Advertisement
उद्योगोपयोगी

एक्पोर्ट पॅकेजिंग; निर्यात व्यवसाय आणि उत्पादनाचे वेष्टन

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


या लेखात आपण जागतिक व्यापारातील निर्यात होणार्‍या उत्पादनाच्या वेष्टनप्रक्रियेबद्दल थोडेसे जाणून घेऊ; कारण उत्पादनाचे सुयोग्य वेष्टन (प्रॉडक्ट पॅकेजिंग) हे त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय आवश्यक ठरते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने अतिशय अशा या महत्त्वाच्या बाबीवर आज आपण थोडा प्रकाशझोत टाकणार आहोत.

व्यवसाय कोणताही असो, उत्पादन हाच त्या व्यवसायाचा मुख्य गाभा असतो. उत्पादन निर्माण झाल्यापासून ते ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची गुणवत्ता, प्रमाण व सुरक्षितता अबाधित राखणे हे उद्योजकाचे आद्य कर्तव्य आहे. हाच व्यवसाय जेव्हा आपण अत्युच्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर करतो त्या वेळेस तर निर्यातदाराने या बाबतीत अधिक जागरूक असणे अगत्याचे ठरते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

याचसाठी निर्मित उत्पादन सुयोग्य पद्धतीने वेष्टिभूत करण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे; जेणेकरून उत्पादन निर्मितीपश्चात ज्या स्थितीत असते. अगदी त्याच स्थितीत त्याच्या परदेशस्थ ग्राहकापर्यंत पोहोचू शकेल. यामुळे निर्यातदार त्यांचे प्रस्थापित ग्राहकवर्ग अबाधित ठेऊ शकतील व नवीन ग्राहकवर्गही आकर्षित करू शकतील आणि निर्यातवृद्धीस अधिक चालना मिळेल.

निर्यातक्षम उत्पादनाची वेष्टनप्रक्रिया

मुख्यत्त्वेकरून निर्यात होणार्‍या उत्पादनाचे वेष्टन हे तीन स्तरावर केले जाते; जेणेकरून वर उल्लेखल्याप्रमाणे त्याची गुणवत्ता, प्रमाण व सुरक्षितता जपता येते. हे स्तर पुढीलप्रमाणे :

प्रथम स्तर : या स्तरावर संबंधित उत्पादन हे निर्मितीपश्चात लगेच एखाद्या वेष्टनात बंदिस्त करता येते. हे वेष्टण उत्पादनसापेक्ष भिन्न भिन्न प्रकारचे असते; ब्रॅण्डेड उत्पादनामध्ये लेबलिंग याच वेष्टनावर करण्यात होते.

प्राथमिक स्तरावर उत्पादन वेष्टिभूत करताना वेष्टनाकरता वापरण्यात येणार्‍या वस्तूंची (कागद, पुठ्ठा, प्लॅस्टिक इ.) गुणवत्ता ही अत्युच्च असणे बंधनकारक आहे; त्यामुळे वेष्टित उत्पादन बराच कलावधीपर्यंत वेष्टनात अबाधितपणे राहू शकेल, तसेच ते निर्यातक्षम असल्याने एका देशातून दुसर्‍या देशातील प्रवासादरम्यानही सुरक्षित राहू शकेल.

द्वितीय स्तर : या स्तरावर उत्पादनाचे वेष्टिभवन (पॅकेजिंग) गठ्ठ्यागठ्ठ्याने केले जाते. प्रथम स्तरावर वेष्टित केलेल्या अनेक उत्पादनांचा समूह करून तो विशिष्ट प्रकारच्या पिशव्या अथवा खोक्यामध्ये अथवा गोण्यांमध्ये भरला जातो. तसेच प्रत्येक खोके अथवा पिशवी विशिष्ट प्रकारे चिन्हांकित केले जाते; जेणेकरून त्यातील मालाची नोंद ठेवणे सोपे जावे. अशाप्रकारे वेष्टिभवन केलेला सर्व माल एकत्र करून त्याची नोंद घेऊन पुढे पाठवला जातो.

