काही तरी नवीन करणार, हे ध्येय असेल तरच उद्योजक व्हा!

आज बहुतांश लोकांना असे वाटते की, एक मोठ्या पगाराची नोकरी असावी, कारण साधारण आठ तासांच्या नोकरीमध्ये एक फिक्स पगार मिळतो आणि रिस्कपण कमी असते, पण एक तात्त्विक विचार केला तर ज्या ठिकाणी आपण नोकरी करत असतो त्या व्यवसायाचा मालक स्वत:च्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने व्यवसाय चालवत असतो आणि आपण मात्र तिथे नोकरी करत असतो.

तुमच्याकडे जर जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर स्वतःचा व्यवसाय चालू करून एक अनोखे विश्व तुम्ही निर्माण करू शकता. पण एक लक्षात असू द्या, व्यवसाय करणे हे काम सोपे नाही, कारण त्यासाठी मनाची तयारी हवी, मेहनत करण्याची इच्छा हवी आणि सतत व्यवसायवाढीसाठी धडपड करण्याची तयारी हवी.

आज बरेचसे युवक सुशिक्षित आहेत, पण नोकरी मिळत नसल्याने घरी बसून आहेत. आज बरेचशे युवक आहेत त्यांना व्यवसाय चालू करण्याची तीव्र इच्छा आहे, पण कोणता व्यवसाय चालू करायचा किंवा व्यवसाय कसा चालू करायचा आणि व्यवसायासाठी पैसा कुठून उभा करायचा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे हे युवक घरीच बसून आहेत.

परिणामी आजची तरुण पिढी निराशेपोटी चुकीच्या मार्गाला जात आहे. नैराश्य आणि कमी झालेला आत्मविश्वास याच्यामुळे ही पिढी गुन्हेगारी आणि आत्महत्या अशा प्रवृत्तीकडे वळू लागली आहे.

आजचे बरेचसे पालक व्यवसायातील धोक्याचा आणि तोट्याचा विचार करून मुलांना मोठेपणी चांगले शिक्षण घेऊन एक मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी आग्रही असतात, पण तो आपला मुलगा किंवा मुलगी एक बिझनेसमन किंवा बिझनसवूमन होईल यासाठी अजिबात प्रयत्न नाही करत. पालक आपल्या अपूर्ण इच्छा, आकांक्षा मुलांवर लादतात आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरीकडे बोट दाखवतात.

आज समाजामध्ये नोकरीला खूप प्रतिष्ठा आहे, आमचा मुलगा अमुक ठिकाणी कामाला आहे, आमच्या मुलाला एवढा पगार आहे, असे बरेच पालक सांगत असतात, पण काही मोजकेच पालक असतात की, ते ज्या क्षेत्रामध्ये आपल्या पाल्याने शिक्षण प्राप्त केले आहे, त्या क्षेत्रात काही तरी नवीन करण्याच्या उद्देशाने मुलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देतात. फारच कमी असे पालक असतात की, जे अंबानी, टाटा, किर्लोस्कर, मित्तल, बजाज यांचे उदाहरण देऊन व्यवसायामध्ये मुलांचे मन घट्ट करतात.

मित्रहो, तुम्हाला व्यवसायामध्ये उतरायचे असेल तर मनाशी एक द‍ृढनिश्चय असावा, व्यवसाय करू की नोकरी करू अशी द्विधा मनःस्थिती असेल तर व्यवसाय न केलेला बरा, कारण आपण आपल्या निर्णयाशी ठाम नसाल तर व्यवसायामध्ये यश मिळणे खूप कठीण आहे. कदाचित व्यवसायामध्ये सुरुवातीला जर तुम्हाला अपयश आले तर नोकरी केली असती तर बरे झाले असते, अशी तुमची मानसिक स्थिती होईल.

मी काही तरी नवीन करणार हे ध्येय असेल आणि व्यवसायामध्ये येणार्‍या प्रत्येक अडचणींना सामोरे जाण्याची हिम्मत असेल तरच व्यवसाय करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे. ज्यांना कुणाच्या हाताखाली काम करण्याची इच्छा नसते; पण कष्ट करण्याची अपार इच्छाशक्ती असते त्यांनी व्यवसायामध्ये आपलं नशीब नक्की अजमावं.

