असं म्हणतात की, वेडी माणसं इतिहास घडवतात आणि शहाणी तो वाचतात. तर जास्त शहाणी माणसं त्याचा अभ्यास करतात; पण इतिहास घडवायला वेडं व्हावं लागतं हे खरं. शहाण्यांच्या पंगतीतला हा घास नव्हे. कारण इतिहास घडवायला लागणारं शौर्य, धाडस, धोका पत्करण्याची क्षमता ही फक्त वेड्या माणसातच असू शकते.
बर्याचदा आपण ‘आऊट ऑफ दी बॉक्स’ विचार करा, असं ऐकतो. ‘पठडीतल्या बाहेर’चा विचार करायलासुद्धा ‘वेडं मन’च लागतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी गोष्टी मिळत नसेल तर त्याचा अर्थच असा होतो की, तुम्ही ती मिळवण्यासाठी वेडे झालेले नाही किंवा त्या पातळीवर प्रयत्न झालेले नाहीत.
असो, वेड्याच्या पंगतीतही बसायला वेडेच लागतात. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे-जे मिळवायचंय, ते-ते मिळवणं शक्य आहे. हवं असल्यास स्वतःला अजमावून पहा. आज माणसांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की, त्यांनीच त्यांची खरी ओळख करून घेतलेली नसणे
यासाठी आयुष्यात संकटे यावी लागतात, कारण ती तुम्हाला तुमच्या खर्या शक्तींची, सक्षमतेची जाणीव करून देतात. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला समजता त्यापेक्षा किती तरी जास्त ताकदवर, जास्त काबील, जास्त हुशार, जास्त चलाख तुम्ही आहात.
यासाठी तुम्ही स्वत:शी संवाद साधणे गरजेचे आहे आणि प्रसंगी विचारी वार्यावर स्वार होऊन प्रत्येक गोष्टीचा सामना करणं गरजेचं आहे. वेड्यांना हे शिकवावं लागत नाही. त्यांच्या रक्तातच ते असतं. मुळात ही जातच वेगळी असते, असं म्हटलं तर त्यात काहीच नवल वाटू नये.
कोणत्याही यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याला या वेडेपणाची ‘झालर’ कधी ना कधी लागलेलीच असते. त्याशिवाय ते का पुढे जातायेत. तुम्हीही योग्य वेळी ठरवून वेडं व्हा. कशासाठी वेडं व्हायचं ते तुम्ही ठरवा. त्या गोष्टीला मात्र तुमचं शंभर टक्के द्या. यात हातचं काहीच ठेवू नका.
एखाद्या कामासाठी वेडी झालेली माणसं अपयशाला फारसं मोजत नाहीत. काही तरी भव्यदिव्य, विस्मयकारक, अलौकिक करायला वेडेपणच साथ देतं. तुमचं वेडेपण तुम्हाला शहाण्या माणसांपेक्षा जास्त लवकर यशस्वी व्हायला मदत करते. त्याला जपा.
तुमच्या वेडाला मध्येच सोडू नका. अशाने तुम्ही कुठलेच न राहण्याची शक्यता जास्त असते. यासाठी तुम्ही ध्येयांसाठी वेड्या असणार्या माणसांच्या संगतीत राहायला शिका. तुमच्या वेडाला तुमच्या आयुष्याचं ध्येय बनवा. रात्रं-दिवस तेच वेड जगा.
तुमच्या नसानसांत त्याचा संचार होऊ द्या. तरच तुमचं वेड तुम्हाला काही तरी देऊन जाईल आणि नवीन इतिहास घडेल. कदाचित तो लहान असेल; पण तो असामान्य मात्र नक्कीच असेल आणि तुम्हीदेखील या जगातील त्या मूठभर लोकांत सामील व्हा. तुमच्या पुढील ऐतिहासिक वाटचालीला खूप शुभेच्छा. वेडे व्हा. झपाटून जा. सपाटून यशस्वी व्हा.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.