‘उडान’, भारतातल्या छोट्या उद्योगांची मोठी स्वप्न पूर्ण करणारा प्लॅटफॉर्म

एखादी नावाजलेली कंपनी असेल किंवा एखाद्या संस्थेला प्रसिद्ध व्यक्तीचं वलय असेल किंवा त्या कंपनीच्या यशामध्ये आपल्याला थोडा कां होईना हिस्सा प्राप्त होण्याची शक्यता असेल, तर गुंतवणूकदार खूप उत्साहाने त्या कंपनीला पैशाचं पाठबळ द्यायला तयार होतात. पण एखादा छोटा व्यावसायिक असेल, तर त्याने पैशाची गरज कुठुन भागवायची? त्याची काही स्वप्नं असतील, ती कोण पूर्ण करणार?

आमोद मालवीय, या ‘फ्लिपकार्ट’मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदावर असलेल्या अभियंत्याने आपले सहकारी वैभव गुप्ता आणि सुजीत कुमार यांच्या सहयोगाने ‘उडान’ ह्या स्टार्टअपची स्थापना केली.

आमोद मालवीय हे ‘उडान’ या कंपनीचे संस्थापक आणि अभियंता आहेत. ते पाच वर्षांपेक्षा अधिक काळ ‘फ्लिपकार्ट’मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यांनी आयटेलिक्स साॅफ्टवेअर सोल्यूशन्स, रिया इंटरनेट आणि अपनापैसा या कंपन्यांमध्ये काम केले आहे.

ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूरचे माजी विद्यार्थी आहेत. जिथून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. पूर्ण केले. वैभव गुप्ता हे ‘उडान’चे आणखी एक संस्थापक आहेत, ज्यांची सप्टेंबर २०२१ मध्ये कंपनीचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली.

गुप्ता हेदेखील ‘फ्लिपकार्ट’मध्ये कार्यरत होते. त्यांनी आयआयटी दिल्लीमधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी व्हर्जिनिया विद्यापीठ, डार्टन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधून एमबीए केले.

सुजीत कुमार ‘उडान’चे सह-संस्थापक आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. केले आहे. सुजीत यांची “फ्लिपकार्ट’वर ऑपरेशन्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, जिथे त्यांनी ‘उडान’ची सहस्थापना करण्यापूर्वी तीन वर्षांहून अधिक काळ काम केले होते.

‘उडान’चे संस्थापक डावीकडून वैभव गुप्ता, आमोद मालवीय आणि सुजीत कुमार

सुरुवातीला ‘उडान’ हा इलेक्ट्रॉनिक्समधील लहान खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म होता. पहिल्या आठ ते दहा महिन्यांत त्यांनी इलेक्ट्रॉनिक्सवर लक्ष केंद्रित केले, त्यामुळे उडानला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली, जे एक स्टार्टअप कंपनी म्हणून खूप महत्त्वाचे होते.

पुरवठा व्यवसायात पाऊल ठेवण्यापूर्वी ‘उडान’ची प्राथमिक आवश्यकता होती डेटाबेस विकसित करणे. आता ‘उडान’ हा व्यापार्‍यांसाठी कर्ज देणारा प्लॅटफॉर्म म्हणून उदयास येत आहे.

‘उडान’ हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म “लहान व्यवसायांना तंत्रज्ञान, आर्थिक सर्वसमावेशकता आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट क्षमतांसह सशक्त बनवून त्यांना वाढत्या तंत्रज्ञान आणि डिजिटल जगात स्पर्धा करण्यासाठी एक विश्वासू भागीदार बनवणे” या उद्देशाने तयार केले आहे.

उडान’ त्याच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत व्यापाऱ्यांना अकाउंटिंग, ऑर्डर आणि पेमेंट मॅनेजमेंटमधील अडचणींवर मात करण्यासाठी मदत करते, तसंच किरकोळ विक्रेत्यांना वाजवी दरात खेळते भांडवल प्रदान करते.

उडानने ११ फंडिंग फेऱ्यांमध्ये एकूण १.५ अब्ज अमेरिकन डॉलर निधी उभारला आहे. कंपनीने अंतिम निधी फेरीमध्ये परिवर्तनीय नोट आणि कर्जाद्वारे २५० दशलक्ष अमेरिकन डॉलर उभे केले. सॉफ्टवेअर दिग्गज मायक्रोसॉफ्टदेखील या परिवर्तनीय-कर्जाच्या फंडिंग फेरीत सामील झाले आहे. तसंच एम ॲंड जी प्रुडेंशियल, कैसर परमानेंटे, नोमुरा, एरिना इन्व्हेस्टर्स, समेना कॅपिटल आणि इशाना कॅपिटलसारखे असंख्य इतर गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत.

‘उडान’ हे भारतातील सूक्ष्म व लघू व्यवसायांसाठी व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि घाऊक विक्रेते यांना मदत करण्यासाठी कार्यरत आहे. ‘उडान’ हा प्लॅटफॉर्म इलेक्ट्रॉनिक्स, होम आणि किचन, फळे आणि भाज्या, खेळणी यासारख्या विविध श्रेणींमधील उत्पादनांना प्रोत्साहन देते.

हा एक बी-टु-बी, म्हणजेच बिझनेस-टू-बिझनेस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. कंपनी आपल्या वापरकर्त्यांना तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा फायदा घेऊन त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत करते. २०१८ मध्ये सुमारे २२५ दशलक्ष अमेरिकन डॉलर उभारल्यावर युनिकॉर्नचा दर्जा प्राप्त करून देणारा अशा प्रकारचा हा सर्वात मोठा राष्ट्रीय वितरण प्लॅटफॉर्म म्हणून प्रसिद्ध आहे.

भारतात व्यवसाय सुलभ करण्याच्या उद्देशाने ‘उडान’ आपल्या वापरकर्त्यांना नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश प्रदान करते. शिवाय ते देशातील विक्रेते आणि खरेदीदारांसाठी आर्थिक उत्पादनेदेखील उपलब्ध करते. व्यापारी, उत्पादक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांना एकाच व्यासपीठाखाली आणणे हे कंपनीचे ध्येय आहे.

व्यापारी, शेतकरी, दुकानदार, मालक, रेस्टॉरंट, केमिस्ट आणि रस्त्यावरचे विक्रेते ‘उडान’शी जोडलेले आहेत. त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील निम्म्याहून अधिक ऑर्डर पूर्ण करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंटचे मोठे नेटवर्क आहे. ‘उडान’वर आता ५ लाखांहून अधिक उत्पादने उपलब्ध आहेत.

भारतातील सर्वात मोठा बिझनेस टु बिझनेस प्लॅटफॉर्म असल्याने ३० लाखांहून अधिक किरकोळ विक्रेते, २५ हजारहून अधिक विक्रेते त्यावर सध्या जोडलेले आहेत, जे नऊशेहून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहेत.

भारतातील सप्लाय चेन मॅनेजमेंटचा विस्तार करण्यासाठी नवीन भांडवल उभे करण्याचे, तसेच नवीन आणि विद्यमान अशा दोन्ही श्रेणींमध्ये बाजारपेठ वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. संस्थापकांचा असा विश्वास आहे की भारतातील लहान व्यवसायांसाठी हे व्यासपीठ म्हणजे एक वरदान ठरणार आहे.

– चंद्रशेखर मराठे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?