तृतीय स्तर : या शेवटच्या स्तरावरील वेष्टण हे ग्राहकाच्या मागणीवर अवलंबून असते. यामध्ये द्वितीय स्तरावर वेष्टित सर्व मालाच्या पिशव्या अथवा खोके यांचा पुन्हा समूह करून अधिक गुणवत्तेच्या जाड आवरणामध्ये वेष्टित केला जातो, त्यानंतर तो पुढे कंटेनरमध्ये भरण्यासाठी पाठवला जातो.

वरील सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर उत्पादन निर्यातीसाठी सुसज्ज होते व सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर निर्यातीकरता पुढे जाते.

आयआयपी

आपल्या भारत देशाचा विचार करता, सरकारही आपल्या उत्पादनाच्या गुणवत्ता व सुरक्षिततेकरता प्रयत्नशील असते; कारण त्यामुळे एकप्रकारे परदेशातही आपल्या देशाचा लौकिक कायम राहतो.

याचसाठी सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयातर्फे फक्त उत्पादन वेष्टण (प्रॉडक्ट पॅकेजिंग) या विषयात निर्यातदारांना मार्गदर्शन करण्यासाठी समर्पित अशा संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या संस्थेचे नाव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (आयआयपी) असे आहे.

प्रत्येक निर्यातदाराने निर्यातीपूर्व या संस्थेची माहिती घेणे अगत्याचे आहे. ही संस्था आपल्याला आपल्या मालाचे योग्य परीक्षण करून त्यास सुयोग्य असे पॅकेजिंग पर्याय सुचवते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे पॅकेजिंग कसे असावे, याबद्दलही योग्य मार्गदर्शन करते. त्यानुसार निर्यातदाराने आपले उत्पादन वेष्टिभूत करणे आवश्यक आहे.

येथे एक गोष्ट आवर्जून नमूद करणे आवश्यक वाटते, की जरी भारतीय निर्यातदाराकरिता आयआयपीची सोय सरकारतर्फे केलेली असली, तरी आयआयपीशी संपर्क साधण्यापूर्वी निर्यातदाराने आपल्या परदेशातील ग्राहकाकडे त्यांना अपेक्षित अशा उत्पादनाच्या पॅकेजिंगबद्दल सविस्तर विचारणा करणे अधिक चांगले; किंबहुना असेच करणे दोन्ही पक्षांकरता हितावह ठरू शकते.

प्रत्येक देशामध्ये पॅकेजिंगबद्दल असलेली नियमावली ही परस्परभिन्न आहे त्यामुळे ती सर्व माहिती आपल्याला आपल्या ग्राहकाकडून आधीच समजली असता त्या अनुषंगाने उत्पादन वेष्टिभूत करणे फायदेशीर ठरते. काही कारणपरत्वे असे करणे शक्य नसल्यास आपण आयआयपीच्या मार्गदर्शनाखाली सुवेष्टित उत्पादन ग्राहकाच्या पडताळणीसाठी पाठवणे इष्ट ठरते. त्यात काही बदल अपेक्षित असल्यास ग्राहकाकडून आपणास कळवले जाते.

तेव्हा निर्यातदार व्यावसायिकांनी ग्राहकांप्रती उत्तम सेवाभाव ठेवावा हे अपेक्षित आहे, उत्पादनाचे मागणीनुसार उत्तम पॅकेजिंग हा एक मार्ग आहे; त्यायोगे ग्राहकाभिमुखताही जपली जाते व ग्राहकांमध्ये आपला निर्यातदार म्हणून असलेला लौकिकही कायम राहतो. या सर्वाची परिणीती व्यावसायिक हितसंबंध अबाधित राहण्यात होते.

– सौरभ दर्शने
संपर्क : 81040 55489
(लेखक निर्यातदार व विदेश व्यापार सल्लागार आहेत.)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!