकीकरण सेवा पुरवणार्‍या कंपनीचे संजय ढवळीकर यांचे.

त्यांच्या या उद‍्गारांमागे त्यांचा बँक व इन्शुरन्स क्षेत्रातील २७ वर्षांचा दीर्घ अनुभव आहे. बँकांतील व इन्शुरन्स क्षेत्रातील बॅकएण्ड प्रोसेसिंगचा अतिशय जवळून अनुभव घेतल्यानंतर संजय ढवळीकर चार वर्षांपूर्वीच बॅक एण्ड प्रोसेसिंगसाठी लागणार्‍या या सर्व सेवा पुरवणारी कंपनी काढून स्वतंत्र उद्योजक म्हणून या क्षेत्रात उतरले.

आज ते अनेक नामांकित खासगी व सहकारी बँका, इन्शुरन्स कंपन्या यांना सेवा पुरवताहेत. त्यांच्या या विचारांमागे एक व्यवस्थापक आणि उद्योजक म्हणून या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत घडलेले बदल आणि त्यांनी त्यासंबंधी नोंदवलेली निरीक्षणे आहेत.

संजय ढवळीकर यांचा जन्म २ ऑगस्ट १९६७ रोजी नेरळ, माथेरान येथे झाला. त्यांचे वडील पंडित हे मध्य रेल्वेत होते. नेरळ येथेच त्यांचे बालपण व शालेय शिक्षण झाले. कॉमर्स किंवा सांख्यिकी विषयाकडे त्यांचा लहानपणापासूनच ओढा होता. त्यानुसार उल्हासनगरच्या सीएचएम कॉलेजातून त्यांनी बी.कॉम.ची पदवी संपादन केली. काही काळ टिपिकल अकाऊंटंट म्हणून काम केल्यावर त्यांना त्यात रस उरला नाही.

बँक व इन्शुरन्स कंपन्यांचे जे प्रोसेस हॅण्डलिंग होते त्या क्षेत्रात आपण काही करावे असे त्यांना वाटू लागले. पुढे त्यांनी एकूण सत्तावीस वर्षे निरनिराळ्या आघाडीच्या बँकांमध्ये प्रोसेस हॅण्डलिंगसंबंधी विभागांत अतिशय उच्च आणि जबाबदारीच्या पदांवर नोकरी केली.

एखाद्या बँकेचे उदाहरण घेतले तर तिथे निरनिराळ्या कामांसाठी ग्राहक जात असतात. कधी त्यांना खाते उघडायचे असते, तर कधी कर्ज हवे असते. ते यासंबंधी अर्ज बँकेत करतात. बँकांमध्ये ही सर्व कामे करणारा स्टाफ असतो. रोजचे पैशांच्या देवाणघेवाणीसंबंधी कामांबरोबरच बँकांना या कामासाठी मनुष्यबळ, वेळ पुरवावे लागते.

अशाच रीतीने इन्शुरन्स कंपन्यांकडे नुकसानभरपाईचे क्लेम्स येत असतात. त्या विमा कंपन्यांना या क्लेम्सची शहानिशा करावी लागते. आपण बँकेत केलेला एक अर्ज निकाली काढण्यासाठी बँकेत एक खूप मोठी प्रक्रिया राबवली जाते. त्यालाच बॅकएण्ड प्रोसेसिंग असे म्हणतात.

गेल्या काही वर्षांत ही फुटकळ कामे बँका व इन्शुरन्स कंपन्यांमध्ये आपल्या कर्मचार्‍यांकरवी करण्याऐवजी ती कामे अन्य एजन्सीज्ना देण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्याला आऊटसोर्सिंग किंवा प्रोसेस हॅण्डलिंग असे म्हणतात. संजय ढवळीकर यांनी अनेक वर्षे आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक या बँकांमध्ये सीनिअर लेव्हलला बॅकएण्ड प्रोसेसिंगचे काम हाताळले.

सत्तावीस वर्षे नोकरी झाल्यावर त्यांना जाणवले की, या क्षेत्रात अजून खूप काही करता येण्यासारखे आहे. खासगी बँका जरी या सेवांसाठी आऊटसोर्सिंग करीत असल्या तरी सरकारी व सहकारी बँकांमध्ये अजून ती जाणीव पुरेशा प्रमाणात रुजलेली नाही. आधुनिक तंत्रज्ञानामुळे बँकिंग क्षेत्रात होणारे बदल छोट्या बँकांपर्यंत अजून पोहोचलेलेच नाहीत. त्या आघाडीवरही बर्‍याच प्रबोधनाची गरज आहे.

गरज आणि त्यात प्रगतीला बराच वावही आहे. तेव्हा काळाची पावले ओळखून संजय ढवळीकर यांनी ते एका परदेशी कंपनीच्या जॉइंट व्हेचरमध्ये सीनिअर व्हाइस प्रेसिडंट असताना नोकरीला रामराम ठोकला आणि २०१४ मध्ये ‘युनाइट्स बिझनेस सोल्यूशन्स’ची स्थापना करून ते व्यवसायात उतरले. आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून बँकिंग व इन्शुरन्स क्षेत्राला अत्याधुनिक तंत्रज्ञानीय बदलांची संजीवनी देण्याचे व्रत त्यांनी अंगीकारले.

त्यांना पहिला ब्रेक दिला तो ठाणे जनता सहकारी बँकेने. त्यापाठोपाठ पुण्याच्या जनसेवा बँकेने त्यांच्यावर विश्वास दर्शवला. त्यांना आपले काम दिले. आज त्यांच्याबरोबरच झोरोस्टोरियन बँक, यवतमाळ अर्बन, सुभद्रा बँक, कल्याण जनता सहकारी बँक अशा इतर अनेक बँकांना ते सेवा पुरवतात.

