स्टार्टअप यशस्वी करण्याची सप्तपदी

उद्योगरथाला लागते अश्वमेधाच्या भरधाव अश्वाची साथ…
आणि उद्योगात यशस्वी होण्यासाठी लागतात एक कल्पना आणि योग्य उद्योग सुरुवात!

दिवसामागून रात्र आणि रात्रीमागून दिवस येणे हा जरी नित्यक्रम असला तरीही वर्षातील ३६५ दिवस कोणालाही कधीही समान नसतात. प्रत्येक दिवशी, प्रत्येकाच्या मनात असंख्य आणि भन्नाट कल्पना झेप घेत असतात, हा विचार घेऊन जरी हिशोब केला, तरीही आपल्या जीवनात प्रत्येक वर्षी कमीत कमी ३६५ नवीन कल्पना येऊन जातात, याचा अर्थ आपण वार्षिक कमीत कमी ३६५ कल्पना मनात आणतो आणि व्यर्थ घालवतो.

जर बिझनेस करायचा, तर बिझनेस स्टार्टअपसाठी लागते अशीच एखादी आगळीवेगळी कल्पना व खंबीर सुरुवात. त्यात आजचे युग आहे संगणक (कॉम्प्युटर) आणि मोबाइलचे! निसर्गाने आणि टेक्नॉलॉजीने आज बिझनेस करणे अगदी सोपे केले आहे; परंतु आपण मात्र अडकतो योग्य कल्पनेचा विचार करून पहिले पाऊल उचलायला.

माझ्या महिला मैत्रिणींना तर मला विशेष एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे, ती म्हणजे, आपण महिला लहानपणापासून कौटुंबिक व्यवहार, घरखर्च, बचत या सर्व गोष्टी डोळसपणे बघत असतो, हाताळत असतो. तरीही उद्योगाचे पहिले पाऊल घेताना का कचरतो?

उलट आपल्या महिलांसाठी उद्योग हा घर आणि कुटुंबाहून वेगळा नाही. जर आपण उद्योगाला कुटुंब आणि घर समजले, तर आपल्या प्रगतीच्या वाटा कोणीही अडवू शकत नाही. कारण जी स्त्री उत्तमरीत्या घर चालवू शकते, ती कोणताही उद्योग सांभाळू शकते. म्हणून,

‘उचला एक पाऊल-उन्नतीचे, प्रगतीचे आणि उद्योगाचे!’

बिझिनेस स्टार्टअप म्हणजे नक्की काय?

बिझिनेस स्टार्टअप म्हणजे नेमके काय? असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात नेहमी सतावत असतो. त्याचे उत्तर अगदी सोप्पे आहे. कोणत्याही उद्योगाच्या सुरुवातीला बिझनेस स्टार्टअप म्हणतात. उद्योगाच्या सुरुवातीचे, बिझिनेस स्टार्टअपमध्ये दोन अर्थ आहेत.

एक आपण आपल्या उद्योगाची केलेली सुरुवात आणि दुसरा अर्थ म्हणजे आपण त्या उद्योगाच्या कल्पनेची केलेली सुरुवात आणि त्यातून सुरू केलेला उद्योग; परंतु दोन्ही प्रकारांत उद्योगाची सुरुवात ही महत्त्वाची आहे.

जसे लग्नामध्ये सात फेरे, सात वचन आणि सात पावले म्हणजे सप्तपदी असतात, त्याचप्रमाणे उद्योगातसुद्धा सप्तपदी म्हणजे सात महत्त्वाची पावले असतात. एक एक योग्य पाऊल योग्यरीत्या उचलत आपण आपला उद्योग योग्य मार्गाने सुरू करू शकतो आणि उत्तमरीत्या चालवू शकतो.

बिझिनेस स्टार्टअप सप्तपदी

➤ पहिले पाऊल; उद्योग कल्पनेचा योग्य विचार :

उद्योगाची कल्पना ही नेहमी आगळीवेगळी आणि इतरांहून नेहमी वेगळी असावी. जरा आपण मार्केटमध्ये जगाहून काही तरी वेगळे दिले, तर नक्कीच उद्योगवृद्धीसाठी लागणारा काळ आणि श्रम वाचू शकतात. त्याचप्रमाणे उद्योग आणि उद्योगाची कल्पना शक्यतो आपल्या छंद, आवडी, कुवत आणि कौशल्याशी निगडित असावी.

