जाहिरात क्षेत्रात आज असलेले मोठं मोठे जे ब्रॅण्ड आहेत, त्यांच्या यादीत ‘मैत्र एंटरटेनमेंट’ला न्यायचे विनयचे स्वप्न आहे. माझा छंदच हाच माझा व्यवसाय आहे. मला फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करायला आवडते, त्यामुळे आजपर्यंत तरी व्यवसाय करताना मला कधीच कंटाळा आला नाही, असं म्हणणार्या विनयला पुढील पाच वर्षांत व्यवसायात कुठे पोहोचायचं आहे हे स्पष्ट आहे.
जेव्हा आपल्या विचारांशी आपण प्रामाणिक असतो, काय करायचं आहे, कसे करायचे आहे याचे चित्र स्पष्ट असते तेव्हा खर्या अर्थाने उद्योजक तयार होतो. याचे उदाहरण म्हणजे विनय शिंदे. मास कम्युनिकेशनमध्ये शिक्षण घेतलेले विनय मुंबईचे. ‘मैत्र एंटरटेनमेंट’ ही विनय यांची अॅडव्हर्टाजिंग कंपनी आहे. 2013 साली याची सुरुवात झाली.
शालेय जीवनापासून मालिका, जाहिरात यातून काम करत आल्यामुळे मनोरंजन क्षेत्राविषयी आवड होती. त्यातही जाहिरात क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करायचे स्वप्न विनय यांचे होते. नोकरी करायची नाही, स्वतःचा व्यवसाय करायचा हे पूर्वीपासून स्पष्ट होते. त्यामुळे मग व्यवसायात स्वतःला उभे करायची सुरुवात स्वतःच सुरू केली.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या विनयच्या घरी व्यावसायिक पार्श्वभूमी नव्हती. आर्थिक पाठबळ कधी मिळाले नाही; पण विरोध कधी झाला नाही. सुरुवातीच्या काळात आर्थिक भांडवल उभारणे आणि माणसं जोडणे यातून विनय यांच्या स्टार्टअपची सुरुवात झाली. पहिल्या एक-दोन प्रोजेक्टमधून आर्थिक फायदा जास्त असा काही झाला नाही; पण विनय म्हणतात, यातून मला अनुभव आणि माणसं जोडता आली.
माझ्याकडे साधनं नव्हती, आर्थिक गुंतवणूक नव्हती; पण प्रथम माणसे जोडली आणि यातूनच व्यवसाय उभा राहिला. पुढे एक एक साधन, इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत गेले. जर त्याकाळात ही माणसं भेटली नसती तर पुढचा प्रवास सुरू नसता झाला. आज ‘मैत्र एंटरटेनमेंट’ची वार्षिक उलाढाल येत्या काही महिन्यांत कोटीच्या घरात पोहोचतेय.
‘मैत्र’चे आज 750 स्वेअर फुटांचे ऑफिस आहे, सोबत वीस जणांची टीम आहे आणि संपूर्ण सेवा एकाच छताखाली दिली जाते. मैत्र एंटरटेनमेंट दोन प्रकारे काम करते प्रॉडक्शन आणि डिजिटल. व्यावसायिकांना त्यांचा ब्रॅण्ड स्थापित करण्यासाठी लागणार्या सार्या सेवा एकाच छताखाली मिळतात.
कन्टेन्ट रायटिंगपासून, लोगो डिझाइन, पॅकेजिंग, ब्रॅण्ड स्ट्रेटेजी, वेबसाइट, एसइओ, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग अशा सेवा दिल्या जातात. याशिवाय महाराष्ट्र शासनाची काही कामे विनयच्या एजन्सीने पूर्ण केलीत. मसाल्याचे दोन ब्रॅण्ड, बांधकाम क्षेत्रातील ब्रॅण्ड हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रातील ब्रॅण्ड, तयार करण्यासाठी सेवा दिली आहे.
उद्योगात अनेक चढउतार येतात. प्रसंगी झोपही उडते; पण अशा वेळी त्या परिस्थितीला सामोरे जाणे हाच यावर उपाय असतो. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात मलाही अशा प्रसंगातून जावे लागले. काही कारणाने काम पूर्ण झाले, पण पैसा मिळाला नाही. अशा वेळी मला पुढे देणी द्यायची होती; पण मी प्रत्येकाला वैयक्तिक भेटून परिस्थिती समजावून दिली.
त्यांनीही मला समजून घेतले. पुढे इतर कामांतून मी त्यांची देणी दिली. या काळात कुटुंबाने खूप सांभाळून घेतले. आपल्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असावी जिला आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असतील, जिच्याशी आपण मनमोकळेपणाने बोलू शकू. माझ्यासाठी माझी आई ती व्यक्ती आहे, असे विनय सांगतात. याशिवाय अनेक लोक या प्रवासात भेटत गेले आणि त्यांनी खूप मदत केली.
लॉकडाऊन काळात प्रॉडक्शनची कामं बंद होती; पण डिजिटल कामं वाढली. त्यामुळे व्यवसायात आर्थिक परिणाम जास्त जाणवला नाही. प्रथम आम्ही असलेल्या ग्राहकांना ब्रॅण्डिंग कन्सल्टन्सीमध्ये सांगतो की, तुम्हाला सतत बदल स्वीकारता आला पाहिजे. सगळेच बंद असल्याने अनेकांनी डिजिटल मीडिया, ई-कॉमर्स याद्वारे उद्योगाला सुरुवात केली याचाही आम्हाला फायदा झाला.
पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणार्या अनेक उद्योजकांना कदाचित अजून थोडा वेळ लागला असता डिजिटल माध्यमांचा व्यवसायात वापर करून घेण्यासाठी; पण कोरोना काळात हे आताच घडले. व्यवसायात ठरवूनसुद्धा झाली नसती अशी डिजिटल क्रांती झाली असे वाटतेय. नव्याने उद्योगात उतरू इच्छिणार्यांनी मार्केटचा अभ्यास करावा, आपली क्षमता तपासावी, भांडवल किती लागते पाहावे.
व्यावसायिकाच्या अंगी जिज्ञासू वृत्ती हवी. व्यवसाय हा गरजेतून तयार होतो. त्यामुळे गरजेतून निर्माण होणार्या उद्योगांना मरण नसते. खूप योजना, टप्पे ठरलेले आहेत. येत्या काळात शासनाची कामे मिळवणे, जाहिरात क्षेत्रात आज असलेले मोठं मोठे जे ब्रॅण्ड आहेत, त्यांच्या यादीत मैत्र एंटरटेनमेंटला न्यायचे विनयचे स्वप्न आहे. यासाठी त्याची घोडदौड सुरूच आहे.
– विनय शिंदे
9969263826
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.