मेणबत्तीच्या प्रकाशाने अनेक कुटुंब उजळवणार्‍या संगीता गुरव

मेणबत्ती आणि विविध छोट्या घरगुती व्यवसायांचे प्रशिक्षण देत स्वतःची आर्थिक, सामाजिक परिस्थिती तर बदलली, पण आपल्यासारख्या हलाखीची परिस्थिती असणार्‍या अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणार्‍या संगीता गुरव यांचा व्यावसायिक प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायक आहे. त्यांच्या या कामाचा गौरव १५० हून अधिक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करून अनेकांनी केलाय.

‘वेदांत आर्ट्स अँड प्रॉडक्शन’ या नावाने संगीता गुरव यांचा गृहोद्योग आहे. आजपर्यंत पाच हजारांहून अधिक महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना एक नवा मार्ग दाखवलाय. हलाखीच्या परिस्थितीत जन्म झालेल्या संगीताताईंची लग्नानंतरसुद्धा परिस्थिती काही जास्त बदलली नव्हती.

त्यामुळे आपण काही तरी करायला हवे असे त्यांना सतत वाटत राही. यातूनच पिशव्या शिवणे, इतर काही छोटीमोठी कामे त्या करत होत्या; पण मार्ग काही सापडत नव्हता. १९९० च्या सुमारास उल्हासनगरमध्ये एक मेणबत्त्या तयार करण्याचे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. याची माहिती त्यांना मिळाली आणि ते प्रशिक्षण त्यांनी घेतले.

सुरुवातीच्या काळात लोक हसायचे, काय ठेवलंय या मेणात, असं मला हिणवायचे; पण मी मनाशी पक्के केले होते की, मी स्वतःसाठी तरी काही तरी करणार. मी एक छोटा मोल्ड आणला आणि मेणबत्त्या बनवायला सुरुवात केली. मेणबत्तीच्या गुणवत्तेवर काम करत होते. वेगवेगळे प्रयोग केले आणि जास्तीत जास्त चांगला माल लोकांना दिला.

विविध ठिकाणी स्टॉल लावले. त्यामुळे अल्पावधीतच मी उल्हासनगरमध्ये मेणबत्तीसाठी ओळखले जाऊ लागले. पुढे लोकांचा दृष्टिकोन बदलला. त्यांना यात फायदा दिसू लागला. यातूनच आम्ही स्वतःचे घर उभारू शकलो. आज मी उभी राहिली म्हणून माझे कुटुंब उभे आहे, असे संगीताताई सांगतात.

संगीताताईंनी आपल्यासारख्याच जिल्ह्यात, तालुक्यात अनेक महिला आहेत ज्यांना उदरनिर्वाहासाठी उपजीविकेचे साधन हवे, या विचारातून त्या महिलांच्या सोबत बचत गट सुरू केला आणि त्यातून त्यांना मेणबत्त्या बनवण्याचे प्रशिक्षण दिले. पुढे डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कोल्हापूर, कणकवली, नागपूर अगदी गडचिरोलीलासुद्धा जाऊन महिलांना प्रशिक्षित केलंय आणि पुढेही करतच राहणार आहेत.

मेणबत्ती व्यवसायाशिवाय अजून काय करता येतं याचा त्यांनी अभ्यास केला. आज मेणबत्ती व्यवसाय प्रशिक्षण, पिशव्या बनवणे, फिनाइल बनवणे, परफ्यूम बनवणे, चॉकलेट बनवणे अशा प्रकारच्या उद्योगांचे प्रशिक्षणही त्या महिलांना देतात. त्यांच्याकडे आलेल्या काही ऑर्डर त्या त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनाही देतात.

आपल्याकडचे साहित्य देऊन अनेकींना त्यांचा व्यवसाय सुरू करायला प्रोत्साहित करून मदतही करतात. अंध आणि अपंग व्यक्तींना मोफत प्रशिक्षण देतात. स्वतःची जागा घेऊन त्या ठिकाणी प्रशिक्षण संस्था उभी करणे आणि महिलांना त्याचा फायदा मिळवून देणे हे त्यांचे ध्येय आहे. पुढील दोन ते अडीच वर्षांत ते पूर्ण करायचं त्यांचे लक्ष्य आहे.

कुटुंबाच्या साथीने त्या व्यवसायात जम बसवू शकले, असे आवर्जून सांगतात. विशेषतः नवरा आणि मुलीची मिळालेली साथ खूप मोलाची आहे. आता प्रवास झेपत नाही म्हणून नवर्‍याने माझ्यासाठी गाडी घेतली, जेणेकरून मी प्रवास नीट करू शकेन, असे संगीताताई सांगतात.

कोरोनाचा परिणाम व्यवसायावर झाला; पण तरी त्या डगमगल्या नाहीत. जेवढे आपण घाबरतो तेवढी आपली भीती वाढत जाते. त्यामुळे आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जायला हवे, असे त्या म्हणतात. त्यांच्यासोबत काम करणार्‍या बारा महिलांना त्या अर्धा पगार देत होत्या, जेणेकरून त्यांचे घर चालत राहील. या काळात फोन, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून त्या बायकांशी संपर्कात होत्या.

न घाबरता पुन्हा कामाला सुरुवात करा, दिवाळी जवळ येतेय, लोकांची मागणी येणार, तेव्हा कामाला लागा. घराबाहेर पडा. घरात बसूनही अनेकांना कोरोना झाला, मग आपण बाहेर पडलो, चार पैसे कमावले आणि त्यातूनही कोरोना झाला, तर त्या वेळी काय करायचे ते पाहू, असे त्या महिलांना समजावत होत्या. हे सांगताना त्या घरात बसून नव्हत्या. प्रथम त्या बाहेर पडल्या.

मेणबत्ती बनवणे, त्याचं प्रशिक्षण देणे हीच माझी आवड. त्यासोबत ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणं माझा छंद, असे त्या सांगतात. परिस्थितीचा बाऊ न करता खंबीरपणे उभे राहून संसारातील आपलाही आर्थिक वाटा उचलण्यासाठी महिलांनी काहीना काही तरी गृहोद्योग जरूर करावा, असे त्या महिलांना आवाहन करतात. पुढे तो व्यवसाय वाढेल वगैरे ते पुढचा काळच ठरवेल; पण अगोदर सुरुवात होणे गरजेचे आहे.

– संगीता गुरव
९५६१६०६६०९

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?