उद्योग कल्पना = (अद्वितीय+उदगामी+छंद+कुवत+कौशल्य) कल्पना

➤ दुसरे पाऊल; उद्योगाचे नियोजन :

प्रत्येक उद्योगाची सुरुवात करण्याआधी त्या उद्योगाची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. उद्योग म्हटला की यशसोबत अपयश आणि जिंकण्यासोबत हरणे आले. म्हणून उद्योगाचे योग्य नियोजन असले तर होणारा त्रास कमी होतो, किंबहुना होत नाही. उद्योग नियोजनासाठी खालील बाबींची आवश्यकता असते :

  • उद्योगाची गरज आणि त्याचे उद्देश
  • उद्योगाचा वास्तववादीपणा
  • उद्योगाचा विशिष्टपणा
  • उद्योगातील जबाबदारी
  • उद्योगाची समज
  • उद्योगासंबंधी विचारविनिमय
  • उद्योगासंबंधी बांधीलकी
  • उद्योगाचा पाठपुरावा आणि नियोजनाचे सातत्य

➤ तिसरे पाऊल; उद्योगातील स्रोत :

जर प्रती वर्ष आपण सरासरी काढली तर आपल्याला समजेल की, जेवढे उद्योग सुरू होतात त्याहून किती तरी उद्योग बंद होतात. याचे मुख्य कारण आहे उद्योग स्रोतांचा ढासळलेला समतोल. कोणत्याही उद्योगाची सुरुवात करताना आपल्याकडे असलेले स्रोत मूलभूत जाणून घ्यावेत आणि उद्योगाला संभाव्य लागणार्‍या स्रोतांची आणि त्यासाठी लागणार्‍या भांडवलाची कल्पना काढून घ्यावी. उद्योगातील स्रोत खालीलप्रमाणे :

  • मूलभूत स्रोत
  • आर्थिक स्रोत
  • मानवी स्रोत
  • शैक्षणिक स्रोत
  • भौतिक स्रोत
  • भावनिक स्रोत

➤ चौथे पाऊल; मार्केटिंग आणि ब्रँडिंग :

स्वत:च्या उद्योगाचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग केल्याशिवाय उद्योगाच्या यशाला पायरी मिळत नाही. उदा. हापूस कोकणांत सर्वत्र पिकतो, पण देवगड हापूसला सर्वात जास्त मागणी आहे, कारण देवगड हापूस हा एक ब्रँड झाला आहे.

आपण आपल्या उत्पादनाचा, उद्योगाचा एक आगळावेगळा ब्रँड निर्माण करू शकतो. एकदा ब्रँड सर्वत्र नावाजला, की उद्योगसुद्धा उंच झेप घेतो. ब्रँड निर्माण झाला, की मार्केटिंग करणे सोईस्कर होऊन जाते. म्हणून हे चौथे पाऊल अतिशय महत्त्वाचे आहे.

ब्रँडिंगसाठी खालील गोष्टी करतात :
  • लोगो किंवा चिन्ह/चित्र
  • ब्रँडिंग उत्पादनाचे वैशिष्ट्य/ गुणधर्माचे ब्रँडिंग
  • कंपनीच्या/उत्पादनाच्या नावाचे ब्रँडिंग
  • ब्रँड व्यक्तिमत्त्व: नामवंत व्यक्तीमार्फत आपल्या उत्पादनाचे ब्रँडिंग
  • कंपनीच्या / उत्पादनाच्या टॅगलाइनचे ब्रँडिंग

➤ पाचवे पाऊल; अर्थ व्यवस्थापन आणि नियोजन :

अर्थ व्यवस्थापन आणि नियोजन हा उद्योगाचा कणा आहे. जर अर्थ व्यवस्थापन आणि नियोजन बिघडले तर मोठ्यातील मोठा उद्योग बंद पडू शकतो. त्यामुळे अर्थ व्यवस्थापन आणि नियोजन याला सर्वात अधिक महत्त्व दिले आहे. अर्थ व्यवस्थापन आणि नियोजनमध्ये खाते लेखन (अकाऊंटिंग), हिशोब (बुक कापिंग) आणि कर आकारणी (टॅक्सेशन) या बाबींचा समावेश होतो. अर्थ व्यवस्थापन आणि नियोजनाची प्रक्रिया खालीलप्रमाणे :