इन्शुरन्स क्षेत्रात ते एसबीआय जनरल इन्शुरन्स, अविवा लाइफ इन्शुरन्स यांनाही बॅकएण्ड सेवा पुरवतात. एम. पी. चितळे अ‍ॅण्ड कंपनी या एका मोठ्या चार्टर्ड अकाऊंटिंग फर्मला ते प्रोसेस हॅण्डलिंगमध्ये मदत करतात. या सर्व बँकांमध्ये विविध सरकारी योजना उदा. प्रधानमंत्री विमा योजना, जनधन योजनांचे दस्तावेजीकरण पूर्ण आहे की नाही हे बघण्याचे काम ते करतात. बँकांच्या कॉल सेंटर्सची व्यवस्था लावून देणे तसेच त्यांचा संपूर्ण आयटी सेटअप उभारून देण्याचे कामही ते करतात.

त्यांच्या कंपनीत सध्या ३५० कर्मचारी आहेत. त्यांच्यात टीम लीडर, सुपरवायझर, सिस्टम मॅनेजर अशा पातळ्या असतात. हा स्टाफ त्या त्या बँकेत वा इन्शुरन्स कंपनीत जाऊन तेथील कामकाज सांभाळतो. संजय ढवळीकर यांनी व्यवसायात उशिरा पदार्पण केले; परंतु अल्पावधीतच त्यांनी उत्तम यश संपादन केले आहे.

ते फक्‍त बँक व इन्शुरन्स कंपन्यांना या सेवा पुरवून थांबत नाहीत, तर एकूणच उद्योगजगतात नव्या तंत्रज्ञानाविषयी जाणीव वाढीला लागावी म्हणून प्रयत्नशील असतात. त्यांची कंपनी दरवर्षी स्वखर्चाने एक सेमिनार आयोजित करते. २०१६-१७ या वर्षी त्यांनी ‘स्व-तंत्रज्ञान परिषद’ या नावाने सेमिनार आयोजित केला होता. त्यात सहकारी पतपेढ्या आपल्या क्षेत्रात डिजिटलायझेशनचा वापर करू शकतील यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.

२०१७-१८ मध्ये त्यांनी ‘टेक अ बिग लीप’ या नावाने परिषद आयोजित केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यात बँका, इन्शुरन्स क्षेत्राच्या आणि छोट्या उद्योजकांच्या समस्या निवारण्याबाबत तसेच भांडवल उभारणी व मार्केटिंगबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अलीकडेच त्यांनी ‘बदलते बँकिंग नवभारतासाठी’ या नावाने परिसंवाद आयोजित केला होता. त्यात येत्या काही काळात बँकिंग कसे बदलत जाणार आहे, ते बदल पचवण्यासाठी बँकांनी कसे सज्ज राहिले पाहिजे याविषयी चर्चा व मार्गदर्शन केले गेले.

एनपीए किंवा बुडीत कर्जे ही बँकिंग क्षेत्राची एक फार मोठी समस्या आहे. संजय ढवळीकर या समस्येला आवर घालण्याबाबतही मार्गदर्शन करतात. तसेच अडचणीत आलेल्या उद्योजकांना ते संकटातून बाहेर येण्याचा मार्ग दाखवतात. अनेक डबघाईला आलेले उद्योग त्यांच्या सेवांचा लाभ घेतल्यामुळे तरले आहेत. पुढच्या काही वर्षांत आपल्या सेवांचे जाळे भारतभर पसरवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे.

संजय ढवळीकर हे हिंदू इकॉनॉमिक फोरमचे कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच विश्व हिंदू परिषदेच्या महाराष्ट्र व गोवा विभागाचे संपर्क प्रमुख आहेत. ‘साप्‍ताहिक विवेक’च्या ‘उद्योग विवेक’ या उपक्रमाचे व ‘फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’चे ते संयोजक आहेत.

सध्या सर्वत्र अनागोंदीचे वातावरण आहे. प्रसारमाध्यमे आणि काही अर्थतज्ज्ञ भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी आहे असे कंठरवाने ओरडून सांगत आहेत. काही उद्योगांना त्याची झळ पोहोचली आहे, तर इतर उद्योग नेहमीप्रमाणे चालले आहेत.

या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संजय ढवळीकर सांगतात की, “मंदीतही एक प्रकारची संधी लपलेली असते. मंदी ही माणसाच्या डोक्यात असते. तिचा विचार केला नाही तर तिचे फटके बसत नाहीत. मंदीतही आपण आपले काम व्यवस्थित करीत राहिले तर कालांतराने त्याचे नक्‍कीच चांगले परिणाम दिसतात.”

मराठी तरुणांना ते सल्‍ला देतात की, “आवर्जून व्यवसायातच उतरा. पहिली एक-दोन वर्षे यशापयशाचा विचार न करता झोकून देऊन काम करा. नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरा, बदल स्वीकारा. नाइलाजाने नव्हे तर स्वयंप्रेरणेने बदल स्वीकारा. स्वत:मध्ये काळानुसार बदल घडवून आणा.

ब्लॉक चेन, डेटा अ‍ॅनालिटिक्स, रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या नवनवीन तंत्रज्ञानाचा सराव करून घ्या. कुठल्याही व्यवसायात दोन वर्षे पाय रोवून खंबीर उभे राहिलात तर यश तुमचेच आहे.” संजय ढवळीकर यांची स्वत:चीच वाटचाल याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.

संजय ढवळीकर – 9833076333


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!