आव्हान स्वीकारण्याची आणि संकटे पचवण्याची ज्यांच्यामध्ये ताकद असते ती माणसे उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःची नवी ओळख निर्माण करतात. अशी ओळख नोकरीमध्ये तुम्हाला कधीच मिळणार नाही. व्यवसायामध्ये जिद्धीने यशस्वी झालात तर अमर्याद पैसा तुमचाच असतो आणि एक प्रतिष्ठा मिळते ती बहुतेक तीस-चाळीस वर्षांच्या नोकरीमध्ये तुम्हाला कधीच मिळणार नाही.

ज्यांना घरची पार्श्वभूमी ही पिढीजात व्यवसाय करण्याची असते त्यांना मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे व्यवसायाचे धडे लहानपणापासूनच मिळत असतात. पण ज्यांच्या घरची पार्श्वभूमी ही पिढीजात व्यवसाय करण्याची नसते त्यांनी व्यवसायाचे योग्य ते प्रशिक्षण आणि नियोजन करूनच व्यवसायाला सुरुवात करावी.

व्यवसाय सुरू करण्याअगोदर मी व्यवसाय का करायचा, हा प्रश्न नक्की स्वतःला विचारा. त्याचबरोबर स्वतःची आर्थिक, बौद्धिक, मानसिक व शारीरिक तयारी आहे का याचीही एकदा उजळणी करावी.

सांगायचे झाले तर अपयश आल्याशिवाय यश काय आहे याची गोड चव कळत नाही. व्यवसाय म्हटला की नफा किंवा तोटा हा येतोच; पण थोड्याशा अपयशाने खचून न जाता आलेल्या संकटाला सामोरे जाण्याची तयारी असेल तर व्यवसायामध्ये मिळालेले यश हे तुमचेच असते. मी व्यवसायामध्ये यशस्वी होणारच हे ध्येय असेल तर निश्चितच तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही.

व्यवसाय सुरू करताना त्या व्यवसायाचे सखोल ज्ञान असणे खूप गरजेचे आहे. जर आपल्याला एखाद्या व्यवसायाची सखोल माहिती नसेल तर संपूर्ण माहिती गोळा करूनच योग्य नियोजन करावे. तसेच तुम्ही करत असणार्‍या व्यवसायाची तुम्हाला आवड पाहिजे. जर तुम्हाला आवडच नसेल तर कशातच रस राहणार नाही.

एक लक्षात ठेवा, व्यवसायामध्ये वेळेचे बंधन नसते. अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्हाला व्यवसायात मेहनत करावी लागू शकते. उदाहरणासाठी बघायला गेले तर मिठाईचे दुकान. हे दुकान सकाळी सात वाजता उघडते, पण मिठाई विकणारा दुकानदार सकाळी पाच वाजल्यापासून त्याच्या दुकानाच्या तयारीला लागतो आणि संध्याकाळी दहापर्यंत हे दुकान चालूच असते. म्हणजे हा दुकानदार फक्त सहा तास झोपतो आणि अठरा तास व्यवसायामध्ये ड्युटी करत असतो.

सांगायचे झाले तर व्यवसायामध्ये जेवढा वेळ द्याल तेवढा कमीच आहे. तुमच्या पंखांमध्ये जेवढे बळ असेल तेवढे उंच तुम्ही तुमचा बिझनेस नेऊ शकता.

व्यवसाय करायचा की नोकरी, हा निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागू द्या, पण संपूर्ण विचार करूनच योग्य तो व्यवसाय चालू करा; पण एकदा घेतलेल्या निर्णयाशी ठाम राहा आणि त्या निर्णयाशी तुम्ही ठाम राहिलात तर उद्योजक म्हणून तुमचे नाव प्रत्येकाच्या तोंडावर असेल. यश तुमचेच आहे.

– डॉ. संतोष कामेरकर
७३०३४४५४५४
(लेखक बिझनेस व लाइफ कोच आहेत)

Author

  • डॉ. संतोष कामेरकर

    डॉ. संतोष कामेरकर हे एक प्रतिथयश उद्योजक, प्रसिद्ध वक्ते व प्रशिक्षक आहेत. त्यांनी स्वतःला शून्यातून उभं करून आज करोडोंमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक नाउमेद तरुणांना प्रेरणा देणारा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?