पहिली पायरी : उद्योगाच्या आर्थिक स्थानाचे विश्लेषण
दुसरी पायरी : आर्थिक नियोजनाच्या विकासाची योजना आखणी
तिसरी पायरी : आर्थिक नियोजनाच्या विकासाच्या योजनेची अंमलबजावणी
चौथी पायरी : आर्थिक नियोजनाच्या विकासाच्या योजनेची देखरेख

➤ सहावे पाऊल; उद्योग देखभालीची यादी निर्मिती :

आपला उद्योग योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने सुरू आहे की नाही किंवा उद्योगात काही अडथळे किंवा संकटे येण्याच्या संभावना आहेत का? अशा सर्व गोष्टींची यादी करणे आवश्यक असते, कारण आपण आधीपासून जर तयार असू, तर मग कितीही अडथळे किंवा संकटे आली तरी आपण जोमाने त्याला सामोरे जाऊ शकतो, त्याप्रमाणे आपण आपल्या यशाच्या पायर्‍या ठरवू शकतो. उद्योग देखभालीची यादी निर्मितीसाठी लागणार्‍या बाबी :

डू लिस्ट : जे करायचे आहे त्या सर्व गोष्टींची यादी
रेकॉर्ड ट्रॅकिंग : पूर्वीच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींची नोंदणी

➤ सातवे पाऊल; उद्योगाची ध्येयनिर्मिती आणि लक्ष्य साधणे :

ज्या उद्देशांसाठी किंवा ज्या ध्येयांना साधण्यासाठी उद्योग निर्माण केला, त्याच्या पूर्ततेच्या दिशेचे हे पहिले पाऊल म्हणजे ध्येयनिर्मिती आणि लक्ष्य साधणे. उद्योगासाठी भविष्यात ध्येयनिर्मिती आणि लक्ष्य साधणे महत्त्वाचे असते, त्याशिवाय उद्योगाला गती मिळत नाही म्हणून प्रत्येक उद्योजक आणि उद्योजिकेने त्यांचे भविष्यातील ध्येय आणि लक्ष्य निर्मिती करून ठेवावी. उद्योगात भविष्यातील ध्येयनिर्मिती आणि लक्ष्य साधण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या :

  • ध्येय आणि लक्ष्य प्रत्येक विभागात विभागून द्यावेत.
  • प्रत्येक विभागाचा ध्येयपूर्तीचा अहवाल मागून घ्यावा आणि तपासावा.
  • उद्योगात सहभागी असणार्‍या प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधावा.

उद्योगात भविष्यातील ध्येयनिर्मिती :

पहिली पायरी : विशिष्ट ध्येय ठरवणे

दुसरी पायरी : ध्येय लिहून ठेवणे

तिसरी पायरी : ध्येयपूर्तीच्या गरजेचे विश्‍लेषण करणे

चौथी पायरी : ध्येयपूर्तीच्या उद्देशांची यादी करणे

पाचवी पायरी : ध्येयपूर्तीची कृती योजना निर्मिती करणे

सहावी पायरी : ध्येयाबाबत वचनबद्ध राहणे

सातवी पायरी : सर्वांशी ध्येयाबाबत बोलणे

आठवी पायरी : ध्येयपूर्तीसाठी योग्य मुदत देणे

नववी पायरी : ध्येयपूर्तीनंतर योग्य मोबदला देणे

दहावी पायरी : नवीन ध्येयनिर्मिती

‘बिझिनेस स्टार्टअप सप्तपदी’ ही एक उद्योजक आणि विशेषत: महिला उद्योजिकांसाठी उद्योग सुरू करण्याआधीची गुरुकिल्ली आहे. जे उद्योजक किंवा उद्योजिका ही सातही पावलांचे व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने अनुसरण करतात त्यांना त्यांच्या उद्योगात कमी संकटांना तोंड द्यावे लागते आणि हमखास यश मिळते.

बिझिनेस स्टार्टअप सप्तपदी Action प्लॅन :
  • उद्योगाचे वैयक्तिक मूल्यमापन
  • उद्योगाचे विश्लेषण
  • कायदेशीर स्थान
  • उद्योगाची नियोजन योजना
  • भांडवलनिर्मिती
  • उद्योगाची स्थापना
  • उद्योगाचे परीक्षण आणि त्रुटी

– डॉ. शिवांगी झरकर
9867815253

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?